“बिना कांद्याची चीझवाली पावभाजी…!” #recipe

Written by

“बिना कांद्याची चीझवाली पावभाजी…!” #recipe

नमस्कार! 🙏 आज आपण पाहणार आहोत “बिना कांद्याची चीझवाली पावभाजी…!” ‘पावभाजी’ हा सगळ्या मुलांचा आवडता मेनू. ज्यांची मुले लहान आहेत त्यांच्याघरी आठवड्यातून एकदा तरी नक्की पावभाजी केली जाते. माझ्या मुलीलाही पावभाजी खूप आवडते त्यामुळे बऱ्याचदा करणं होतं आणि विशेष म्हणजे त्यानिमित्ताने काहोईना पण सगळ्या भाज्या खाल्या जातात. बऱ्याचदा आपल्या बायकांना प्रश्न पडतो की काय करु जेवायला…? 🤔 म्हणजे फ्रीज भरलेला असला तरीही प्रश्न पडतो बरं!

काल माझेही असेच झाले. “काय करू….,🤔 काय करू…” 🤔 पण सुचत काहीच नव्हते.
लेकीलाही सुट्टी होती(शनिवार-रविवार तिच्या शाळेला सुट्टी असते)… त्यामुळे ती घरी होती. काय करू प्रश्न पडलाच होता की इतक्यात लेकीची ऑर्डर आली…

“आई, आज पावभाजी कर… पोळी भाजी नको”. म्हटले, “चला, हे एक बरे झाले… म्हणजे आजचा दिवस चांगला जाणार तर!” (पावभाजी केली की माझी मुलगी दिवसभर अगदी शहाण्या मुलीसारखी वागते😍) “पण भाज्या आहेत का घरात?”, मी मलाच विचारले. 🤔

फ्रीज मध्ये बघितले तर सगळ्या भाज्या थोड्या-थोड्या होत्या… “चला आत्ताचे काम तर झाले”…. असे म्हणून सगळ्या भाज्यांना बाहेर काढले. फ्लॉवर.. सिमला मिरची.. गाजर.. मटार.. टोमॅटो आणि बटाटेही होते. “अपूर्व पावभाजी मसाला” घरात होताच… फक्त पावलादी.. बटर आणि चीझ आणायचे बाकी होते… तेही आर्याच्या बाबांनी आणून दिले.

आमच्याकडे या बाबालोकांचे एक बरे आहे खाण्याचे नखरे नाहीत. “अन्न हे पूर्णब्रम्ह”.. समजून मी जे बनवते ते जेवतात… पण लेक मात्र चवीने खाणारी आहे… म्हणजे अगदी दडपे पोहे करताना सुद्धा, “थोडं लिंबू जास्त घाल हं आई.. थोडी साखरपण जास्त घाल आणि जरा तिखट बनव”… अशी ऑर्डर देऊन जाते.

शिवाय पावभाजी असते त्यावेळी तिला चीझ आणि लिंबू हे हवंच. वर शेरा हा असतोच… “मम्मा( लाडात आली की मम्मा असते, कधी-कधी मम्मूडीही होते) तुझी पावभाजी छान होते… Yammy! I like it”. मग मलाही गालातल्या गालात हसू येतं☺ आणि अंगावर मूठभर मांस चढल्याचं फील येतं. 🤗

यातून एक गोष्ट उमगलीय मला कि आपण आया जेव्हा एखादा पदार्थ बनवतो… तेव्हा तो बनवताना आपल्या मुलांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर असतात… कारण त्यांच्या आवडीचं आपण बनवत असतो. तो पदार्थ बनवताना मुलांविषयी वाटणारं प्रेम आपल्याही नकळत त्या पदार्थात मिसळत असतं आणि म्हणून तो पदार्थ खूप चवदार होतो.

मुलं पोटभर, आवडीनं जेवली की आपण आया अगदी तृप्त 😍 होतो. माझी आई काय, मी काय किंवा तुम्ही सगळ्याजणी काय.. हा अनुभव घेत असालच! 🤗 🤗

चला, मी बोलायला लागले की थांबणं मुश्किल होतं… आपण पावभाजी करतोय ना! तर आता इथे आपण कांदा वापरणार नाही तर बिनाकांद्याची पावभाजी करणार आहोत. एकदा कांदे खूप महाग होते आणि घरातील कांदे देखील संपले होते… त्यामुळे बिनाकांद्याची पावभाजी केली आणि अतिशय सुंदर झाली.

तेव्हा पासून मी पावभाजीत कांदा वापरत नाही… तसेही सध्या कांदे खूप महाग आहेत. तुम्हीही करून बघा एकदा… चवीतला फरक तुमच्या लक्षात येईल आणि आले लसूण वापरले नाही तर चातुर्मासात देखील चालते… जे चातुर्मासात कांदा-लसूण वर्ज करतात त्यांच्यासाठी… मात्र सध्या चातुर्मास नाहीये.

चला साहित्य तर तयार झाले सांगून… आता कृती वळूयात… 😊 

कृती :

● सर्व भाज्या(थोडा फ्लॉवर, 2सिमला मिरची, एक गाजर, दोन टोमॅटो, 3 मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडा मटार) धुऊन, बारीक चिरून कुकरमध्ये घातले, टोमॅटो ही दोन भाग करून भाज्यांवर ठेवला आणि कुकरचे झाकण लावून भाज्या शिजवून घेतल्या.

● तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात थोडे आले, लसूण आणि कोथिंबीर चे वाटण करून ठेवले.

● कुकरची वाफ गेल्यावर झाकण उघडून कापलेल्या टोमॅटोवरील साल अलगद काढून टाकले आणि बटाट्याची सालं कडून बटाटा वेगळा स्मॅश करून घेतला. सर्व भाज्या हॅन्ड मिक्सीने ब्लेंड केल्या. (हॅन्ड मिक्सी नसेल तर भाज्या मिक्सरला फिरवा अथवा मॅश कराव्यात)

● गॅसवर एका मोठ्या कढईत तेल आणि थोडे बटर घातले… नंतर त्यात हिंग, हळद आणि आले-लसणाचे वाटण घालून थोडे परतले..

● यानंतर यात “अपूर्व पावभाजी मसाला” घातला. (माझी मैत्रीण मृणाल म्हैसकर हिची कंपनी आहे “ट्रायो इंटरनॅशनल” धायरी पुणे येथे… त्यांचे “अपूर्व मसाले” आहेत… हल्ली सिरीयल मध्ये आपण जाहिराती बघतो ना.. तसा एक माझ्या लिखाणातून प्रयत्न… 😉😎 “मैत्री के लिए सबकुछ… चालत है ना!”)

● त्यानंतर ते थोडे परतले कि त्यात भाज्यांचे बॅटर आणि मॅश केलेला बटाटा घालून चमच्याने चांगले हलवून घेतले.

● मिश्रण थोडे घट्ट वाटल्याने त्यात थोडे पाणी घातले. यानंतर त्यात मीठ आणि खायचा टोमॅटो रेड कलर थोड्याशा पाण्यात मिक्स करून घातला. (या भाज्यांमध्ये बिट वापरले तर खायचा कलर घालण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु माझ्याकडे बिट नसल्यामुळे मी कलर वापरला)

● आणि झाकण ठेवून एक उकळी आणली… यानंतर वरून कोथिंबीर पेरली आणि गॅस बंद केला.

● दुसरीकडे पावांना बटर लावून ते तव्यावर चांगले भाजून घेतले आणि भरपूर चीझ घालून… लिंबू (अन ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठी कांदा) सोबत सर्व्ह केली… “चिझी पावभाजी”…!

“मैं भी खुश, लेक भी खुश और लेकीचा बाबाही खुश…!” 😍🤗

तुम्हीही करून बघा… “बिनाकांद्याची चिझी पावभाजी…!” 👍👍

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर…✍

Article Categories:
इतर

Comments are closed.