बाळाला भेटला देव.…

Written by

जय जस जसा मोठा होत होता तशी त्याची जिज्ञासा वाढत चाललेली, “आई याला काय म्हणतात?” , “आई ते असच का असतं”, ” आई ते तसंच का असतं?”

त्याच्या प्रश्नांना उत्तर देत देत मेघा कधी कधी स्वतःच विचारात पडत असे, कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नसायची.

असचं एकदा नेहमीप्रमाणे मेघा सकाळी देवपूजेला बसली, जय तिच्या मांडीवर येऊन बसला आणि आई काय करतेय याच्याकडे  नीट न्याहाळत होता. त्याचं निरीक्षण संपल्यावर त्याने प्रश्नांचा भडीमार सुरु केला,

“आई तू काय करतेस ?”

“मी देवपूजा करते.”

“कुठं आहे देव?”

“या मूर्तीत देव आहे, त्याची अंघोळ घालते मी”

“देवाला नाही का करता येत त्याची त्याची अंघोळ ?”

“त्या मूर्तीत देव आहे मग तो चालत आणि बोलत का नाही ?”

“त्याला बसून बसून कंटाळा येत नाही का ?”

“त्याच्या शेजारचे देव त्याचे मित्र आहेत का ?”

“देव पण बॅट बॉल खेळतात का ?”

“देव दूदू  केंव्हा पितो ?”

अशा प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.

निरागस जय देवाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होता आणि त्याच्या निरागस प्रश्नांना शक्य तेवढी उत्तर देण्याचा प्रयत्न मेघा करत होती.

त्याने शेवटी एक प्रश्न मांडला, “आई देव म्हणजे काय ? कुठं असतो तो ?”

आता मात्र मेघा कडे उत्तर नव्हतं. तिने जय ला दुसऱ्या गोष्टीत नादी लावून आपली पूजा आटोपली. जय हीं विसरून गेला, पण जेव्हा जेव्हा आजी-आजोबा देवाला नमस्कार करीत, श्लोक म्हणत, मंदिरात जात …. तेंव्हा तेंव्हा हा प्रश्न जय हमखास विचारत असे,

“आई  देव म्हणजे काय ? कुठं असतो तो ?

या प्रश्नावर कित्येक धार्मिक आणि तात्विक संशोधकांनी वेगवेगळी उत्तरं मांडली होती, संत मंडळींनी भक्तिमार्गातला देव दाखवला होता, ज्ञानपुरुषांनी योगसाधनेतुन प्राप्त झालेला देव सांगितला होता तर कोणी चमत्काराचे दाखले देऊन देव समजावला होता. पण या निरागस जीवाला त्याच्या भाषेत देव समजावणार तरी कसा?

मेघा ने आता मनाशी ठरवले, इवल्याशा जीवाला आता अनंत, अगम्य, निर्गुण, निराकार आणि सर्वव्यापी देवाचे ज्ञान त्याच्या भाषेतून देणार.

संध्याकाळी मेघा जय ला घेऊन फिरायला समुद्रकिनारी आणि एका बागेत गेली, बगीचा मध्ये एक चिमणी आपल्या पिल्लाला दाणे भरवत होती,

“आई ती चिऊताई काय करते?”

“पिल्लाला खाऊ घालते”

“का खाऊ घालते?”

“कारण, तिथे देव आहे”

पुढे एका आंधळ्या माणसाला एक माणूस रस्ता ओलांडायला मदत करीत होता,

“आई तो माणूस त्याला मदत का करतोय?”

“कारण तिथे देव आहे”

पुढे एका रोपावरचे गुलाबाचे सुंदर फूल मेघा ने जय ला दाखवलं,

“आई, या गुलाबाला वास कुठून येतो, कोणी सेंट मारतं का ?”

“नाही रे बाळा, तिथे देव असतो, तोच त्याच्यात सेंट भरत असतो”.

अचानक आभाळ भरून आले, पाऊस पडायला लागला,मेघा जय ला आडोशाला घेऊन गेली,

“आई पाऊस का पडतो ?”

“बाळा पाऊस पडला तरच आपल्याला प्यायला पाणी मिळेल ना ? आणि शेतकरी शेतात अन्न पिकवू शकतील, मगच आपल्याला जेवण मिळेल, हो की नाही ?”

जय काही क्षण गहन विचारात पडला आणि खुश होऊन अचानक म्हणाला,

“आई म्हणजे त्या पावसात देव आहे ना ?”

आपणं शिकवलेलं जय आत्मसात करतोय याची पावती मेघा ला मिळत होती. पण जय चं पूर्ण समाधान अजूनही झालं नव्हतं,

“मला जशी तू दिसते, बाबा दिसतो, आजी दिसते, मग देव का नाही दिसत ?”

पाऊस थांबला तशी ती दोघं पुढे गेली, समुद्रकिनारी. मेघा आणि जय किती तरी वेळ निश्चल समुद्राकडे बघत होते, मेघा ला उत्तर सापडलं.

ती जय ला म्हणाली, “जय बाळा, तुला माहीत आहे का की या समुद्रात एक मासा आणि त्याचं पिल्लू राहतं”.

समुद्रातून काही मासे टुणकन उड्या मारून वर येत होते आणि दुसऱ्याच क्षणी मध्ये जात होते, त्यांचा कडे बोट दाखवून मेघा सांगत होती. ती पुढे म्हणाली,

“ते पिल्लू त्याच्या आईला सारखं विचारतं, आई मला समुद्र पाहायचाय, आई मला समुद्र पाहायचाय… त्याची आई त्याला समजावतेय, की अरे बाळा आपण समुद्रातच राहतोय, आपल्या आत, बाहेर, मागे, पुढे, वर, खाली समुद्रच आहे.”

पण त्या पिल्लूला सगळीकडे फक्त पाणी दिसतं, समुद्र दिसतंच नाही.

“आई मग त्याने बाहेर येऊन पाहायचं ना…”

“बाळा, मासा बाहेर आला तर तो मरून जाईल, त्याचा श्वास म्हणजेच हा समुद्र, हे पाणी … त्याने समुद्र सोडला कि त्याचंहीं काही अस्तित्व राहणार नाही.”

“किती वेडं ग ते..  ते समुद्रात राहून पण विचारतं कि समुद्र कुठे आहे.”

“हो न बाळा मग आपलंही तसंच आहे, आपल्या आत, बाहेर, वर, खाली मागे पुढे देवच आहे आपण जर हा देव सोडला तर आपलंही अस्तित्व संपलं, बघ जरा त्या माशाचा पिल्लु सारखं आजूबाजूला, ते वेडं होतं, त्याला समुद्र कळला नाही, पण माझं बाळ शहाणं आहे ना ? त्याला दिसेल ना देव ?”

जय च्या डोळ्यात एक चमक अली त्याच्या प्रश्नांचे निराकरण अखेर झालेच होते, त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. त्याने हात फैलावले एक गिरकी घेतली आपल्या आतल्या आणि बाहेरच्या भगवंताला तो अनुभवू लागला, ते चैतन्य अनुभवू लागला….

त्याने जोरात गिरकी घेतली आणि तो पडला, मेघा ने घाबरत त्याला कडेवर घेतले, “जयडू, तुला लागलं नाही ना काही ?” असं म्हणत त्याच्या डोक्यावरून ती हात फिरवू लागली, जय स्तब्ध झाला आई च्या डोळयात पहींले आणि म्हणाला, “आई, देव तुझात आहे ना ?”

मेघा भरून पावली तिचे आनंदाश्रु थांबत नव्हते. देवाचं देवपण समजावणाऱ्या माऊलीलाच लेकराने मोठं देवपण  बहाल केलं होतं.

©संजना सरोजकुमार इंगळे

(लेखिकेचा उल्लेख असेल असाच लेख आवर्जून शेयर करावा, लेखिकेचे नाव वगळल्यास कारवाई करण्यात येईल)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत