बेंदूर

Written by

कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशात ‘बेंदूर’ या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी बांधव अतिशय उत्साहात हा सण साजरा करतात.
आज बेंदूर हा सण आहे, व आज मला प्रकर्षाने आठवतोय आमच्या लहानपणचा बेंदूर. आमचे एकत्र कूटुंब होते. सर्व बहिणी भावंड अभ्यासात चांगली रमली होती पण आमचा मोठा भाऊ आबा तो मात्र बैलांशी हितगुज साधत असायचा. नांगरट, कुळवट करायला मोठ्या माणसांबरोबर शेतात जायचा. तो शाळा सोडून शेतीतच रमला.
घरचा गोठा गाई-म्हैशी या दुभत्या जणावरांनी भरलेला होता. एक बैलांची जोडी ही होती. त्यांचं नाव राजा आणि सर्जा अस होते. या बैलांशी आबाची चांगलीच गट्टी जमली होती. राजा मारकुटा होता, पण आबा त्याच्या पुढे गेला की तो एकदम शांत व्हायचा. या जोडीबरोबरच तो गडी माणसांबरोबर शेतात जायचा. त्याचा या जोडीवर खुप जीव होता. बेंदुर सण आला की तो अतिशय उत्साहाने त्यांना सजवायचा. तेव्हा आम्ही सर्व बहिणी-भावंड बैलांची सजावट बघत बसायचो.
हा सण दोन दिवसांचा असतो. पहिला दिवस खांदेमळणीचा असतो. यादिवशी वर्षभर शेतात कष्ट केलेल्या बैलांच्या खांद्याला कोमट तेलात हळद मिक्स करून मालीश केली जायची. त्यांना यादिवशी हक्काची विश्रांती असायची. त्यांना गरम पाण्याने आंघोळ घातली जायची. त्यांच्यासाठी घरात ऊंडे बनवले जायचे ते त्यांना खाऊ घातले जायचे. शिंगात कडबोळी अडकवली जायची.
दुसरा दिवस हा मुख्य बेंदुर सणाचा. सकाळपासूनच बैलांना सजवण्यासाठी चढाओढ लागलेली असायची. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कातडीवर रंगीबेरंगी ठिपके काढले जायचे. त्यांच्या अंगावर सुंदर नक्षी, फुले काढण्यासाठी भेंडीचा अन कांद्याचा वापर व्हायचा. शिंगांना रंग देऊन वरून सोनेरी बेगड लावली जायची, गोंडे बांधले जायचे. लाकडी ट्रंकेत ठेवलेल्या सुंदर नक्षीकाम असलेल्या रंगीबेरंगी झूली त्याचदिवशी बाहेर निघायच्या. या झुली बैलांच्या मिरवणूकीच्या आधी त्यांच्या अंगावर चढवल्या जायच्या. कपाळाला बाशिंग बांधुन नववधूसारखा त्यांचा साज शृंगार केला जायचा.
आमचे चुलत आजोबा आण्णा पळसाच्या मुळया ठेचून त्याच्या पासून चावर बनवायचे. व हे चावर बेंदरा दिवशी शेताला घातले जायचे. शेत व शेतांच्या अवजाराची पुजा व्हायची. बैलांना गोडधोड पुरणपोळी खाऊ घातली जायची. व नंतर कुटुंबियांच एकत्र जेवण व्हायचं.
दुपारी तीन वाजल्यापासून बैलांच्या मिरवणूकीला सुरवात व्हायची. प्रत्येक घरात एक बैलजोडी असायचीच. गावातील सगळ्या शेतकऱ्यांच्या बैलजोड्या एका विशिष्ट जागी एकत्र ओळीने उभ्या केल्या जायच्या. संपुर्ण गावातुन बैलांची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढली जायची. लहान-मोठी मुले, शेतकरी गुलाल उधळत आनंदाने बेभान होऊन नाचायचे. ही मिरवणूक मंदिरापर्यंत जायची, देवदर्शन घेऊन ही मिरवणूक गावातून फेरी मारत आपापल्या घरी परतायची. घरी आल्यावर घरातिल स्त्रिया बैलांना ओवाळून सुग्रास भरवायच्या.
अशा पध्दतीने मोठ्या उत्साहात हा सण साजरा व्हायचा. कुंभाराने दिलेल्या मातीच्या बैलांची ही पुजा केली जायची.
आज ही हा सण गावोगावी उत्साहाने साजरा केला जातो. पण पुर्वीइतका नाही. बैलांची जागा आता या आधुनिक अवजार,ट्रॅक्टरनी घेतली आहे.
असा हा शेतकऱ्याचा महत्वाचा सण.आपल्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलांना जीव लावतात. नाव ही छान राजा, सर्जा अशी असायची.
ज्यांच्या मदतीने शेतात श्रम, काबाडकष्ट केले जाते त्याची परत फेड म्हणून, आपल्या प्रिय बैलांप्रती कतृज्ञता व आत्मियता दाखवण्याचा हा दिवस.
सध्या गावांचही शहरीकरण होऊ लागलय. गावातही मोजक्या लोकांकडेच बैल आहेत. अगदीच खेडेगावात मात्र अजुनही शेतकऱ्यांकडे बैलजोड्या आहेत. हरीत पट्टा असलेल्या आमच्या सातारा जिल्हयातील बरेच व्हिडीओज आज ग्रुपवर आले. अजुनही त्याच उत्साहाने, बऱ्याच गावी बैलांची मिरवणूक निघतेय हे पाहून मनाला समाधान वाटले

‘तुझ्या अपार कष्टांन !
‌   बहरते सारी भुई !
‌   एका दिवसाच्या पुुजेने !
‌    होऊ कशी  उतराई  !’

‌    असा हा श्रमाची मंहती सांगणारा पूजनीय दिवस बैल पोळा अर्थात बेंदूर.

(गेली सत्तावीस वर्ष मी शहरात राहते.पण मला माझ्या लहानपणीचा बेंदुर अजुनही आठवतोय)

सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव …

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा