माझा धांदरटपणा

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#माझा_धांदरटपणा ?

लहानपणापासूनच मी धांदरट होते.काही प्रसंग अजूनही आठवतात.

मी दुसरीला होते.आमचे शाळेच्या बसमधले ड्रायवरकाका रूमालाचा पिळा गळ्यात बांधायचे व त्याला गाठ मारायचे.
मला ते भारी वाटायचं.मी पण एकदा तसचं हातरुमालाचा पिळा करुन गळ्यात घालून त्याची गाठ बांधली
व हे नंतर विसरुनपण गेले.?
मधल्यासुट्टीत बाकावर डबा ठेवायच्या आधी त्यावर रुमाल ठेवायचा दंडक होता.मुख्याध्यापिका तपासायला येत.
त्या वर्गाच्या दारात आल्या नी माझी तंतरली.
मला वाटलं आईने मला रुमाल दिलाच नाही.
जाम घाबरले.
बाईंनी दोन लायनी चेक केल्या व त्या गेल्या.
मला हायसं वाटलं.मग कशालातरी गळ्याजवळ हात
गेला तेंव्हा ड्रायव्हर काकांची केलेली काँपी लक्षात आली.?

शाळेची बस यायच्या दहा मिनटं आधी नेहमीच माझी एखादी वही हरवलेय याचा मला साक्षात्कार व्हायचा.
मग आईची शोधमोहीम सुरु व्हायची.
अगदी आपत्कालीन परिस्थिती…?
शेवटी दोन मिनटं उरली असताना.
ती वही कधी खाटीच्या खाचीत,कधी माझ्या दप्तरात तर कधी भावाच्या दप्तरात सापडे.☺️

शाईची बाटली नी माझ्या वह्यांचं वाकडं होतं.शाई ड्राँपरने भरायला घेतली की जरासा हात लागला तरी मरतुकड्यासारखी ती शाईची बाटली कलंडे.
नाहीतर ड्राँपरमधली शाई तरी खाली सांडे.
सगळं फडकं,हात,कधीकधी ओठ निळे निळे होऊन जायचे.
त्या शाईची चव अजूनही लक्षात आहे.
पुस्तकं तर माझ्या हातात कधी टिकलीच नाहीत.
नीट रहायचं हे त्यांना माहितीचं नव्हतं.
पुढचं,पाठचं मुखपत्र गळून पडे.मग हळूहळू त्यांची शिलाई उसवे.
थोड्याच महिन्यात त्यांच्या पत्रावळ्या व्हायच्या.
परीक्षेच्या आदल्या दिवशी बाबा कुठेकुठे फिरुन मला पुस्तकं आणून द्यायचे.?

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाम खेळायचो.
मांगरात लपाछपी, आंधळी कोशिंबीर,
शेतातल्या कोपर्यात क्रिकेट, कब्बडी, विटीदांडू.
खळ्यात खोखो, विषाम्रुत, लाकूड की पाणी, झिम्मा.?
या सगळ्यात माझी बरीच पडझड व्हायची.
सात आठ दिवसांत दोन्ही ढोपरं, खोपरं फुटलेली असायची.
मग आजोबा चिडवायचे, ” काय, कसं काय धडपडे?”?

थोडी मोठी होऊन महाविद्यालयात गेल्यावर एकदा गुलाबजाम बनवायला घेतले.
तो पाक झाला घट्ट.
त्यात गुलाबजाम टाकले व टिव्हीवर कायतरी बघत बसले.
साधारण तासाभराने आत जाऊन पाहिले तर त्या गुलाबजामांचे घट्ट लाडू झाले होते.?
एकदा आईला बरं नसताना कुकर लावायची पाळी आली माझ्यावर.
मी आईने सांगितल्याप्रमाणे सर्व क्रुती केली मात्र तुरडाळीच्या ऐवजी चणाडाळ घातली.
ती डाळ काही शिजलीच नाही.?

अकरावीत असताना दादरला क्लास होता.
माटुंग्याला घरी येण्यासाठी ट्रेनमध्ये चढले.
करीरोडला उतरायचं होतं.
माझा कधीकधी मुंगेरीलाल होतो.
भानावर आले तेंव्हा पुढचं स्टेशन चिंचपोकळी आलेलं.
पटकन खाली उतरले.
जिना चढताना ट्यूब पेटली,पास तर करीरोडपर्यंतचाच आहे.?
समोर सुटबुटातले टिसी दिसले.
लोकांना अडवून अडवून तिकीट विचारत होते.
मी उसनं अवसान आणलं.
जी सुमडीत टिसीच्या पुढून तरातरा चालत गेले,
नंतर माझं मलाच आश्चर्य वाटलं.

असचं एकदा मला ड्रेस घेण्यासाठी बाबा आले माझ्याबरोबर.
तेंव्हा ठाण्याला क्लास होता.
बाबा म्हणाले आपण ड्रेस घेऊ,मग तु जा क्लासला.
मी लेडीज डब्यात.
मस्त डुलकी लागली.?
जाग आली तेंव्हा घाटकोपर आलेलं.परत डाऊन पकडली.
गुपचूप क्लासच्या खाली येऊन उभे राहिले.
बाबा तिथे आले.
त्यांना स्टोरी सांगितली.
लहान भाऊ सोबत होता.
तो म्हणाला आम्ही जाम शोधलं तुला,
इथे आली असशील वाटलं म्हणून परत इथे बघायला आलो.
बाबा म्हणाले जा आता क्लासला,आम्ही जातो घरी.☺️

तेरावीत असताना काँलेज लय सकाळचं असायचं.
सहाची गाडी पकडावी लागे.
तोडकीमोडकी आंघोळ करुन गाडी पकडायला भरभर चालायचो.
गाडीत फुलवालीच्या टोपलीत सायली,मोगरा,चमेली
डबाच सुगंधी व्हायचा.
स्टेशनवरून पंचवीस मिनटावर आरकेटी काँलेज
मी तर ग्लानीतच चालायचे.
पहिला पिरियड तर डोळे ताणून बसावं लागे मला.
पयल्या पिरियडला बिझनेस लाँचं लेक्चर.
मला तर सर माझ्यासाठी स्पेशल अंगाई तयार करुन आणतात असं वाटायचं.?
एकदा सरांनी उठवलचं
You girl in pink dress stand up.
आय गुपचीप स्टँडअपले.
सर म्हणाले,
You are physically here and your mind is somewhere.
मी मनात म्हणाले, समवेअर तर समवेअर आँल बाँइज आर लुकींग एट मी,आत्ता तरी खाली बसव रे बाबा.?
सर सीट डाऊन म्हणले तेंव्हा कुठे बरं वाटलं.
पण झोपेचं खोबरं झालं.
आफ्टरआँल साखरझोप असते ती.
सरांना कुठलं आलयं कळायला.
दिवास्वप्न जी बघतातना त्यांनाच ती मजा कळे.

मधल्या काळात आमच्या बिल्डींगमध्ये गर्ब्याचा कार्यक्रम ठरतो.
त्याचा सराव करण्यासाठी आम्ही दहाबारा मुलंमुली
टेरेसवर जमतो.
शिंद्यांचा अमेय माझ्यासोबत खेळायला आला.
मी फुल स्पिरीटमधी.?
माझी टिपरी अमेयच्या बोटांवर चापकन बसली.
बिचारा कळवळला.
असे एकदोन फटके खाल्ल्यावर तो पाणी प्यायचं
निमित्त सांगून तिथून निसटलि.
मग बनेंचा संजय म्हणाला, ताई आपण खेळूया.
मी परत जोशात.
संजयचा चश्मा थोडक्यात वाचतो.टिपरी त्याच्या
नाकाडावर बसली.
तो तिथेच खाली बसला.
मग पाणी वगैरे…..?
शेवटी मुलं असं ठरवतात की गीताताईकडे महत्त्वाचा कार्यभार सोपवायचा असल्याने तिला गर्ब्यातून
सूट देऊया.
माझा गर्बा खेळण्याचा प्लान बारगळला.

लग्न झाल्यावर सासूने लय सांभाळून घेतलं.
मी भाजी चिरुन,नारळ खवून द्यायचे.
आई बाकी सर्व फोडणी वगैरे करत.
भात वाळावा लागे,भल्या मोठ्या टोपात असायचा तो.
आई ते काम शिताफीने करीत.
मी ट्रेनी होते.
परसवातली हिरवीगार दोडकी ओटीतून घेऊन येत.
ती ताजी भाजी बघूनच पोट भरे.?
हाताला भन्नाट चव.त्यामुळे माझी चंगळ होती.

पण मग यांची मुंबईला बदली झाली.
आम्ही इथे आलो.
बाळ लहान.बेडवर खाऊचा चुरा करुन ठेवायचा.
एकदा घाईत मी बेडशीट गोळा केली नी
बाथरुममध्ये साबणाच्या पाण्यात नेऊन टाकली.
रात्री बाळ झोपल्यावर बेडशीट धुवायला गेले
तर पाण्यात फुगलेल्या वड्यासारखा ,
माझा नोकीयाचा मोबाईल.?
मग बाई त्याला बाहेर काढंलं.
पुसलं,वाळायला ठेवलं.
पण बिचारा आजारी पडला.
मग गँलरीत न्याव लागलं,
तेंव्हा कुठे बरा झाला.?

दूध तर महिन्यातून एकदा उतू जातंच.
कधी दूध गेसवर ठेवून दुसरं कुठचं काम करायला घेते.
बहुदा बर्याच वेळाने कसलातरी करपट वास येतो.
आत जाऊन पाहिलं तर सगळं दूध डिस्यापिअर झालेलं असतं.?
टोपाचा आतला भाग ठार काळा.
मग मी गरम पाणी त्या टोपात ओतून ठेवून देते
व रोज थोडा थोडा घासते.

एकदोनदा तर कुकर लावताना तांदूळ धुवून तसेच कुकरला लावले,पाणी न घालता.
जेवायला घेताना कुकर उघडला तर आत सडसडीत तांदूळ.
मग काय परत पुरेसे पाणी घालून कुकर लावला.
जेवताना घरवाले म्हणाले,”भात छान लागतोय आज.वेगळे तांदूळ आणलेस का?
मी गपचीप.?

तर अशा छोट्यामोठ्या चुका करत जीवनगाणे चालले आहे.
या आठवणींची पोटली सोडून कधीतरी एकटीच हसत बसते.?
आज म्हंटलं तुमच्याशी शेअर करुया.??

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत