बिझनेस वूमन

Written by

“या ताई या, तुमचीच आठवण काढली होती मी काल.., साई च्या लग्नात काय छान दिसत होतात तुम्ही त्या सिल्क च्या साडीत…मी माझ्या बहिणीला सांगत होते की तू अशीच साडी नेस बबलू च्या लग्नात…”

सुमती ताई आपल्या कपड्यांच्या दुकानात आलेल्या गिऱ्हाईकाशी बोलत होत्या…

नवरा गेल्या नंतर पोटापाण्याचं साधन म्हणून सुमती ताईंनी हा व्यवसाय सुरू केला होता…त्यांचा छोट्याशा 2 खोलीच्या घरात साडी, ड्रेस, रुमाल, टॉवेल, पायपुसणी असे सर्व प्रकार त्यांनी विकायला आणले होते…

त्यांचा एरियात जवळपास 5 लोकांनी हाच व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला होता..कुणी पॉश मॉल टाईप दुकानं सजवली होती, कोणी ब्रँडेड कपड्यांचे दुकान मांडले होते..पण सुमती ताईंसमोर कुणाचाही टिकाव लागला नाही.

“सचिन उठ रे, 6 वाजलेत…अभ्यास करावा सकाळी लवकर उठून….एवढं पाणी भरून झालं की चहा ठेवते तुला….”

सकाळी फार लगबगीने सुमती ताई घरातली कामं आटोपून तयार होत…9 वाजले की दाराशी गिऱ्हाईक उभं..

“अरे या या पवार ताई….कालच तुमची आठवण काढलेली….(हा डायलॉग प्रत्येक कस्टमर साठी कॉमन…)…

हा सांगा काय दाखवू…

“पोरीचं लग्न काढलं आहे, देण्या घेण्यासाठी साड्या हव्यात..”

“बसा की दाखवते एकेक..”

“त्या बघू…कितीच्या आहेत”

“घ्या बघा, 300 च्या…”

मालती ताई एकेक निवडू लागतात….

“बघा, आवडल्या नाही तर अजून दाखवते…तुम्हाला समजलं का त्या स्नेहा च्या सासरी काय झालं ते? स्नेहा च्या आईने म्हणे तकलादू आणि एकदम स्वस्त साड्या नेसवल्या पाहुण्यांना…आता फार ऐकावं लागतंय त्यांना…आधीच जरा पाहून घेतल्या असत्या तर…4 पैसे जास्त गेले असते पण आयुष्यभर ऐकावं लागलं नसतं ना….बरं ते जाऊद्या…आपल्याला काय….बघितल्या का या साड्या? कोणत्या काढू सांगा…” (कमी किमतीचा माल खपू नये म्हणून अप्रत्यक्षपणे संदर्भासहित स्पष्टीकरण)

“अं??…नको…या नकोत…जरा चांगल्या दाखवा…500-600 पर्यंत असल्या तरी चालतील….” (स्नेहा च्या काल्पनिक प्रसंगाचे व्रण खोलवर गेले)

“या घ्या, फारच सुंदर आहेत या साड्या, तुमच्या विहिनबाई तर जाम खुश होतील…खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत…800 च्या आहेत हो पण तुम्हाला म्हणून 650 ला देते…(मूळ किंमत 400 रुपये)

650?? परवडणार नाहीत हो….खूप साड्या हव्या आहेत…

“लगेच कोण पैसे मागतंय? लग्न वगैरे आटोपलं की उरलेले पैसे द्या…तसंही तुमचा मुलगा सचिन चा मित्रच आहे… तुमच्याकडे येणं जाणं चालूच असतं त्याचं….(पैसे बुडवायचा विचारही डोक्यात येऊ नये म्हणून ही सौम्य ताकीद)

मालती ताई खुश…या 15 साड्या द्या पॅक करून…

ठीक आहे…

तुमच्या त्या मामेबहिणीच्या जावेचं काय झालं? गरोदर होती ना ती? (गिर्हाईकाची संपुर्ण वंशावळ पाठ)

मुलगा झाला तिला…येईल ती पण लग्नाला…

अय्या तिलाही घ्यायची राहिलीच की…
आणि तिच्या आईला, काकुला..सुमती ताई अजून 5 साड्या पॅक करा…(वंशावळीचा गृहपाठ आधीच झालेला असल्याने मिशन फत्ते)

थोड्या वेळात अलका च आगमन..

“ये अलका, तुझीच आठवण काढलेली काल… बोल काय दाखवू?”

“ड्रेस मटेरियल दाखवा छानसं…”

“हे बघ, हा कलर खूप चालतोय सध्या….दोनच पीस बाकियेत याचे…”

“याची लांबी जरा कमी वाटतेय…”

“अगं आलिया ने नाही का त्या सिनेमात शॉर्ट पंजाबी घातलेला, तोच प्रकार आहे…शॉर्ट पंजाबी साठीच असतं हे मटेरियल…कसली दिसली होती आलिया त्या मुव्हीत…”

अलका ला तो ड्रेस बघून आलिया बनल्याचा भास होऊ लागला…

तेवढ्या वेळात सुमती ताईंनी मटेरियल पॅक करून अलका च्या हातातही दिले…

अलका अजून त्या आलिया च्या भासात होती, त्याच धुंदीत पैसे देऊन बॅग घेऊन निघूनही गेली…

नंतर एकदम 5 बायका मध्ये आल्या, साड्या घ्यायला..घ्यायची होती एकीलाच, पण तिला मार्गदर्शन करायला इतर चार जणींनी गर्दी केली…

प्रत्येकीची डिमांड वेगळी असणार आणि संपूर्ण दुकान पालथं करायला लावणार याचा अंदाज सुमती ताईंना आला…

त्यातला एकीला, शकुंतला बाईला त्या म्हणाल्या…

“ताई तुमचं फार कौतुक हो आम्हाला, किती तो सासुरवास काढला तुम्ही, काय काय सहन केलंत बाई तुम्ही…कुणालाही जमलं नसतं एवढं…”

बस्स…सुमती ताईंनी जशी काडी टाकली तशी शंकूतला बाई पदराचा कोपरा आधीच पूढे घेऊन बसली…आणि त्यांचा संपूर्ण भूतकाळ सांगायला लागल्या, त्यांचं बोलणं देहभान विसरून इतर 3 बायका ऐकू लागल्या, तेवढ्या वेळात सुमती ताईंनी जिला साडी घ्यायची तिला साडी पसंद करून देऊन पॅक करून दिली….आणि अशा प्रकारे होणारा पसारा टाळला….

त्या गेल्या आणि नंतर एक कॉलेज सुंदरी आत शिरली…
तिला काही पसंत पडत नाही असं लक्षात येताच सुमती ताईंनी आपली strategy चालवली…
“किती साधी राहतेस तू, तरीही खूप छान दिसतेस…तुला पाहिलं आणि मला करीना ची आठवण झाली बघ…जब we met मधली..तिच्यासारखाच एक ड्रेस आहे बघ माझ्याकडे….तुला कसला भारी दिसेल….”

दुसऱ्या सेकंदाला माल खपला म्हणून समजा…

येणाऱ्या प्रत्येक कस्टमर ची आपुलकीने चौकशी करणे, त्यांचा घरातील इथंभूत माहिती ठेवणे, प्रत्येकाची आवड जाणून असणे आणि कितीही पसारा काढून ठेवला आणि साडी न घेता परत गेलं तरीही न वैतागून परत या सांगणाऱ्या सुमती ताईचा बिझनेस अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहोचला….2 खोल्यांचा जागी 5 खोल्यांचा बांगला बांधला…चारचाकी आणली, मुलांना शिक्षणाला बाहेरगावी पाठवलं…पण इतकं करूनही पाय जमिनीवरच…

“कालच तुमची आठवण काढली” या वाक्याने समोरच्याला वाटू लागलं की आपण यांच्यासाठी खुप खास आहोत, मग साडी साठी दुसरीकडे जाणं पसंत नव्हतंच…आपली वट दाखवण्यासाठी कस्टमर अजून 4 बायका घेऊन येई….

खरं तर सुमती ताईंकडून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक तरुणाने धडे घ्यावे असं मला मनापासून वाटतं… कुठल्याही मॅनेजमेंट चे धडे माहीत नसताना, कुठलाही बिझनेस चा अभ्यास नसताना सुमती ताईंनी त्यांचा क्षेत्रातील प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला मागे टाकलं होतं….

कशी वाटली ही बिझनेस वूमन? नक्की सांगा…

आणि असेच लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला नक्की लाईक करा….

  1. https://m.facebook.com/irablogs
Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत