भेट

Written by

 

दोन मैत्रिणी कॉलेज नंतर खूप वर्षांनी सोशल मिडियावर भेटल्या.
फोन नंबरची देवाणघेवाण करून त्यांनी एका सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं.
जवळ जवळ पंचवीस वर्षानी भेटणार होत्या त्या!!
ठरलेला दिवस आला, ठरलेल्या वेळेत निघून दोघी ठरलेल्या ठिकाणी पोचल्या.
दोघींचा पेहराव आपापल्या परिस्थितीनुरूप होता.
हायफाय मॉडर्न नेत्रा, तशी मॉडर्नच पण डिसेंट क्षमा.
नेत्राच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचा तोरा तर क्षमाच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं.
दोघी जवळच्याच एका बागेत गप्पा मारत बसल्या.
जुन्या आठवणी काढल्या गेल्या. कॉलेजमधल्या गमती जमती निघाल्या. नेत्राने कॉलेजमध्ये किती जण तिच्यावर फिदा होते, याची लिस्ट आठवून आठवून क्षमा समोर मांडली.
क्षमाने, माझं कॉलेजमध्ये ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याशीच लग्न झालं, हे आवर्जून सांगितलं.
नेत्राने काही कारणानिमित्त बॅग मधून मोबाईल काढले. दोन्हीही भारी मॉडेल, एक आयफोन तर दुसरा असाच महागडा.आयफोन आदल्या दिवशीच खरेदी केलेला, तो क्षमाला दाखवला. क्षमाबरोबर एक सेल्फीसुद्धा काढला.
क्षमाने तिच्या पर्समधून तिचा नेत्रापेक्षा खूप पटीने साधा असणारा फोन काढला आणि त्यातले आपल्या दोन सोन्यासारख्या मुलांचे फोटो दाखवले.
नेत्राचे दोन्ही फोन त्यापुढे फिके पडले!!
नेत्रा पुढे तिच्या नोकरीबद्दल सांगू लागली, नामांकित कंपनीत मोठ्या पोस्टवर होती ती.
क्षमा मुलांसाठी घरी राहूनच स्वतःचा नृत्याचा छंद जोपासत होती. महिन्यातून दोनदा अनाथ, मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना गाणी म्हणून दाखवत होती, त्यांना गोष्टी सांगत होती. त्यांचे नाच बसवत होती. पण तिने यातलं काहीच नेत्राला सांगितलं नाही.
नेत्रा नोकरीविषयी, मिळणाऱ्या मोठया पगाराविषयी तर क्षमा तिच्या घरच्यांविषयी, तिच्या जिवलगांविषयी भरभरून बोलत होती.
दोन तासात नेत्राच्या महागड्या मोबाईलवर एकाचाही फोन आला नाही. आणि क्षमाच्या फोनवर मात्र नवऱ्याचा, मग मुलांचा, अगदी तिच्या जवळच्या मैत्रिणीचा सुद्धा फोन आला.
दोघी नंतर हॉटेलमध्ये गेल्या. क्षमाने सुचवलेलं हॉटेल नेत्राला रुचलं नाही, तिने तिच्या स्टेटस प्रमाणे हॉटेल निवडलं.
क्षमाने कधी नाव न ऐकलेले पदार्थ नेत्राने ऑर्डर केले होते, पण क्षमाने मात्र नेहमीची तिची आवडती डिश मागवली.
मनापासून खाल्ली, सगळी संपवली.
नेत्राला मात्र मागवलेलं एवढं खाणं जड होऊ लागलं. तिने सारं चिवडल्यासारखं केलं, आणि जाईना म्हणून टाकून दिलं.
आता निरोपाची वेळ आली तेव्हा, क्षमाने नेत्राला स्वतःच्या हाताने बनवलेला एक सुंदरसा शो पीस गिफ्ट केला.
आणि नेत्राने मला असं काही सुचलं नाही म्हणून दिलगिरी व्यक्त केली.
पण जाताना शेवटी नेत्रा म्हणालीच, छान वाटलं ग तुला भेटून. कॉलेजमध्ये एवढी मुलं मागे होती, पण मी कोणाकडे बघितलेच नाही कधी. मी नेहमी स्वतःकडेच बघत राहिले. शिक्षण झाल्यावर स्वतःचं एक उत्तम करियर हवं होतं मला. पैसे असले की सर्व मिळतं असं वाटायचं नेहमी मला. खूप पैसे हवे होते मला. त्याच्याच पाठीमागे लागले सर्व सोडून.
लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं त्यातच, आईवडील मागे लागायचे, अन् मी त्यांना झटकून टाकायचे.
आता तेही नाहीत, आणि कोणीच नाही.
एवढे पैसे आहेत तर आता असं वाटतं कोणी पैश्यासाठीच लग्न करेल माझ्याशी, खऱ्या प्रेमासाठी नाही. कोणावर विश्वासदेखील बसत नाही या पैश्यापायी.
आज तुझा संसार, तुझ्या माणसांबद्दल ऐकलं आणि खरंच काहीतरी टोचलं ग……आईवडिलांचं ऐकलं असत तर आज माझंही कोणीतरी असतं!!
मलाही कोणी लवकर घरी बोलावलं असतं…….
एवढं बोलून नेत्रा भरल्या डोळ्याने आपल्या पॉश कार मधून निघून गेली.
तेवढ्यात परत क्षमाला नवऱ्याचा फोन आला, त्याने आणि मुलांनी तिला घेवून फिरायला जायचा बेत बनवला आणि ते सर्व धम्माल करण्यासाठी तिला घ्यायला येत होते.
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा😊
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा