बोबडे बोबडे बोल…. वाटे किती गोड ?

Written by

मी पणित खाणार, मला पण पणित पाहिजे…..

काय खाणार?

पणित

म्हणजे काय?

ते ताई खातेय ना ते

????????

पाहिले आम्ही पोटभर हसून घेतलं……

त्याचं काय आहे ना आमच्या बाब्याच्या काकाचं नाव प्रणित आहे……….खूप वेळा कानावर पडलेलं

आणि त्याला खायचं होत पनीर…….पण ते ओझरतं कधीतरी ऐकलेलं

डोक्यात शब्दांचा लोचा होऊन त्याने पनिरला पणित बनवलं……..

त्याच्या वर्गात एका मुलाचा वाढदिवस होता, त्याने नाचत नाचत गिफ्ट बाहेर काढलं,आम्ही विचारलं कोणी दिल रे?

तर तो म्हणाला जिराफने

जिराफने ?

हो त्यानेच दिलं, आम्ही त्याला हॅपी बड्डे केलं?

शेवटी उत्सुकतेने दुसऱ्या दिवशी मी टिचरलाच विचारलं तर कळलं बड्डे बॉय होता चिराग?

काsssय ऐकतील आणि काssssय बोलतील ?

माझी मुलगी मम्मा मम्मा किंवा मम्मी बोलावते तर ते ऐकून तो सुरवातीला मला बम्मा बम्मा करायचा……..

रिमोटला कसं काय कोण जाणे इम्पू म्हणायचा, हे इम्पू प्रकरण आम्हाला समजेपर्यंत आम्ही येडे व्हायचे बाकी राहिलो होतो………समोर असला तर ठिक, बोट दाखवलं तर कळायचं पण कुठे दुसरीकडे असेल तर मात्र सुरुवातीला आमची ट्यूब पेटता पेटायची नाही……..

पण आमच्या घरी रिमोटला कायमचं एक नाव चिकटलय ते म्हणजे चिमोट……माझ्या मुलीने तिच्या लहानपणी ठेवलेलं…….आता ती सातवीत गेलीये तरीही आम्ही चिमोट चिमोटच करत असतो. आमचा आवडता शब्द आहे तो चिमोट?

हिरोईनला आम्ही म्हणतो हिरवाईन…….टिश्शु पेपरला आम्ही म्हणतो पिश्शु पेपर 

नामकरण बाय पोरगी………मला पिश्शु पेपर ऐकताना छान वाटायचं म्हणून तिला सांगितलंच नाही कधी.  नंतर तर तिच कन्फ्युज झाली आणि म्हणाली सांग ना खरं काय म्हणतात ते आणि मी म्हणाले कोणी काहीही म्हणोत आपण पिश्शु पेपरच म्हणुया.

लवकरच्या जागी आमच्या तोंडात लोलकर हाच शब्द बसला आहे ……तिचाच

लोलकर चला लोलकर ?

ती लहान असताना असाच एक भन्नाट किस्सा घडला होता…….

तिने तिच्या आजोबांना आईसक्रिम आणायला सांगितलं.  कुठलं तर टोमॅटो आईसक्रिम
त्यांनाही वाटलं ती सांगतेय तर असेलही…..

दोन तीन दुकानात त्यांनी विचारलं टोमॅटोचं आईसक्रिम आहे का ?…..पण ते कोणाकडेही नव्हतं, दुकानदार म्हणायला लागले असं आईसक्रिम आम्हाला नाही माहीत?

इकडे तिला तर फक्त तेच आईसक्रिम हवं होतं?

शेवटी त्यांनी वैतागून मला ऑफिसमध्ये फोन केला, आणि विचारलं हे टोमॅटोच आईसक्रिम कुठे मिळत ग?

मी म्हंटलं टोमॅटोsss हे आईसक्रिम आम्ही नाही खाल्लं कधी?

पण कशी काय जाणे माझी वेळेला ट्यूब पेटली आणि मी म्हटलं कॉर्नेटो असेल कॉर्नेटो…..

टोमॅटो नामधारक कॉर्नेटोने आजोबांची सुटका केली एकदाची!!!

आपल्या बोलण्याकडे यांचे कान तर कायम असतातच असतात……..

कधी आपण एखादा मोठा इंग्लिश शब्द वापरला तर तो लक्षात ठेवून तुटका मुटका कुठेतरी चिकटवतात….. आणि जो पर्यंत आपल्याला भावना पोचत नाहीत तोपर्यंत आपला जीव खाणं काही सोडत नाहीत.

डोनलेड, युबेसबी, कॉंकी (कॉम्प्युटर), मोबील, फोटू, मिसकर,आसकीडेंट,लिसटिप हे आमच्या बाब्याचे आम्हाला ऐकताना मजा येणारे रोजचे शब्द…….

खरंच लहान मूलं बोलायला लागली की खूप धम्माल येते…….आणि कधीकधी ते नेमकं काय बोलतायत हे कळून घेण्यासाठी आपली मात्र तारांबळ उडते……

पण एकंदरीत त्यांचे बोबडे, गोड गोड बोल लाईफमध्ये गंमत आणतात हे नक्की…….

कानाबरोबर मनातही साठवले जातात अगदी कायमचे!!! कोणी म्हटलंय………

बोबडे बोबडे बोल, आईला वाटे अनमोल !!!

पण मला वाटतं बोबडे बोल फक्त आईलाच नाही तर घरातल्या प्रत्येकालाच अनमोल वाटतात…….सर्वांनाच आनंद देतात………..

तुम्हालाही हसवून सोडलं असेलच ना या बोबडकांदयांनी ……सांगा बघू तुमची पण गंमत!!!

 

©️स्नेहल अखिल अन्वित

 

 

 

 

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा