मरावे ! परी कीर्तिरुपे उरावे …..

Written by

“काय करायचय! सांगता का प्लीज”? तुमच्या उत्तराची कोणीतरी आतुरतेने वाट बघतय ….. डाॅक्टरांच्या ह्या वाक्याने कुमुद भानावर आली आणि परत एकदा शेवटचं विचारावं म्हणून ती परत व्याकूळ होऊन डाॅक्टरांना विचारू लागली …..

डाॅक्टर आत्ता जरा परत एकदा बघता का हो मनू ला?बघा ना काही होतय का? म्हणत ती काकुळतीला आली होती.

‘ताई मी तुमच्या भावना समजू शकतो पण आता जे आहे ते मान्य करून पुढचे निर्णय मन मोठं करून घ्या हीच विनंती करतो’, म्हणत डाॅक्टर तिथून निघून गेले.

कुमुद कितीतरी वेळ डाॅक्टरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे हताश होऊन पहात होती. नंतर तिच्या नवरयाकडे रोहीतकडे तिने अश्रुभरल्या नजरेने पाहिलं. जड झालेल्या पावलांनी रोहीत उठला. उठता – उठता मधेच तो बसला आणि परत उठण्यासाठी कष्ट घेत तो कुमुदजवळ आला आणि त्याने तीला घट्ट मिठी मारली आणि अश्रुंना मनसोक्त वाहू दिलं. वयापेक्षा कितीतरी पटीने रोहीत आज म्हातारा वाटत होता. लेकीसोबत घालवत असलेल्या क्षणात तर तो खुपच तरूण वाटायचा आणि आज हे असं …..कसं झालं …..

कुमुद उठली आणि आयसीयूतल्या तीच्या मुलीबरोबर काही वेळ एकटं घालवण्यासाठीची परमीशन तिने तिथल्या डाॅक्टरांकडून घेतली अर्थात आतले कॅमेरे चालूच असणार होते म्हणून तीची प्रत्येक गोष्ट टिपली जाणार होती. कुमुद जड झालेल्या शरीराने बेड जवळ असलेल्या एका स्टूलवर बसत आपल्या लेकीच्या भरपूर मशीनींनी जोडलेल्या शरीराकडे हताशपणे पहात होती डोळ्यांत अश्रूंनी परत गर्दी केली.आणि कुठूनतरी मनूचे बोबडे बोल कानात घुमू लागले……..

काय ग् आई ! हा वाला अथा का व्हातो? पानी कुठनं पलतं? भुक्की का लागते? तु आनी बाबा एवढा मोठा का आहे मीच का छोटीये ? छांग न ग् आई …आई ग् छांग न् ……जा मंग मी की नई कत्तीच होते जा …..

छोटीशी मनाली तीन वर्षाची झाली आणि रोजच असले प्रश्न विचारून नुसतं भांडाऊन सोडायची. जमेल तशी उत्तरं देत कुमुद तीची ब्रेन ची भुक भागवत होती. तिच्यासाठीच आता ती परत अभ्यास करायला लागली होती कारण मनालीची बुध्दी अतीशय तल्लख होती थातुरमातुर कारणं तीला पटायचीच नाही आणि जो पर्यंत तीचं समाधान होत नव्हतं तोपर्यंत ती थांबायची नाही.

लग्नाच्या तब्बल चौदा वर्षानंतर कितीतरी ट्रीटमेंट घेऊन कुमुदला अखेर गोड बातमी मिळाली होती.आणि मनाली च्या रुपाने तीचा वांझोटेपणाचा डाग आता पुसला गेला होता. कुमुद आता एका गोड मुलीची आई बनली होती आणि रोहीत बाबा……आणि मुुुलगी झाली हो अभिनंदन करा माझं! म्हणत रोहीतनं आख्खं हाॅस्पीटल डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळेस तर त्या दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नव्हता आणि त्यात मुलगी झाली झाली होती बाबाला एक परी आणि आईला हक्काची मैत्रीण मिळाली होती.

मनू कशी हासते कशी कुस बदलते कशी दुध पिते एवढचं काय तर तिच्या शि-शु चं ही कौतुक हे दोन वेडे करायचे.

मनू जशी मोठी होत गेली. तशी तिच्यातली प्रगल्भता समोर येऊ लागली. ती जबरदस्त हुशार होती आणि त्यासोबतच नम्र होती. इतरांना मदत करण्याची भावना तिच्यात खुप होती.बालपण असच चाललं होतं आणि पोरगी मोठ्या कौतुकात मोठी होत होती कधी डान्स तर कधी अभ्यास तर कधी नम्रपणामुळे ती नेहमीच चर्चेत रहायची.

आता मनूची बारावी झाली होती आणि ती आता काॅलेजसोबतच समाजकार्यात सक्रिय झाली होती. लोकं खुप कौतुक करायचे आणि रोहीत, कुमुदचा हेवा करायचे एवढी गोड पोरगी झाली म्हणून ……….

पण एकाएकी हे काय झालं ……

 चालत असणाऱ्या मनूला दूरवर फेकत निघून गेली, ……..आरडाओरडा झाला. अारे कोण पोरगी आहे वाचवा तीला ….. लोकांनी दवाखान्यात आणलं. पोलीस केस झाली. मनूच्या बॅगेतल्या कागदपत्रांवरून रोहीत आणि कुमुदला कळवण्यात आलं. बातमी ऎकून कुमुद आणि रोहीतचा तर जीवच निघाला होता. ते जीव मुठीत घेऊन हाॅस्पीटलला पोहोचले. पण कुठेच लागलं नाही म्हणून कुमुदला जरा हायसं वाटलं होतं……
पण हे काय मनू बोलत का नाहिये …..तिला तर कुठेच लागलेलं दिसत नाही. तरी ही गप्प का? म्हणून कुमुद आणि रोहीत हबकले.

आणि अचानक ……….सगळी चक्र फिरली अन् डाॅक्टरांची मोठमोठाली टिम मनुला सारखी चेक करत होती. कुठेही न लागता फक्त ब्रेनला मार लागला होता आणि हेच मोठं दुर्देव होतं. अखेर डाॅक्टरांनी तीला …..

ब्रेन डेड म्हणून घोषीत केलं….


क्षणात सगळं संपलं होतं. 

अरे हे असं कसं शक्य आहे म्हणत कुमुद डाॅक्टरांना वेड्यासारखी बडबड करत म्हणत होती “अहो डाॅक्टर तीची ब्रेनची खुप मोठी भुक आहे ती मी सगळी भागवते म्हणून तर मीही अभ्यासाला सुरूवात केली. आत्ताच मनु उठेल बघाच तुम्ही”…..म्हणत मनूला ती गदागदा हलवत होती. उठ रे मन्या ही काय मस्तीची वेळ आहे का? म्हणत तीला विनवत होती.

वेड्या आईची वेडी माया …..

अहो डाॅक्टर बघा ना मनूला बघा ना हो परत म्हणत ती रडतच होती …….

किती वेळ कुमुद आयसीयूत हा सगळा भुतकाळ विचार करत होती की ह्या माझ्या बाळाचा जन्म का झाला असावा आणि तिचं आयुष्य फक्त एवढसचं का राहिलं असावं ? बाकी लोक कितीतरी वर्ष जगतात त्यांना जगणं नको होतं तरीही जगतात आणि माझी मनू ? ………

माझ्या वांझोटेपणाचं डाग पुसायलाच मनूने जन्म घेतला होता का ? ……..आणि आता कितीतरी जीवांना जिवनदान द्यायलाच ती, परत परतीच्या प्रवासाला निघाली होती का? …..समाजसेवेसाठीच तिचा जन्म झाला असावा …… मनू जन्माला आली आणि छोट्याशा आयुष्यात खुप काही करून आता जाऊ लागलीये……एवढ्याचसाठी ह्या माझ्या बाळाने जन्म घेतला होता का ? म्हणत तीच्या डोळ्यांतल्या अश्रुंनी पुन्हापुन्हा गर्दी केली.

दूरवर खुप दूरवर निघालिये मनू……… पण हे काय ……….

हा प्रकाश कसला येतोय मनू जसजशी दुर जातीये तसा प्रकाश वाढतच चाल्लाय ……….

त्या प्रकाशासोबत कुमुदच्या मनातलं दडपण आणि जडपणा आता थोडा हलका होत होता …..

आता कुमुद कुठल्याच पाशात न अडकता मनाली उर्फ मनूच्या अवयव दानासाठी तयार होती. तीची मनू आता मरणानंतरही जिवंत राहणार होती. कुणाचे तरी डोळे बनून ती जग नव्याने पाहणार होती तर कुणाचंतरी ह्रदय बनून धडधडणार होती.

माझी मनू जशी जगली तसा तिचा शेवटही होणार म्हणून ती मायमाऊली आयसीयूतून वेड्यासारखी पळत सुटली अखेर डाॅक्टरांच्या केबिनमध्ये येऊन ती थांबली. तिला धाप लागली होती. श्वास वर खाली होत होता पण आता तोही स्थिर झाला आणि तिने अखेर त्या अवयव दानाच्या कागदावर सही केली आणि तीथेच अखेरचा हंबरडा फोडला, आख्खं हाॅस्पीटल दणाणून गेलं होतं. आणि दूरवरून मनूचे बोबडे बोल कानात घुमत होते ……..

 काय ग् आई ! हा वाला अथा का व्हातो? पानी कुठनं पलतं? भुक्की का लागते?…..

@Sunita Choudhari.

(मित्र- मैत्रिणींनो नमस्कार. माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाल. असल्या प्रकारचं दु:ख कोणत्याच घरी येऊ नये . म्हणूनच चूक भुल माफ करावी . अवयव दानासाठी जनजागृती व्हावी हा एकमेव उद्देश आहे ह्या कथेचा …..ह्या आधीही ही कथा मी माँम्सप्रेसो वेबसाईडवर प्रकाशीत केली होती पण परत ही कथा नव्याने वाचण्यासाठी वाचकांच्या विनंतीवरून परत प्रकाशित करत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा