महागडी शाळा म्हणजे,पोरं आॅल राऊंडरच…..

Written by

काल लेकीने अभ्यास पूर्ण करायला जरा उशीरच केला होता आणि सोबत तीला हिंदी मधली एक प्रेरणादायी कविता पाठ करायची होती म्हणून मी त्यासाठी सगळीकडे शोधाशोध करत होते मग शेवटी एक कविता मिळाली त्या कवीतेची थोडी तोंड ओळख तीला करून दिली आणि तीला आता ते पाठ करायला सोपं जाईल म्हणून मी ही थोडा सुटकेचा निश्वास सोडत क्लिनिकला आले. लेक तिथे जवळच खेळत होती अाणि मी पेशंट बघायला सुरूवात केली.

मी माझं काम करत होते आणि तितक्यात, बराच वेळ वेटिंगला असलेला एक पेशंट त्याच्या मुलासोबत आत अाला साधारण माझ्या लेकीच्याच वयाचा मुलगा होता. मी त्याला चेक केलं आणि प्रिस्क्रीप्शन लिहून देणार तेवढयात माझी मुलगी आत आली आणि तिच्याशी काहीतरी बोलावं म्हणून समोर बसलेला पेशंट तिच्याशी बोलू लागला…..नाव वगैरे विचारून झाल्यावर त्याने तिला विचारलं की, बाळा तु कुठल्या स्कूल मधे आहेस ?

प्रश्नाचं उत्तर लेकीने देत तिच्या शाळेचं नाव सांगितलं आणि त्या नावासरशी त्या माणसाच्या डोक्यावर एक विचित्र आठी आली आणि तो म्हणाला…..काय मॅडम तासभर झालं मी वेटिंगला होतो रोजचे इतके पेशंट बघता…. नवरा – बायको दोघंही कमवता आणि वरतून एकच पोरगी तरी तुमचं असंय होय म्हणत तो छद्मी हसला.

मला त्याच्या प्रश्नाचा रोख चांगलाच समजला होता पण तरी मी त्याला विचारलं की, ‘असंय म्हणजे कसं हो’?…..नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?

उत्तरादाखल मला तो माणूस म्हणाला की, …..अहो मॅडम, एवढे डाॅक्टर लोक तुम्ही…. मग मुलीला पण मोठ्या स्कूलमधे नको का घालायला?….. काय तुम्हीपण, तिला साध्या स्कूल मधे टाकलंय कीती फी आहे त्या शाळेची सांगा बरं? ….

मी म्हणाले ५०,०००….

तर मग तो आश्चर्याने म्हणे फक्त पन्नास हजारच होय ?….लय कमी आहे ही, तर फी …..माझा मुलगा पण तुमच्या मुलीएवढाच अाहे पण आम्ही त्याला आपल्या इथल्या सगळ्यात मोठ्या स्कूल मधे टाकलंय दिड लाख फी भरतो आम्ही त्याची माहीते का? …… अहो अॅडमिशन मिळत नाही तिथे, रात्रभर जागून नंबर लाऊन मग मिळाली अॅडमिशन…असं म्हणत स्वत: वरच तो खुप प्राऊड फिल करत होता आणि आम्हा माय – लेकींकडे कुत्सित नजरेने पाहत होता.

मी म्हंटलं,

अहो फी चं सोडा, मी डाॅक्टर जरी असले , भरपुर कमावत असले तरी मला दुसरीसाठी एवढी फी देणं परवडत नाही आणि परवडायचं सोडा हो ….. मुलांना चांगलं शिक्षण मिळणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.

मग तो म्हणे की, हो तर मग माझ्या मुलाच्या शाळेचं शिक्षण चांगलंच आहे …. काय – काय शिकवतात माहिते का? ….हाॅर्स रायडिंग म्हणा, क्रिकेट म्हणा फाॅरेनची भाषा म्हणा सगळंकाही शिकवतात. ते काॅप्युटरवर बरेच प्रोजेक्टपण असतात त्यांचे….. परदेशातले टिचर पण आहे त्यांच्याकडे शिकवायला…..  मॅनर्स शिकवतात ….. कसं छान रहायचं आणि बोलायचंपण शिकवतात…एकदम आॅल राऊंडर होणार बघा माझं पोरगं ……अहो मॅडम ! कोणासाठी कमवतो आपण ?…ह्या पोरांसाठीच ना मग एवढं सगळं द्यायला नको का त्यांना? ….आता तुमच्या मुलीच्या शाळेत हे सगळं शिकवतात का सांगा बरं? म्हणत त्या पेशंट ने मला उलट प्रश्न विचारला….

मला तो माणूस जे बोलत होता त्यात नवीन असं काहीच वाटत नव्हतं म्हणूनच मला हसू येत होतं. बाहेर पेशंट वाढत होते तरी मला इथे ह्या पेशंटला उत्तर देणं जरूरी वाटलं.

अरे बापरे! खरंच की …. माझ्या मुलीच्या शाळेत तर हे असलं काही शिकवतच नाही हो ……पण तुम्हाला माहिते का, तिच्या शाळेत अभ्यासासोबत स्तोत्र पठण शिकवतात, क्रिकेट किंवा हाॅर्स रायडिंग नव्हे तर आपले मातीतले खेळ कबड्डी, लंगडी, मल्लखांब शिकवतात. कराटे वगैरे सोडा हो पण त्यांच्या शाळेत त्यांना कुस्ती मात्र शिकवतात. हा, आता शिक्षक मात्र परदेशातले नसून आपल्या इथलेच आहेत कारण आपल्याच लोकांमधे इतकी कलागुणं ठासून भरलीयेत की, परदेशातल्या शिक्षकांची गरजच पडत नाही. आता इंग्रजी- मराठी भाषेसोबतच परदेशातली भाषा नाही पण परदेशातून जी भाषा शिकायला लोक आपल्याकडे येतात ती अापली हिंदी तसेच संस्कृत भाषा अाणि त्यावर प्रभुत्व मिळवायला शिकवतात त्यांच्या शाळेत. काॅम्प्यूटरसमोर बसून प्रोजेक्ट नव्हे तर ख-या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या मातीशी नाळ जोडायला शिकवतात ते ……कोणाशी कसं बोलायचं हे शिकवायची गरज नाही पडत , कारण त्यांना मुळातच घरच्यांसोबत बाहेरच्या लोकांच्या मदतीसाठी तत्पर रहायला शिकवतात आणि माणुसकीची बहुमूल्य अशी शिकवण त्यांना देतात…

साध्या शाळेत आणि ते ही कमी पैशात ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर मग कशाला हवी तुमची महागडी शाळा ?…..

परदेशातून लोक आपली संस्कृती शिकायला येतात आणि आपण आपल्या हातात असलेलं सोनं नाकारत त्यांचं नको ते अनुकरण करतो आणि वरतून त्यात, स्टेटस् चा इश्यू करतो …..कशासाठी करतो आपण हे सगळं ?…….नावाजलेली अाणी महागडी शाळाच चांगली हे गणित निदान मला तरी सुटलेलं नाही म्हणत मी खेद व्यक्त केला.

इतका वेळ शांत असलेल्या माझ्या मुलीने मघाशी शिकवलेली कविता गुणगुणायला सुरूवात केली.

त्या पेशंट ला माझं बोलणं किती पटलं माहित नाही पण तो बाहेर निघण्यासाठी खुर्चितून उठताना त्याचा तोल गेल्यासारखा झाला अाणि माझ्या समोरच्या टेबलवरचा ग्लास खाली पडला तेंव्हा त्याचा मुलगा त्याला ओशाळून जरासा रागात म्हणाला,

Hey dad,  what are you doing yar?… म्हणत तडक बाहेर गेला…..त्याला त्याच्या बाबाला काय झालंय पेक्षा त्यांनी ग्लास कसा काय खाली पाडला याचा त्रास झाला असेल…..

पण तेवढ्यात माझी मुलगी म्हणाली, “काका, पडू द्या ग्लास, तुम्हाला लागलं तर नाही ना”? ……तो पेशंट काहीशा हताश नजरेने माझ्या लेकीकडे पाहताना मला दिसला…..बहुतेक त्या पेशंटला आता शिक्षणातला नक्की फरक समजला असावा …..

©Sunita Choudhari.

(मित्र- मैत्रीणिंनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार. आज अनेक ठिकाणी शिक्षणाचा बाजार झालेला दिसतोय पण त्याला जबाबदारही अापणच आहोत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. महागडी शाळा म्हणजेच चांगलंच शिक्षण हे समीकरण निदान आतातरी बदलायला हवं नाही का? …. मुळात संस्कार खुप महत्त्वाचे असतात, पाश्चात्त्य संस्कृतीचं अनुकरण करत आपण आपल्या मुलांचं नुकसान तर करत नाहीये ना? आणि महागड्या शाळेच्या हट्टापायी त्यांचं खरं बालपण आणि खरं सौंदर्य हिरावून घेत माणूसकीचं शिक्षण तर द्यायला विसरत नाहीये ना? याचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं. तुम्हाला हा लेख वाचून काय वाटतंय आणि ह्याबद्दल तुमचं मत माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका ….आणि हो सोबत मला फाॅलोही करा…धन्यवाद )

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा