मनमोरा

Written by

#मनाच्या_मोरा

मनाच्या मोरा
माझ्या मनमोरा
एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात
किती रे तू अवखळ
नुसताच चंचल

उंदडतोस आमराईत
सोनिया उन्हात
गुलाबांच्या ताटव्यात
नक्षत्रांच्या अंगणात
स्वप्नांच्या गावात

आईच्या कुशीत
वाऱ्याच्या शिळीत
आभायाच्या निळीत
पावसाच्या सरीत
गुलाबी मिठीत

मनाच्या मोरा
माझ्या मनमोरा
अरे थांब ना जरा
दम घे की थोडा
क्षणभराचा विसावा
हवाय बरं तुला

मनाच्या मोरा
माझ्या मनमोरा
नीज रे जरा
तुला घालते मी वारा
वाळ्याचा पंखा
आणलाय खासा

मनाच्या मोरा
माझ्या मनमोरा
का बरं रुसलास
गुपचूप बसलास
सांग की रे मला
कुणी काही बोललं का?
उगीचच डिवचलं का?

मनाच्या मोरा
माझ्या मनमोरा
का रे डोळ्यांत पाणी
सलतय का काही?
नको रे असा हरू
त्याचं घर आपण
उन्हातच बांधू
येईल तुझ्या गालात
मग खुदकन हासू

—–गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा