मागच्या वर्षी याच महिन्यात आमच्या घरी माझ्या मामे बहिणीच्या लग्नाची धामधूम होती, त्यामुळे सतत घरात लग्नाच्याच गप्पा सुरु होत्या….
अश्यातच एकदा माझं डोकं फिरलं आणि मी माझ्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला विचारलं………
अन्वित, तुझं पण लग्न करूया का रे आपण???
तर बाब्या एका पायावर तय्यार….हा मम्मी करूया!! चल पनकन चल !!!
मी आपलं मजेत विचारलं तर हा भलताच सिरीयस होऊन बसला?
मम्मी चल ना लवकर……
अरे कुठे???
लग्न करायला चल……..
मी वैतागून बोलले, अरे कोणाचं???
माझं….तू बोल्लीस ना??? ?
मी मज्जा केली रे, तू मोठा झालास की करू हा आपण तुझं लग्न ?
ना….ही…..मला आत्ताच्या आत्ताच करायचंय (रडण्याच्या कार्यक्रमाची हलकीशी झलक)
तू चल, पहिले तू चल….चप्पल घाल
बरं पण कोणाशी करायचंय तुला लग्न?????
(आता भोकाड)
अरे सांग तर……..
तू सांग व्हॅ….व्हॅ….. (पहिला मजला)
आता मला काय माहीत रे बाळराजा ?
नाही ……तूच सांगायचं
पायांच्या दणदणाटात व्हॅ…. व्हॅ …..(साधारण तिसऱ्या मजल्याच्या वर)
मला करायचंय म्हंजे करायचंय………..आत्ताच्या आत्ताच करायचंय???
पोरा आवर रे स्वतःला ……..धीराने घे की जरा
हे बघ बाळा……..
तू किनई छान छान मोठा हो , मग मी सांगेन हा कोणाशी करायचं लग्न ( जसा काही माझी आज्ञा शिरसावंद्यच मानणार आहे अगदी ?)
पुढे अखंड एक तास मी बाब्याचं लग्न पोस्टपोन केल्याबद्दल बाब्याने जोरजोरात केकाटून तीव्र निषेध व्यक्त केला. अन्नपाणी ग्रहणास ठाम नकार दर्शवला.
आणि मग धिंगाण्याच्या ओव्हर डोसामुळे, निद्रेच्या अधीन होऊन लग्नाचा विषय त्याचा त्यानेच तूर्तास बाजूला करून टाकला.
हुश्श………..
…………..
यावर्षी पुन्हा याच महिन्यात मावस बहिणीच्या लग्नाची धामधूम…….परत घरी लगीन फिव्हर…….
पुन्हा एकदा डोकं फिरवून घेण्याची लहर आली आणि देवाचं नाव घेऊन पुन्हा एकदा बाब्याला विचारलं……..
काय मग?? करायचं का तुझपण लग्न ????
आता बाब्या चक्क लाजून हसला आणि नssक्को म्हणाला
(ओह !!! एका वर्षात status change ?)
मागच्या वर्षी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या उतावळ्या नवऱ्याने यावर्षी लाजून का होईना ; पण का बरं नकार दिला असेल लग्नाला?????
काही आयडिया???????
©स्नेहल अखिला अन्वित