बालपणीच्या आठवणी

Written by

 

बालपणीच्या आठवणी

आयुष्याच्या वाटेवरती वळून बघता मागे,
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन माझे डोलू लागे.

आठवणी त्या बालपणीच्या सुंदर मंतरलेल्या क्षणांच्या,
चिऊ-काऊ च्या घासांच्या आणि निरागस स्वप्नांच्या.

आठवणी त्या जात्यावरील ओव्यांनी होणाऱ्या सुंदर पहाटेच्या,
शेण-सडा सारवण आणि सुंदर रांगोळ्यांच्या.

आठवणी त्या चुलीवरील भाजलेल्या खमंग भाकरीच्या,
खोड्या करता आईने दिलेल्या धम्मक लाडूंच्या.

आठवणी त्या ये ग गाई गोठ्यात म्हणत भरवलेल्या घासांच्या,
चिऊ-काऊ, राजा-राणी आणि चांदोबांच्या गोष्टींच्या.

आठवणी त्या आवळा, चिंच, बोरे आणि ऊसाच्या,
पाच पैशाच्या लेमन गोळ्या आणि पेपरमिंटच्या.

आठवणी त्या कल्पनेच्या गगनात विहार करता पाहिलेल्या स्वप्नांच्या,
आणि जाग येता वास्तवाच्या लागलेल्या चटक्यांच्या.

आयुष्याच्या वाटेवरती वळून बघता मागे ,
काय हरवले काय गवसले हिशोबच न लगे.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा