” भो “

Written by

” घरी मोबाईल घेतला भो नविन ” ‘ हवा ना भो…. नुसता धुर …. कोणता घेतला ? ‘ ” नोकिया 3110 C , पाच हजाराचा आहे ” ‘ बाबो … एवढा महाग … माझ्या मामाकडे पण तोच आहे… त्याच्यात नेट पण 2G मुळे फास्ट चालतं बरका ‘ ” यायला तुला तर लैच माहिती आहे रे ” ‘ तुझा नंबर दे ना मग ‘ ” हा लिही …. 9886****** ” त्याने वहीच्या शेवटच्या पानावर नंबर लिहून घेतला… ‘ एखाद्या दिवशी शाळेत नाही आलो तर काय गृहपाठ दिला हे तुला फोन करून विचारून घेईल ‘ ” हा … कर बिनदास्त… ” कधी कधी त्याचा फोन देखील यायचा… ‘ हे बघा तुमचं बोर्डाचं वेळापत्रक बाहेर फळ्यावर लिहिलं आहे … सर्वानीं कच्च्या वहीमध्ये ते लिहून घ्या ‘ मुख्याध्यापकांनी माईक वरून सूचना दिली… मधल्या सुट्टीत फळ्याभोवती गराडा होता… एरवी सुविचार वाचायला दोन-चार पोरं सोडले तर कुणीही तिकडे फिरकत देखील नव्हतं… ” यावेळी पहिलं यायचं आहे भो … एका मार्कवरून मागच्या वेळी पहिला नंबर गेला ” ‘ हा … इज्जतीचा सवाल आहे…. सगळं ‘ पाठ ‘ करून टाक यावेळी ‘ ” तु पण अभ्यास कर… नाहीतर यावेळी पुन्हा पप्पा झोडतील तुला ” ‘ हा भो… आता तर पप्पानीं नवीन बेल्ट पण आणला आहे… अन लाईफचा सवाल आहे आता ‘ लांबून बघितलं तर ओळखीचा चेहरा वाटतं होता…. तो जवळ गेला… नजरेला नजर भिडली… आणि दोघांचे चेहरे खुलले… 6-7 वर्षांनी रेल्वेस्टेशन वर त्यांची भेट झाली होती… भरपूर गप्पा रंगल्या… ” ती कुठे असते रे सध्या ” याने विचारलं… ‘ माहित नाही भो , मी तर डिप्लोमा ला निघून गेलो होतो नंतर ‘ काही वेळ शांतता झाली … प्रवास संपला …. जो तो आपल्या वाटेला …. . . . . ‘ यायला तु खरंच पहिला आला होता … ही बघ बातमी… सांभाळून ठेवली आहे ‘ व्हॉटअपवर त्याचा मेसेज आला…बातमीच्या फोटोसहित…. बातमी , मित्राने सांभाळून ठेवलेल्या आठवणी आणि बातमी मध्ये असलेलं अजून ” एक नाव ” बघुन त्याचा काळ थांबला होता… जुन्या फोटोस मध्ये तो कुणाला तरी शोधत बसला …काही क्षणांनी मग त्याने आपल्या ‘ भो ‘ ला ” थम्ब ” सेंड केला…

Article Tags:
·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा