मला गावाला पाठव ना आई…..!!!

Written by

आई, काय ग अशी करतेस??

जाऊ दे ना मला गावाला, मला कंटाळा येतो इथे….. नुकतीच दहावीत गेलेली तेजा आईला अगदी काकुळतीने सांगत होती.

काही नाही, दहावी आहे यंदा……कुठेही जायचं नाही.

व्हेकेशन बॅच बुडवून गावाला बिवाला अजिबात जायचं नाही.

मला नाही जायचय त्या व्हेकेशन बॅचला….सुट्टीत नाही करायचाय मला अभ्यास.

दरवर्षी जातेसच की, एक वर्ष नाही गेलीस तर काय होणार आहे. दहावीचं वर्ष आहे महत्वाचं….

आतापासून अभ्यासाला लागशील तर चांगले घसघशीत मार्क मिळतील.

ते तर मला नेहमीच मिळतात, आणखी किती आणायचे???

मला जायचंय मामाकडे, सगळे वाट बघत आहेत माझी तिथे.

निलू, बंटी, सोनू, राजू रोज फोन करतायत माहिती आहे ना तुला???

राणी मावशीची स्वीटी आणि मन्या पण पोचले, मीच राहिलेय फक्त……

ती पोरं लहान आहेत सगळी , तू दहावीत गेलीयेस दहावीत, केवढं महत्वाचं वर्ष, पुढचं अख्ख करियर डिपेंड आहे त्यावर माहितीये ना?

अग हो, पण मी तुला नाराज केलयं का कधी मार्कांच्या बाबतीत, मग ???

आणि पुढेही नाही करणार कधी, मला जाणीव आहे त्याची. पण तू नको ना घेऊ माझा आनंद हिरावून.

वर्षातून एकदाच तर धम्माल करतो आम्ही सगळी भावंड….. आणि मग पूर्ण वर्षभर त्या आठवणींवर दिवस काढतो.

हे बघ मला वाद नकोयत, एकदा नाही म्हटलं ना की नाही.

इकडे गावाला मुलांसकट आजी-आजोबा, मामा-मामी तेजाची आतुरतेने वाट बघत असतात.

मोठ्या मुलीची मुलगी, घरातलं पहिलं मुलं, सर्वांची लाडकी असते तेजा खूप.

आजी तर सारखी मामाच्या मागे तुणंतुणं वाजवत होती, अरे बघ काय झालं कधी निघतायत विचार ना.

मामीचही तेच अहो करा बरं फोन आताच, विचारा जरा काय ते.

मामाचा फोन येतो आणि नेमका तेजाच उचलते.

मामाचा आवाज ऐकूनच तिला खूप रडू फुटते, रडत रडतच ती सांगते, बघ ना रे मामा, आई नाही पाठवत आहे मला, मी दहावीत गेलीये ना……मला यायचंय रे मामा.

मामा म्हणतो, आईला फोन दे तेजा…..मी आहे ना, रडू नकोस बाळा, मी बोलतो आईशी.

अगं ताई, पोरीच्या एवढं मनात आहे तर येऊ दे की तिला. ती काय ‘ढ’ आहे का अभ्यासात, ती नाव काढणारच बघ आपलं. पण आता ऐक जरा तिचं.

आई काही हेका सोडायला तयारच नसते, हे बघ एक वर्ष जरा जास्त अभ्यास केला तर काही नाही होत. येईल ती पुढल्या वर्षी.

तेजा इकडे रडून रडून बेहाल होते.

तिला दिसतं, सगळे आपल्याला सोडून मज्जा करतायत, शेतावर हुंदडतायत, दगडाने नेम मारून झाडावरचे आंबे पाडतायत, नदीत डुंबतायत, गारेगार खातायत, आजी सगळ्या नातवंडांना प्रेमाने घास भरवतीये……

छे, मीच नसणार यावेळी, नाही मला यायचंय तुमच्याकडे, मला यायचंय गावाला…..काय करू मी.

शेवटी रडून रडून कधी झोप लागली ते तिचं तिलाच कळलं नाही.

सकाळी मात्र घरात नेहमीपेक्षा जास्त माणसांचा आवाज ऐकू येतो, तेजा जरा कानोसा घेऊन बघते आणि एकदम आनंदाने नाचतच हॉल मध्ये जाते, मामा मामी तुम्ही???

मग काय तुझी आजी राहून देते का आम्हाला तिथे???

तू फोनवर रडतीयेस म्हटल्यावर, तिच घळाघळा रडायला लागली तिकडे. किती जीव आहे माहिती आहे ना तिचा तुझ्यावर?? तिच येत होती म्हटली, बघतेच कशी पाठवत नाही माझ्या बछडीला ते ?? आस लावून बसतो आम्ही वर्षभर, आणि ही कसली नाटकं ?? दहावी काय माझ्या पोरांनी दिली नाही होय. चांगली फर्स्ट क्लासनी पास झाली की, मला विचारायला सांगितलंय तुझ्या आईला, कुठला क्लास लावला होता का तिला कधी???

कसली नको ती कौतुकं??? पोरगी गुणाची माझी आणि तिला डांबून ठेवणार होय???

तुझ्या आजीने ताबडतोब धाडलं बघ, सुचूनच देत नव्हती आम्हाला काही…..

काय ग ताई आमच्याबरोबर सोडणारेस की आईला यावं लागेल, बोल???

अरे पण यंदा दहावी म्हणून रे……

अगं म्हणूनच म्हणतोय, वर्षभर आहेच की अभ्यास दहावीचा, करणारच ती, आता तिला जरा फ्रेश होऊ दे, चित्त फुलू देत की तिची, सारखं काय रटाळवाणं अभ्यास एके अभ्यास. उसंत मिळू दे जरा तिला त्या अभ्यासातून……

गावाहून आल्यावर बघ नव्या जोमाने, प्रफुल्लित मनाने अभ्यासाला लागेल ती. तूच खुश होशील तिला पाहून.

चल ग तेजा निघायचय रात्रीच्या गाडीने आपल्याला , तुझी आजी आणि सगळी पोरं वाटेकडं डोळे लावून बसलेत तुझ्या.

कुठंही गेली नाहीत बघ पोरं तुझ्याशिवाय, ताई ना तू साऱ्यांची, मामी तेजाच्या पाठीवरून हात फिरवत सांगत होती.

जाऊ ना गं आई…..

आईने भरलेल्या डोळ्यांनी तिला मिठीत घेतलं आणि हसून म्हणाली, जा तेजा जा…..जिले अपनी छुट्टी !!!

तेजाने याहूsss म्हणत मस्त उडी मारली आणि डोळ्यात धम्माल मस्तीची अनेक स्वप्ने घेऊन लाडक्या मामाच्या गावाला जायची तयारी करू लागली.

बॅकग्राऊंडला मनाने ताल धरलाच होता……..

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया,

जाऊया, मामाच्या गावाला जाऊया !!!

खरंतर तेजा मनाने केव्हाच त्या गाण्यातल्या झुकझुक गाडीबरोबर मामाच्या गावाला पोचली होती, आजीच्या कुशीत विसावली होती, आपल्या भावंडांबरोबर बागडत होती, आनंदाने गिरक्या घेत घरभर नाचत होती !!!

सुट्टीतल्या क्लासेसनी मुलांच्या डोक्याचा ताप वाढवलाय खरं!!! आता तर काय दहावीची तयारी अगदी आठवी नववी पासूनच सुरू करतात. नववीपासून व्हेकेशन बॅचला जाणारी मूलं पाहते आणि वाटतं खरंच गरज आहे का याची??? सुट्टी कशाला असते मुलांना मग?

एवढा दहावीचा बाऊ करायला हवा का???

 अति अभ्यासाचा पण ताण येतो मुलांवर, ऐनवेळी हँग  होतात ती!!! 


त्यांनाही घेऊ दे की आनंद सुट्टीचा, आपण घेत होतो तस्साच ?


चालतयं का नाही ???©स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा