बायकोचे पत्र # कथा लेखन#

Written by

सैनिकाच्या पत्नीने वीरमरण प्राप्त झालेल्या आपल्या पतीसाठी लिहिलेले पत्र..

रोज रोज भरून येतं
आभाळ तुझ्या आठवणींचं..
मग सुरू होतं बरसण
मनातल्या श्रावणसरींचं..

खरंतर तुझ्या आठवणींचा पसारा रोज असतोच माझ्या मनात..कितीही आवरला तरी पुन्हा पुन्हा होतोच..पण आज नेमकं जास्तच बिनसलं असावं त्याचं.. अचानक गच्च आभाळ भरून आलं.. आणि वेड्या सारखा सैरावैरा अवकाळी पाऊस बरसू लागला. जणू काही तहानलेल्या धरेची तृष्णा आगंतुकपणे येऊन तो भागवत होता..त्या अमृतसरी पिऊन तृप्त झालेल्या रुजव्याच्या ओल्या मातीचा भान हरपून टाकणारा सुंगध सर्वत्र दरवळला..मीही नखशिखांत नाहून निघाले..न भिजताही.. तुझ्या आठवणींच्या बरसातीत.. मेघ झरू लागले..मनातला पाऊसही कोसळू लागला..आणि तुझी खूप खूप आठवण आली..खरं सांगू का तुला..?? तुझ्या आठवणींना निमित्तचं लागतं यायला.. लगेच हजर होतात बघ..!!

तुझी आठवण येते आणि मग सुरू होतो मौनातला संवाद.. अविरत चालू होतं मनाचं झिरपण.. आठवणी रुंजी घालू लागतात मनात.. आणि जाणवू लागतो त्यांचा तो ओला गंधाळलेला स्पर्श.. ऐकू येऊ लागतात तुझ्या श्वासांचे धुमारे.. तुझ्या स्वरातलं मधुर संगीत.. तुझं ते गोड गुणगुणनं अगदी मनातल्या मनात..

मी नकळत माझे डोळे मिटून घेते.. आणि माझ्यातला तू मला दिसू लागतो.. अगदी माझ्या डोळ्यासमोर गोड स्मित हास्य करत बसलेला..भास होऊ लागतो तुझ्या असण्याचा..खट्याळ अवखळ वारा बनून तू स्पर्श करू लागतोस माझ्या तनमनाला.. रोमारोमांत जाणवू लागतो तुझा ओला स्पर्श अगदी मंतरून टाकणारा.. अगदी तसाच पहिल्या तुझ्या मिठीतला.. ऐकू येऊ लागते दूरवर सागराची गाज.. दिसू लागतो मला खवळलेला समुद्र.. विरत गेलेल्या आपुल्या त्या पाऊलखुणा.. मावळतीला निघालेला रवी तुला पाहून जरासा रेंगाळलेला.. निळ्याशार नभात चांदण्याची फुलं उमलायला सुरवात होऊ लागलेली.. आणि लबाड चांदवा तुला पाहण्यास अधीर झालेला.. एक अवखळ लाट खळाळत आलेली आणि तो आपण बनवलेला रेतीमय बंगला स्वतः सोबत वाहून घेऊन गेलेली.. हृदयाच्या आकारात वाळूवर कोरलेली आपल्या नावाची अद्याक्षरे लाटेसोबत विरून गेलेली..मी तुझ्या कुशीत विसावलेली..आणि अलगद माझ्या ओठांवर तू केलेली साखरपेरणी.. अन तुझ्या श्वासात मिसळलेला माझा श्वास.. सगळं सगळं आठवतंय रे..

म्हणाला होतास तू मला,” प्रिया… माहीत आहे न तुला..!!मी एक भारतीय सैनिक आहे..तू एका सैनिकांची अर्धांगिनी.. असं रडणं शोभतं का तुला? मातृभूमीचं रक्षण करण माझं पाहिलं कर्तव्य आहे.. युद्ध संपलं की मी लगेच येतो.. मी असा गेलो आणि असा आलो..औक्षणाचं ताट तयार ठेव” खोटं बोललास ना तू..!! युद्ध संपून गेलं तरी तू परतून आला नाहीस. पण तुझा निरोप घेऊन मात्र काही सैनिक घरी आले.. तू शहीद झाला हे सांगायला..तुझा मृतदेह सापडला नव्हता.. म्हणजे अजूनही माझ्या मनात एक आस आहे की तू परतून येशील कधी ना कधी.. येशील ना रे.??

दिलं होतं वचन तू मला..नाही सोडून जाणार कधी..कायम सोबत राहीन..पण फसवलंस ना रे तू मला..हे असले शब्दांचे खेळ खेळून.. गेलास निघून अगदी सहजपणे..मला न सांगता.. एकटीला मागे टाकून अगदी खुशालपणे.. अगदी निष्ठुरपणे..

माझ्या मनाची आर्त साद तुला कधीच ऐकू येत नाही का रे..?? किती साद घालू? इतक्या दूर गेलास की माझा राहिला नाहीस..?? मी मात्र वेडी रोज तुला आठवते.. नक्की परत येशील मनाला पटवून सांगतेय.. तिष्ठत उभी औक्षणाचं ताट घेऊन..

एकदा ये ना रे!! माझा पाऊस बनून.. तुझ्या पावसात चिंब भिजून जाऊ दे.. गळून पडू दे सारे प्रश्न.. वाहून जाऊ दे ना वेदना मनातल्या.. येशील ना रे..??

मी सांधलेले हे ऋणानुबंध परत एकदा प्रेमाच्या धाग्यात गुंफण्यासाठी येशील ना रे?? एकदाच परत ये प्लीज.. मला कवेत घेण्यासाठी.. अश्रूंची फुले करण्यासाठी..

तुझीच फक्त तुझीच
प्रिया..

निशा थोरे…

Article Categories:
प्रेम

Comments are closed.