माझं काय चुकलं???

Written by

 

©अर्चना अनंत धवड

सपना माझ्या मैत्रिणीची मैत्रीण…….. मी माझ्या मैत्रिणी कडून बराच ऐकल होतं की खुप खंबीर आहे…. नवर्‍याला घराबाहेर काढले वगैरे वगैरे…… एक दिवस माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या कडे जाण्याचा योग आला…. त्या दोघी बोलत होत्या… मी शांतपणे ऐकत होते… त्यांच्या बोलण्यातून एवढे कळले की मागील पंधरा वर्षांपासून ते दोघे वेगळे वेगळे राहतात…. मी मध्येच बोलले… का ग सपना… अस घुसमटत जगण्यापेक्षा घटस्फोट का घेत नाही… तू ही मोकळी अणि तोही मोकळा…..

ती चिडून म्हणाली….. काय मिळेल मला घटस्फोट घेऊन… माझ जे आयुष्य खराब केले ते परत पूर्ववत होईल……. पाच दहा हजार पोटगी मिळेल….. तीही नियमित मिळेल याची गॅरंटी नाही….. घटस्फोट घ्यायचा तर आता मिळतो….. पण मला नको….. तो उद्या लग्न करायला मोकळा…….

अग पण प्रॉब्लेम काय आहे. तुम्ही चांगले का राहात नाही…….

ताई मी माझी पूर्ण कहानी सांगते…. मग ठरवा मी चूक की बरोबर……

मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी… BA. BED. झालेली…. शहरात वाढलेली….. माझ्याही काही लग्नाबद्दल अपेक्षा होत्या… काही स्वप्न होती…. हा चांगला सरकारी नोकरीत…. लग्न झाले मी आनंदी होते…..

मला पहिल्याच दिवशी कळल याला काहीतरी भयंकर स्किन डिजीज आहे ….कुठला डिजीज आहे हे अजुनही मला कळले नाही… मला प्रचंड धक्का बसला…… तो जवळ आला की … नवीन असल्यामुळे मी विरोध करू शकत नव्हते ….. पण नंतर तो जवळ जरी आला तरी मला कसेतरी व्हायचे….. पण निसर्गाने आपली किमया केलीच…. मी एका मुलाची आई झाले….. गरोदरपण, बाळंतपण… या कारणाने मी त्याला काही दिवस टाळले….. पण नंतर नंतर त्या कारणासाठी आमची भांडणे होऊ लागली…… आता तू म्हणशील आजारपण आहे… त्यात बिचार्‍याचा काय दोष…. मान्य आहे…. पण लग्नाच्या आधी त्यानी मला कल्पना दिली का…… मला जर असा आजार असता तर त्याने स्विकारले असते का? त्याचा आजार कधी कधी ईतका बळावतो की पूर्ण शरीरावर येतो ….

सहजीवन हीच यशस्वी वैवाहिक जीवनाचा आधार आहे….. तेच आमच्यात नव्हते.. मी त्याला सारखी टाळायची… मी मुलाकडे पाहून जगायचे ठरविले…. पण तो खुप चिडायचा…. लहान सहान गोष्टीवरून भांडणे व्हायची……. एकदा खूप भांडण झाले.. त्यानी मला खूप मारले…..घराबाहेर काढले…. .. मी आधीच चिडून होते…मी पोलीस स्टेशन ला जाण्याची धमकी दिली…. मी त्याला निक्षून सांगितले की मी हे घर सोडून जाणार नाही… तुला जायच तर जा… अणि तो घर सोडून गेला… सगळीकडे माझी बदनामी केली की मी हाकललं…..

सांग ताई मी घर सोडून कुठे जाऊ. मला आई वडील नाहीत…. भावाकडे किती दिवस राहणार…. मी स्वताः नोकरी करते अणि माझ्या मुलाचा सांभाळ करते…..

घटस्फोट घेऊन मला काय मिळणार……… आता रहायला निदान घर तरी आहे……

खरच…. ऐकीव माहितीच्या आधारावर आपण कुणा बद्दल किती चुकीचा समज करून घेतो…… सपना चूक की बरोबर हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असू शकते….. पण तिच्या दृष्टीने तिनी घेतलेला निर्णय योग्यच होता……

मी एका हॉस्पिटल मध्ये काम करते….. तिथे एखादी स्री एचआयव्ही पॉझिटिव्ह आली की आम्ही तिला उत्सुकतेने विचारतो .. नवरा काय करतो….. ती म्हणते मरण पावला…… म्हणजे तो या आजारांनी मेलेला असतो अणि ती स्त्री बिचारी त्यांनी तिला दिलेले दान घेऊन आजाराशी लढत आपल्या मुलांना सांभाळत असते…… एचआयव्ही सारखे आजार सुद्धा लोक लपवितात…….मुलीला काही आजार असला अणि तो माहिती पडला तर तिला दुसर्‍या दिवशी आणून सोडतात…… तेच मुलाला काही आजार असला तर ती शक्य तोवर तडजोड करते……. सपना ने घटस्फोट न घेता नवर्‍याच्या घरी राहणे एक प्रकारची तडजोडच नाही काय???

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा