बेबीवन्स जिंदाबाद

Written by

#बेबीवन्स_जिंदाबाद

अहो भाजी कुठची करु आज?

कर गं तुला हवी ती कर.

असं कसं मग पानावर बसलात की बरं नाक मुरडता.

कधी गं मुरडलं नाक मी?

उगा आपला साधासुधा नवरा भेटलोय म्हणून कायचेकाय बोलते.

हो,हो तुम्हीच साधेसुधे.

म्हणजे?म्हणजे काय म्हणायचं काय तुला?

वन्संनी सांगितलेत मला तुमचे सगळे पराक्रम.

का..काय सांगितलन त्या बेबडीन.
येऊदेच तिला धोबीपछाड देतो बघ.

अहो तसं जास्त नाही काही,ते तुम्ही गच्चीवर जाऊन खाली चालणाऱ्या मुलींवर कागदाची विमानं फेकायचा.

शे शे अगं तो खेळ होता.

कायच्याकाय सांगते ही बबडी..वड्याचं तेल वांग्यावर.

आणि ते रोजडेला दहा लाल गुलाबं घेऊन गेलेलात म्हणे कॉलेजात.कुणीकुणीच घेतली नाही म्हणे.सगळी बिचाऱ्या बेबीवन्संना माळावी लागली.त्या फुलवाल्या प्रेमावरपण लाईन मारायचा म्हणे.

प्रेमा..ती जाडी.

अहो तेंव्हा सडपातळ होती म्हणे.तुम्ही तिच्या आईचे फुलांचे ठेलेसुद्धा उचलायला मदत करायचात म्हणे पण मेली डाळ काही शिजली नाही तुमची.

अजून काय काय अफवा पिकवल्या आहेत बेबड्याने?

बेबी ताई म्हणत होत्या की तुम्हीम्हणे सुंदर मुलींचं प्रभातकाळी दर्शन व्हावं म्हणून आपली व शेजारच्या दोघातिघांची दूधाची कार्ड व बाटल्या घेऊन लाईनमध्ये अर्धाएक तास घालवत होतात.

तसंच वाण्याची पोरगी पुष्पलतिका,तिला नोटांवर कायच्याकाय लिहून द्यायचात.उद्या भेट वगैरे.एकदा पुष्पलतिकेऐवजी तुमच्या हातातली ती नोट वाण्याने घेतली आणि भर चौकात बीन पाण्याची केली म्हणे तुमची.

पुरे आत्ता पुरे.जा हो स्वैंपाकाला.खूप बोललीस.तुम्हाला दोघींनाही बघूनच घेतो.

अहो बेसनाचं पीठलं टाकू का?

आत्ता टाकतेस कशाला.शिजव की.काय तुझी भाषा?

माझी आपली अशीच.अहो,पण त्या बाजूच्या सुमा वनसंच्या हातचं पीठलं तुम्ही बोटं चाटून चाटून खायचात म्हणे.

नकोच मला पिठले गडे मी खातो चपाती अन् लोणचे परि तू गप्प बसण्यास काय घेशील बरे?

काही नाही जास्त हं.इथे रस्त्यापलिकडे,महादेव हॉलमध्ये सेल लागलाय ग्रुहोपयोगी वस्तूंचा थोडी शॉपिंग करीन म्हणते.जास्त नको पाच हजार रुपयेच द्या हं.

झाडाला लागतात का पैसै,उठसुठ सेलवर घालवायला.कोणकोणाला फुकट देत नाहीत.तुमचा कच्चा मेंदू पाहून गंडवतात तुम्हा बायकांना आणि तुम्ही गंडता.

नकाच देऊ तर.मी आपला गोट्या आला नं की त्याला तुमचे पराक्रम रंगवून सांगते अगदी.

कसले पराक्रम?

हेच बेबीवन्संनी सांगितलेले..प्रेमा,पुष्पलतिका,सुमा..अजुनही आहे डझनभर प्रेयसींचा रेकॉर्ड माझ्याकडे.बेबी वन्स सगळं सगळं तपशीलवार सांगतात हो.उगा नाही मी त्यांना छान छान गीफ्ट देत.अशा आतल्या गोटातल्या खबरी मिळतात मला त्यांच्याकडून.

म्हणजे तू त्या बेबडीला लाच देते तर.

तसं समजा हवं तर.

गोट्या ए गोट्या

अगं बाई हे सहा हजार घे पाचाऐवजी.पाया पडतो तुझ्या.मुलासमोर माझ्या इज्जतीचं खोबरं नको करुस बये.

हाऊ स्वीट अऑफ यु माय डिअर हजबंड!
बेबीवन्स जिंदाबाद!

—–गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा