बालपणींच्या आठवणी…..!!

Written by

?बालपणाच्या आठवणी….!!

हिरण्यकेशीच्या काठावर वसलेल सरोळी हे आजरा तालुक्यातील छोटस गांव…निसर्गान सार सौंदर्य बहाल केलेल..अगदी बेमालुमपणे ….हिरण्यकेशीच्या पाण्याने समृद्ध झालेल्या शिवारात आनंदाने डोलणारी पीकं…. शिवारात असलेले गावकर्यांच श्रद्धास्थान म्हणजे भावेश्वरी मंदिर …! पिंपळ पानांच्या सळसळीत वसलेल महादेव मंदिर , गावच्या विकासात मोलाची भर घालणार्या गोकुळच्या तीन डेअर्या…आर्थिक व्यवहारासाठी सज्ज असलेली के.डी.सी.बॕंक , नवरा – नवरींची शिस्तबद्धरित्या वरात निघावी अशी गलींची रचना , गावाला लागून असलेली जिव्हाळ्याची मराठी शाळा..आणि या गावाला लाभलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे प्रेमळ माणसं …अशा सर्वांगसुंदर गावात माझा जन्म व्हावा हे भाग्यच ..!!
बालपणीची आठवण आली की मन मोहरुन जात…. लहानपणी शाळेला जाण्यास मन धजत नव्हते …शाळा म्हटले की घरातुन पळ काढून जायचे..मग आई – वडिल मला शोधत सुटायचे….धपाटे मारुन ओक्साबक्सी रडत शाळेत बळजबरीने बसवायचे….असा हा नित्यक्रम चालत असे….लहानमुलांची शाळा गावातील महादेव मंदिरात भरत असत.माझ्या शाळेला जाण्याच्या त्रासाला कंटाळून आई – वडिलांनी माझ्याबरोबर आजीला पाठवू लागली.आजी मला लागूनच शाळेत बसत होती .मी पळून जाईन म्हणून गुरुजींची माझ्यावर करडी नजर असायची .गुरुजी शिकवत असता हळूच आजी घराकडे जायची पण माझ्या ते लक्षात येताच मी परत घराकडे धूम ठोकायचो….घरातील मंडळी सगळे उपाय करुन हारली होती…शेवटी आई – वडिलांनी उपाय शोधलाच…आमच्या घराशेजारील श्री.गुंडू गुरुजी हे गावाजवळील निंगुडगे या गावी शिक्षक म्हणून मराठी शाळेत शिकवत होते , त्यांच्याबरोबर मला शाळेला जाण्यासाठी सांगितले .गुंडू गुरुजींनी ( मी त्यांना आदराने आण्णा म्हणत असे ) मला चांगलाच लळा लावला व त्यांच्याबरोबर मी शाळेला जाऊ लागलो .दररोज पाटीवर दफ्तर घेऊन आण्णांच्याबरोबर दोन किलोमीटर चालत शाळेला जाऊ लागलो.आण्णा चौथीच्या वर्गावर शिकवत असायचे मीही त्यांंच्या वर्गातच बसत असे…अशा नित्य नियमाने मला शाळेचा छंद लागला …नवनविन मित्र मिळाले ..शाळेतील गुरुजींच्या ओळखी झाल्या…त्यांंच्यातलाच मी विद्यार्थी झालो… दुपारच्या वेळेत गुरुजी मला अल्पोपहार करण्यास बोलवत असत …मी आदराने त्याचा स्विकार करत असत…पण एकदा त्यांनी मुद्दामच अल्पोपहारचे पैसे मागितले मी तेंव्हापासून अल्पोपहारच बंद केला…तेंव्हा सर्व गुरुजींनी माझे पैसे बचतीचे कौतुक केले होते.
दररोजच्या येण्याजाण्याचा मला कंटाळा आला होता .पावसातल येण- जाण , आण्णाना त्रास हे मला आता कळू लागल होत..त्यामुळे मी आमच्या गावातील सरस्वती विद्या मंदिरमध्ये चौथीपासून शाळेला जाऊ लागलो.आईवडीलांची शैक्षणिक ओढ आदरणीय श्रीयुत गुंडू गुरुजींची तळमळ यामुळे माझे पुढील शैक्षणिक जीवन सुखकर झाले…!!

बालपणींची ही आठवण आली की पुन्हा मन धावायला लागते …त्या आठवणी आजही मर्मबंधातील ठेवा आहेत…या आठवणी कुठल्या आडगळीत पडल्या असत्या कुणास ठाऊक …!! पण ईरासारख्या माध्यमांच्यामुळे त्याला सोनेरी मुलामा मिळाला आहे….तो निश्चितच कस्तुरीमृगाच्या अत्तरासारखा जीवनात दरवळेल…!!

▪©नामदेव पाटील .

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत