मनातलं बोलणारी डायरी

Written by

नववर्ष म्हटलं की दरवर्षी जुनेच संकल्प नव्या जोमाने आपण करतो. मनुष्यप्राणी हा आरंभशूर आहे.त्यामुळे नव्या वर्षाच्या उत्साहाच्या भरात एक जानेवारीपासून या संकल्पांची पूर्तता करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. साधारणतः दहा पंधरा दिवस उलटल्यानंतर त्या संकल्पांना काहीच दिशा उरत नाही आणि त्यांचा समारोप होतो. आता हे दरवर्षीचे संकल्प कोणते असतात ते सर्वांना ज्ञात आहेच. सकाळी लवकर उठणे,रात्री लवकर झोपणे, दररोज व्यायाम करणे, जंकफूड न खाणे इ. या यादीतला अजून एक संकल्प जो कधीच तडीस जात नाही, तरिही हे शिवधनुष्य पेलण्याचा आपणापैकी सर्वच कधीनाकधी प्रयत्न करतात, तो म्हणजे दररोज डायरी लिहिणे. 😀
आता नववर्ष सुरू झालं की, स्टेशनरीच्या दुकानातल्या डायर्‍या नाही म्हटलं तरी खुणावू लागतात. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री कधी निद्रादेवीच्या अधीन होतो असं वाटतं. त्यात रात्री बसून टेबललॅम्पच्या मिणमिणत्या उजेडात हा उद्योग करायला कुठे वेळ मिळणार आहे,असा विचार मनात येतो. तो बाजूला झटकला जातो आणि काय हरकत आहे, बघुया की जमतं का लिहायला अशा विचाराने डायर्‍या घरी येतात.😁 बाबांच्या अॉफिमधून येणार्‍या डायर्‍या पाहून कधी कधी शाळेतल्या लहान मुलांनाही हा मोह अनावर होतो. एकुणच काय डायरी लेखनाचा उत्साहात श्रीगणेशा होतो. थोड्या दिवसांनी रोज काय तेच लिहायचं,वेगळं काही घडतच नाही राव आमच्या आयुष्यात! असा विचार डोकावायला सुरूवात होते. 😕मग काय,दहा बारा पानांतच डायरी लेखनाला पूर्णविराम. पण काहीजण असेही असतात की, ज्यांना डायरी लिहिल्याशिवाय झोपही येत नाही,अशा माणसांसाठी डायरी ही सवय बनून जाते.
खरंतर कोणताही माणूस असो प्रत्येकाला वाटतं असतं, असं कुणीतरी असावं जे आपलं आणि फक्त आपलंच ऐकून घेईल. कोणतेही विनाशुल्क सल्ले न देता, शहाणपणाचे डोस न देता आपलं म्हणणं शांतपणे ऐकेल. प्रत्येकालाच मन मोकळं करायला एक जागा हवी असते.आयुष्यातल्या व्यक्ती, प्रसंग यांच्याबद्दलचा राग,चिडचिड जिथं व्यक्त करता येईल. राग,प्रेम,आदर या न बोलता येणार्‍या भावना व्यक्त करण्यासाठी कोणीतरी हवं असतं. खरंतर जागा म्हणण्यापेक्षा डायरी ही एक व्यक्तीच बनते आपल्यासाठी. आपल्याला पुर्णतः ओळखणारी,जाणणारी फक्त आपलं ऐकणारी अशी एक मैत्रिण. 🤗आपल्या मनातलं सगळं असं उघड केल्यावर येणारा जो हलकेपणा असतो,त्याला कशाचीच तोड नाही. आपल्याला कल्पनाही नसते असं मुक्तपणे लिहिताना किती वेगवेगळे भाव उमटतात आपल्या चेहर्‍यावर.कधी अचानक भावूक होऊन डोळ्यात पाणी तरळतं. कधी हलकसं स्मित गालावर उमटतं.पण हे सगळं पाहणारं बाकी कुणी- कुण्णीच नसतं. याची एकमेव साक्षीदार असते ती म्हणजे डायरी.
बर्‍याच दिवसांनंतर मागचं एखादं पान उघडून आपण वाचू लागतो,तेव्हा कधी कधी उमगतं,अरे फारच चुकीचं वागलो आपण तेव्हा मग आपल्याच बालिशपणावर आपण हसू लागतो. एखाद्या दुःखद घटनेची नोंद जेव्हा या पानांवर उमटते,तेव्हा तेच पान पुन्हा वाचल्यावर आपण स्वतःबद्दल विचार करतो. किती मोठ्या प्रसंगातून आपण सावरलो ना! मग नवा आत्मविश्वास,नवी उमेद मिळते. आजूबाजुच्या घटना,माणसं डायरीने कधीही पाहिलेली नसतात. तरीही प्रत्येक गोष्ट तिला माहीत असते. हक्काने आपण हिच्यापाशी व्यक्त होतो. हे व्यक्त केलेलं आपलं मन इतरांनी वाचलेलं कुणालाच आवडत नाही. किंबहुना ते कुणी वाचू नये,याची दक्षता आपण घेतो. काहीजण तर या भितीपोटी डायरी लिहिणंच टाळतात. मीही याला अपवाद नाही. माझा डायरीशी परिचय झाला हल्लीच तोही कवितांच्या निमित्ताने. मे महिन्यात टाईमपास म्हणून केलेल्या कविता नंतर वाढत गेल्या. त्यामुळे डायरी घेण्याचा मोह झाला. प्रत्येक कविता मग डायरीच्या पानांवर जाउन बसू लागली. एरव्ही कुणाच्या नजरेला पडू नये म्हणून आपण डायरी सुरक्षित ठेवतो.याउलट कवितांची डायरी चारजणांना द्यावीशी वाटते. कुणीही वाचली तरी आपलं मन त्या डायरीला अन् त्यातल्या कवितेलाच माहीत असतं. सगळ्यांनाच कवितेतलं मन ओळखता येत नाही. या गंमतीमुळेच कवितेची डायरी वेगळी वाटते. अशी डायरी केव्हाही,कुणीही वाचली तरी निखळ आनंद मिळतो.🙂🙂

आवडल्यास लाईक,शेअर करा.

ब्लॉग फोलो करायला विसरू नका.😊

 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.