बाबा… मला तू पण हवा आहेस…!

Written by

बाबा… मला तू पण हवा आहेस…!

आस्थाची आणि तिचा बाबा अमेय ह्यांची भेट बहुतांश रात्री जेवणाच्या टेबलवरच व्हायची. इतर वेळी अमेय त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये नाहीतर मित्रांमध्येच व्यस्त असायचा. त्यामुळे आस्था सोबत खेळायला त्याला फार वेळ मिळत नसे… कधी कधी तर ती झोपायला तिच्या पलंगावर गेली असता दरवाजाची बेल वाजायची आणि ती धावतपळत जाऊन दार उघडतं असे…

“बाबा आलास तू…! किती उशीर करतोस रोज …लवकर येत जा ना…”

असे लाडातच बोलून तिचा बाबाजवळ तिचे पाय घुटमळत असायचे….

पण तिला प्रेमाने जवळ घ्यायचे सोडून ” आत हो बघ. तूझी झोपायची वेळ झाली आहे ,झोप लवकर . मी खूप थकलो आहे आता.. आपण उद्या बोलू …” म्हणून तिला बाजूला सारून खोलीत निघून जायचा…पण तो उद्या कधीच नाही यायचा…आणि आस्था रोज तिचा बाबाची वाट बघत राहायची…

मग अंजली पटकन येऊन आस्थाला जवळ घेऊन छान गोड पापा द्यायची…चल मी येते तुझ्यासोबत म्हणून आस्थाला आत घेऊन जायची. दिवस सरता आता त्या दोघांमध्ये अंतर वाढत होते. अमेय आस्थावर प्रेम करत नव्हता असे मुळीच नव्हते. तो तिच्या हव्या असलेल्या सगळ्या गरजा पूर्ण करीत होता , तिला हवे ते पुस्तक, खेळणी अंजलीला विचारुन ऑनलाईन ऑर्डर करुन देत होता , पण कुठेतरी बाप-लेकिमधला संवाद हरवला आहे ह्याची जाणीव त्याला नव्हती..

आस्था आणि तिची आई अंजलीच्या नेहमी प्रमाणे रात्रीच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. शाळेला सुट्ट्या सुरू असल्या की रोज रात्री काही नवीन खेळ खेळण्यात दोघी दंग असायच्या. दिवस भर बाहेर खेळून आल्यावर देखील आईने सोबत थोडावेळ काहीतरी खेळावे हा तिचा हट्ट असे…

रोज मग दोघींचे छान छान गोष्टींचे वाचन व्हायचे. दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा आस्था अंजलीला देत देवाचे नामस्मरण करुन तीच कुशीत ती आपले डोळे मिटत… पण झोपतांना ” आई मला तुझ्यासोबत बाबा पण हवा गं… बघ ना तो तर बोलतच नाही माझ्याशी…” असे म्हणतं छोटी आस्था झोपी जायची…

तिचा बाबा घरी असेल तेव्हा तिला त्याच्यासोबत खेळायला आवडायचे…पण जसजशी ती मोठी होत होती , तसे त्या दोघांमधले अंतर वाढतच होते… अमेय घरी आल्यावर देखील हातात टीव्हीचा रिमोट नाहीतर फोन सतत हातात चिकटलेला असे…

“माझ्यासोबत खेळ ना बाबा ..” असे म्हटले तरी त्याचा हातातून मोबाईल सुटतच नसे…

शाळा सुरु झाली आणि सगळ्यात पहिले शाळेत मराठीच्या तासाला पत्र लेखन स्पर्धा घोषित झाली. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातलं सांगायला म्हणून हे पत्र लिहा असा विषय देण्यात आला. घरी आल्यावर हातात लागलीच पेन घेऊन अगदी उत्साहात आस्थाने पत्र लिहायला सुरवात केली…ते पत्र दुसऱ्या कोणा साठी नसून तिच्या लाडक्या बाबासाठीच होते…

माझा प्रिय लाडका बाबा….

कसा आहेस ? आपली भेट फार कमी होते म्हणून आज तुझाशी पत्रातून बोलावं असं वाटलं म्हणून हे पत्र तुला…!

खूप काम असतं ना तुला ऑफिस मध्ये..कळतं रे मला ते …मला हव्या असलेल्या गोष्टी तुला देता यावा म्हणून तू दिवसरात्र कामात मग्न असतो…मला माहिती आहे , पण मी तुला खूप मिस करते रे..!

तुला आठवतं आपली कोकणची ट्रीप…!किती मजा केली होती तू ,मी आणि आईनी…! तू आणि मी मिळून समुद्राच्या मातीत बसून किल्ला सुद्धा बनविला होता… आपण दोघांनाही मिळून डबा भरून शिपली जमा केली होती…किती धमाल केली होती ना आपण…!

मी हसायला लागली की लाडाने जवळ घ्यायचा,आणि मी रागावले की “नकटी ” म्हणून माझ्या गालावर मुका घेऊन मला बिलगायचा… ती सगळी धूसर चित्र आजही डोळ्यासमोर उभी राहतात…

बाबा एक सांगू…
तुझी माझा पाठीवरची कौतुकाने दिलेलं थाप मला परत हवी आहे…

नकळत माझ्या चेहरऱ्यावर फिरविलेला प्रेमळ स्पर्श परत हवा आहे….

तुझ्या हातून मला परत एकवेळ हेअर स्टाईल बनवायची आहे….

तुझ्या -माझ्या सोबतच्या हरवलेल्या क्षणांना मला परत जगायचं आहे….

मला तो सारा आनंद परत हवा आहे….

बाबा आईसोबत मला तू पण हवा आहेस….

मला माहिती आहे तू लवकरच माझे लाड करायला, धावत येऊन मिठीत घ्यायला लवकरच येशिल आणि पहिलेसारखी माझ्यासोबत खूप खूप धमालही करशील…
बाबा मी वाट पाहत आहे…!

तुझ्या प्रतीक्षेत असलेली
तुझीच लाडकी लेक
आस्था…

 

पत्र लिहिता लिहिता आस्था कधी झोपी गेली कळलेच नाही. पत्र तिच्या हातातच होते…अमेय ऑफिस मधून येऊन खोलीत बॅग ठेवायला आला असता आस्था समोर त्याला दिसलीच नाही, म्हणून दुसऱ्या खोलीत बघायला गेला असता तिथेच टेबलवर डोके ठेऊन आस्था झोपली दिसली….

तो परत पाठ फिरवून जाणार इतक्यात वहीच्या पानांचा आवाज झाला… तो परत तिच्या जवळ येऊन तिला आवाज देणार इतक्यात त्याचा हातात आस्थाचे पत्र लागले.त्या छोट्याशा मुलीचे कोवळे मन किती विचार करत हे बघून तो भारावून गेला…आणि ते पत्र वाचून अमेयचे डोळे गच्च भरुन आले. धावतच जाऊन त्यांनी आस्थाच्या कपाळावर छान मुका घेतला…

तितक्यात आस्थाला जाग आली…. ” अरे बाबा तू आलास…मी…” ती काही बोलायच्या आता त्याने तिला जवळ घेऊन छातीशी कवटाळले…तो कुठे चुकतोय हे त्याच्या लक्षात आले होते…
” आजपासून आपण दोघे सोबतच जेवणार बरं का…! आणि आज काय खेळायचे आहे विचार करुन ठेव…” असे म्हणत तिला टेबलवर जेवायला घेऊन गेला….हे ऐकताच आस्थाच्या चेहरऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता… बाप लेकीचं असं प्रेम बघून अंजलीला सुद्ध भरुन आले… आणि त्या तिघांच ते ” त्रिकूट” परत आनंदाने बहरलं….!

मैत्रिणींनो, पालक म्हणून जबाबदारी ही जेवढी “आई ची” असते तितकीच “बाबा ची” सुद्धा असते. प्रत्येक मुलाला आई सोबतच त्याचा बाबा सुद्धा हवा असतो. मुलांजवळ त्यांच्या बाबासाठी राखीव वेळ ठेवलेला असतो.पण हल्ली बाबांजवळ तो वेळ नसल्यात जमा असतो. तुम्ही घरी कितीही थकून आलात तरी ,आल्यावर तुमची मौल्यवान दहापंधरा मिनिटं सुद्धा तुमच्या मुलांना पुरेशी आहेत. मुलांना तुमच्या कडून महागडी गिफ्ट नाही तर ” फक्त त्यांच्यासाठी असलेला तुमचा वेळ हवा असतो..” तोच वेळ त्यांना द्या, आणि बघा तुमचं तुमच्या मुलांसोबतच नातं अजून बहारदार होण्यात काहीच वेळ लागणार नाही…!

लेख कसा वाटला ,सांगायला विसरु नका… तुमच्या प्रतिक्रिया मला अमूल्य आहेत.. तेव्हा त्या नक्की कळवा…
धन्यवाद…!?

तुमची मैत्रीण
नेहा खेडकर✍❤

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा