माझा मुलगा..एक बलात्कारी..कसं शक्य आहे?

Written by

भाग 1:

मी एक वकील. कोर्टात वेगवेगळ्या प्रकारच्या cases लढले आणि खूपदा जिंकून न्यायही मिळवून दिला. अनेक प्रकारचे गुन्हे पाहिले, खटले पाहिले..लढलेही पण कधी डगमगले नाही पण आज.. धडधड वाढली आहे. हात थरथरत आहेत आणि घश्याला कोरडं ही पडली आहे. त्याला कारणही तसेच आहे, आजच्या खटल्यात आरोपीच्या कटगऱ्यात उभा आहे, माझ्याच गर्भातून जन्म घेतलेला माझाच मुलगा, “राजन”.

एका महिन्यापूर्वी..

मी नुकतीच कोर्टमधून घरी पोहोचले आणि विमलाला hall मधूनच ‘चहा टाक’ म्हणून सांगितले. तेवढ्यात आतून माझा मुलगा राजन आला, “आई, विमला काकू आल्या नाहीत आज. मी करतो चहा..”

“बापरे! आज कुठून सूर्य उगवला. तू आणि चहा करणार? ”

“का? मी करू नाही शकतं माझ्या आईसाठी..”

“आज खूपच प्रेम ऊतु जातंय..काय पाहिजे ते सांग?”

“काहीच नाही ग आई..”

“जर विमला आली नाही तर घरातली सगळी कामं कुणी केली.. भांडी वगैरे घासलेली दिसतं आहेत..”

“त्यांची मुलगी रखुमा आली होती..”

“कितीदा म्हटलं विमलाला..मुलगी लहान आहे. तिला शिकू दे. तूझ्यजागेवर नको पाठवू. पण ती काही ऐकत नाही..”

“हो ना ..मी ही रखुमाला तेचं म्हटलं..”

त्या दिवसानंतर विमला दोन दिवस झाले तरिही कामावर आली नाही. मला नवल वाटले कारण विमला अशी इतके दिवस गायब रहायची नाही. नक्कीच तिची काहीतरी अडचण असावी. शेवटी रविवारी सुट्टी होती म्हणून मीच तिच्या घराकडे गेली. तिचं घर म्हणजे पत्र्याची झोपडीच होती. आत शिरले तर रखुमा पलंगावर झोपलेली आणि विमला तिच्या हातांवर काहीतरी औषध लावत होती. मी आत शिरताच विमलाला विचारले,

“काय झाले रखुमाला? बरे नाही का ?”

“तुमच्या पोराला विचारा ना ताई ते..” विमला वेगळ्याच पद्धतीने म्हणजे चिडक्या सुरात मला म्हणाली. ह्या आधी ती अश्या पद्धतीने कधीच बोलली नव्हती.

मी विचारले, “त्याचा काय संबंध? त्याला कसं माहिती असणार? ”

“त्याने वाटोळं केलं माझ्या पोरीचं.. त्यादिवशी माझी तब्येत खराब होती म्हणून मी रखुमाला तुमच्याकडे पाठवल. असं वाटलं की तुमच्या घरची कामं पडून राहतील म्हणून..पण त्या नालायकाने स्वतःची हवस मिटवण्यासाठी माझ्या सोळा वर्षाच्या पोरीचा चुरगळा केला..

वरून हिला धमकी दिली की माझी आई वकील आहे. त्यामुळे कुणाजवळ सांगू नकोस उलटं तुलाच jail मध्ये जावं लागेल..” विमला रडत रडत पण चिडलेल्या आवाजात बोलली.

“काहीही काय बोलतेस विमला? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे..तो असं काही करणार नाही..” असं म्हणून मी तिथून निघाले.

रस्त्याने जात तर होते पण काहीच सुचतं नव्हते काय करावे? कसे करावे? राजन, माझा मुलगा असं काही करू शकतो? पण विमला आणि तिच्या मुलीला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखते.. त्या असं खोटं बोलणं शक्य वाटतं नाही. ह्यातून काहीतरी साध्य करण्याचा उद्देश असेल का? प्रश्न अनेक होते पण उत्तर मात्र सापडत नव्हतं. त्या रात्रभर वेळ जाता जात नव्हती. माझा मुलगा खरंच बलात्कारी असेल? हा प्रश्न रात्रभर मला भेडसावत राहिला.सकाळी उठले. विमला आता येणार नाही हे नक्की होतं म्हणून कामं आटोपली. तीन दिवसांपासूनचा कचरा dustbin मध्ये पडून होता. तो dustbin मधून काढायला गेली पण कचऱ्याच्या वजनामुळे bin bag फाटली आणि सगळा कचरा खाली सांडला. मी आणखीनच वैतागले. तो कचरा खाली बसून उचलू लागले तर त्यात मला एक लांब नख तुटलेले दिसले. त्यावर लाल रंगाची nailpolish लागलेली होती. मी तर लांब नखे ठेवत नाही मग हे कुणाच नख असेल. शिवाय आमच्या घरात आम्ही तिघेच हे, मी आणि राजन. मग nailpolish असलेलं नखं बाहेरच्याच कुणाचं तरी असणार.लांब केसांचा झूपकाही त्यात होता. माझे केस मी खूप शॉर्ट ठेवायचे. लांब केस कोण ठेवतं, रखुमा..हो असे, कुरळे लांब केस तिचेच आहेत. पण ह्या सगळ्यावरून बलात्कार झाला हे सिद्ध होत नाही. नखं जर रखुमाच असेल तर ते काम करतांना ही तुटू शकतं आणि राहिला प्रश्न केसांचा, ते ही कदाचित गळून पडले आणी तिने झाडून dust bin मध्ये आणुन टाकले असतील. तरिही मी ते पुरावे म्हणून plastic bag मध्ये सांभाळून ठेवले.

मी ह्या सगळ्याची वाच्यता कुठेच करायची नाही असे ठरवले. स्वतःच थोडा शोध लावायचा असं ठरवले. बलात्कार खरंच झाला असेल तर विरोध तर झालाच असेल. विरोध म्हणजे ओढाओढ, लोटालाटी, मारहाण. शी ! काय काय कल्पना करतेय मी? ते ही माझ्याच मुलाबद्दल.पण ह्या घटनेच्या मुळाशी त्याशिवाय पोहोचता येत नव्हते. राजन बाहेर गेला असतांना त्याच्या रूममध्ये शिरून मी आणखी काही सापडते का ते बघायला लागले. सगळीकडे शोधले पण विशेष असे काही नव्हते. त्याच्या बेडखाली एक बारिक कीर होती. थोडा बेड बाजूला ओढून तिथे पाहिले तर तिथे braची मागची plastic  हूक पडून होती. ते पाहून मला धडकी भरली. बाकी गोष्टी ठीक होत्या पण braची हूक, ते ही राजनच्या रूममध्ये. मी राजनच्या कंगव्यातले केस ही गोळा केले आणि घराबाहेर पडले. तेवढ्यात शेजारचा राहुल मला भेटला.मला म्हणाला,

“काकू, दादाला please सांगा ना speakerचा आवाज थोडा कमी ठेवत जा म्हणून. माझी परिक्षा सुरू आहे आणि तीन दिवसांआधी तुमच्याकडून खूप मोठ्या मोठ्या ने गाणी वाजत होती.”

“हो..नक्कीच..sorry बेटा..” असं म्हणून मी तिथून लगबगीने निघाले. हे खूप strange होतं कारण राजन येवढ्या मोठ्याने गाणी कधीच ऐकत नव्हता आणि तीन दिवसांआधी म्हणजे तो घटनेचा दिवस होता. मी सरळ, माझ्या मित्राला दिनेशला भेटायला त्याच्या ऑफीसबाहेर गेले. तो forensic department कडे काम करत होता. मी त्याला ह्या सगळ्या पुराव्यांची test करायला सांगितले. तो नाही म्हणाला कारण पोलीस complaint, कोर्टाचा आदेश ह्यापैकी काहीच नव्हतं माझ्याकडे. मी त्याला खूप विनवण्या केल्यावर तो तयार झाला.आता फक्त reportsची वाट बघायची होती.

दिनेशने कसं तरी manage करून मला reports मिळवून दिले. ते report उघडतांना छातीत धडधडत होतं. पूर्ण शरीराला कंप फुटला होता. मी देवाचं नाव घेतं report उघडला . पूर्ण शांततेने वाचला आणि result वाचून मटकन खाली बसले. त्या नखांमध्ये असलेल्या त्वचेच्या samples चे DNA आणि राजन च्या केसांचा DNA एकंच होता. त्याने जेव्हा रखुमावर बळजबरी सुरू केली तेव्हा तिने त्याच्या विरोध केला असेल आणि तिने नखांनी त्याच्यावर वार करत असतांना त्यात राजनची त्वचा आली आणि झटापटीत नखं तुटले.म्हणजे राजनच बलात्कारी होता. माझ्या डोळ्यांसमोर एकदम अंधारी आली. मला दरदरून घाम फुटला. गरगरल्यासारखे वाटू लागले. मी कशीबशी माझ्या कारमधून घरी पोहोचले. भरपूर पाणी प्यायले. राजनच्या ह्या रूपाची कल्पना करणे माझ्यासाठी अशक्य होते पण reports पुरावे, हेच सांगत होते. मी सोफ्यावर डोकं पकडून बसले, “का? राजन का?का केलंस तू असं?”

आता मी काय करू?

अचानक आईचं मन म्हणाल, “काय करायचं म्हणजे? सगळं तुझ्याच हाती आहे. विमलाने अजूनही FIR केला नाही आहे. रखुमाचं अजून medical testing झालं नाही आहे. खरंतर ते घटनेनंतर चोवीस तसाच्या आतच व्हायला हवं होतं. हे पुरावे आणि reports नष्ट कर, म्हणजे तुमच्या घराण्यावर ही डाग लागणार नाही. राजनच future ही safe राहिलं आणि तूला बलात्काऱ्याची आई असे शिव्याशापही कुणी देणार नाही. हो, तूला हे लपवावच लागेल.” माझ्या मनात विचार घोळू लागले.

राजनचा जन्म झाला तेव्हा किती खुश होते मी! माझं गोंडस, निरागस बाळ जेव्हा nurse ने माझ्या हाती आणून दिलं तेव्हा असं वाटलं की माझीच त्या बाळाला नजर लागेल. त्याने जेव्हा त्यांच्या इवल्या इवल्या हातांनी माझं बोट पकडलं तेव्हा वाटलं की आता कूठे ह्या जगण्याला अर्थ आलाय. त्याच्या डोळ्यांनी जेव्हा तो माझ्याकडे टक लावून बघायचा तेव्हा वाटलं की मी ह्या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. मी जराही नजरेआड झालेली त्याला चालायचं नाही. नुसता दिवसभर ‘आई, आई’ चा जाप चालायचा त्याचा. त्याला थोडीही इजा झाली की अश्रू माझ्या डोळ्यांतून निघायचे पहिल्या दिवशी शाळेत गेला तेव्हा मला ते तीन तास खायला उठले होते आणि आज, जर मी त्याला गजाआड पाठवले तर बाहेर खरंच सुखी राहू शकेल. नाही! मी नाही करू शकतं हे.. मला राजनचा हा गुन्हा लपवून ठेवावाच लागेल.  मला वाटलं की हे सगळं लपवण्यातच सगळ्यांच भलं आहे, म्हणून मी तशीच सोफ्यावर पडून राहिले.  जरा डोळा लागावा असे वाटतं होते पण कसलं काय? मन शांत होतं नव्हते.

भाग 2: 

 मी उठून TV लावला..एकामागून एक channel बदलवत होते. news channel लावले असता, “नोएडामें लडकी का gangrape, लडकी गंभीर..” मी channel बदलवले, “नागपूर मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी फरार..” एका मागून एक rapeच्याच बातम्या. किती भयंकर आहे हे सगळं? आणि मी एक स्त्री असूनही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी ह्यात सामील होतं आहे..एका दृष्टीने मी सुद्धा गुन्हेगारच झाले ना ! मी सुध्दा बलात्कारीच झाले. आज राजनच्या गुन्ह्यावर मी पांघरूण घातले, तो ह्या सगळ्यातून वाचला तर कदाचित तो उद्या परत असलाच गुन्हा करण्यास घाबरणार नाही. त्याची हिंम्मत अजून वाढेल. वीस वर्षांपूर्वी मी निरागस, छोट्या राजन ला जन्म दिला होता आणि आज जर मी ह्या सगळ्याला वाचा फोडली नाही तर मी एका गुन्हेगाराला, एका बलात्काऱ्याला जन्म दिल्यासारखं होईल. नाही! मला काळजावर दगड ठेवून ह्या विरूद्ध पाऊल उचलावेच लागेल. मी तशीच उठले नि सरळ विमलाच्या घरी गेले. तिचा नवरा, ती आणि मुलगी रखुमा सगळे उदास बसले होते. मी त्यांना समजावून सांगितले की, आधीच खूप उशीर झाला आहे आणखी वेळ घालवून नका. पहिले FIR आणि मग medical test करूया. ते माझ्याकडे आश्चर्याच्या नजरेने बघत राहिले. एक आई असून मी स्वतःच्या मुलाविरूद्ध कशी काय असं वागू शकते हाच प्रश्न त्यांच्या डोळ्यांत होता. कुणालाही हा प्रश्न पडणे साहजिक होतं. माझ्यासाठीही ते खूप कठीण होतं. आधी त्या दोघांनी समाज काय म्हणेल? पोरीची बदनामी होईल. असल्या शंका बोलून दाखवल्या पण मी म्हणाले,

“गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. गुन्हा राजन ने केलाय, रखुमाने नाही. आपण गप्प बसतो म्हणूनच अश्या लोकांची हिंम्मत वाढते. तुम्ही घाबरू नका.मी शेवटपर्यंत तुमची साथ देईल.”

बरंच समजावल्या नंतर त्यांनी माझ्या संगे पोलीस स्टेशनला यायला होकार दिला. मी रखुमाने त्या दिवशी घातलेले कपडेही तिथून एका sack मध्ये सांभाळून ठेवले. ते नखं आणि braची हूकही रखुमाची होती हे check केले.FIR झाला , medical झालं. आम्ही घटनेनंतर तीन दिवसांनी test केली त्यामुळे vaginal test मध्ये sperms detect झाले नाही. पण अंगावरचे घाव मात्र स्पष्ट होते. मी डॉक्टर सोबत आत गेले असता ते घाव बघून माझे डोळे भरून आले सोबतच असं वाटलं की आत्ताच्या आत्ता राजनला विचारावं की काय कमी राहिली होती तुझ्यावर संस्कार करण्यात? का हा दिवस दाखविलास तू मला? एका सोळा वर्षांच्या मुलीसोबत असं कसं वागू शकतोस तू फक्त तुझी काही क्षणांची वासना शमवण्यासाठी.. ”

रखुमाचा केविलवाणा चेहरा बघितला. ह्या एका घटनेने तिला प्रौढ करून टाकले होते. तिच्यात असलेलं अवखळ निरागस बालपण राजनमधल्या वासनांध राक्षसाने गिळंकृत केलं होतं. तिच्यात शरीरावरचे घाव मिटतीलही, वेदना कमी होतील ही. पण मनावरच्या घावांच काय? त्या जखमा, त्या वेदना कधीच भरणार नाही. कायम सलत राहतील. मी सगळं आवरून, रखुमाला आणि तिच्या आईवडिलांना घरी सोडून माझ्या घरी गेले. राजन आणि माझा नवरा ओमकार घरीच होते. थोड्या वेळात पोलीस आले आणि त्यांनी राजनला हातकड्या लावल्या. ओमकार ओरडला, “काय प्रकार आहे हा? काय केलंय राजनने?स्मिता तू तरी काहितरी बोल..” मी तशीच उभी होते एखाद्या पाषाणागत.

एक पोलीस म्हणाला, “सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केलाय ह्याने..”

राजन ओरडू लागला, “आई, आई मला वाचव. मी काहीच केलं नाही आहे..”

मी तशीच कोरड्या नजरेने त्याच्याकडे बघत राहिले. “माझ्याकडे पुरावे आहेत..”

राजन माझ्याकडे बघतच राहिला. त्याला आश्चर्य वाटतं असावं कारण तो माझा इतका लाडका असूनही ना मी धडपडत होते , ना रडत होते. हृदय रडत होते पण मी शेवटपर्यंत माझ्या चेहऱ्यावरून माझे मातृत्वाचे वात्सल्य अश्रू बनून डोळ्यांत येऊ दिले नाही.मी शेवटपर्यंत तशीच खंबीरपणे एकटक पोलीस van जाईपर्यंत बघत राहिले.

ओमकार मात्र धडपडत होता, तळमळत होता. त्याने मला विचारले तेव्हा मी सगळं त्याला detail मध्ये सांगितलं. तो चिडून म्हणाला, “Are you mad? आपल्याच मुलाविरुध्द तू पुरावे गोळा केलेस, त्या विमलाला मदत करणार आहेस आणि case ही लढशील? कसली आई आहेस तू? होतात असल्या चुका कधी कधी मुलांकडून.मग काय त्यांना direct फासावर चढवायच? ”

“चूक..चूक म्हणतोस तू ह्याला ओमकार? अरे! हा गुन्हा आहे. त्या पोरीचा चेहरा बघं एकदा, तिच्या अंगावरचे घाव बघं. इतक निर्घृण क्रूत्य केलंय आपल्या मुलाने आणि तरिही मी गप्प रहायला हवं होतं असं तुला वाटतं. मलाही वाटतं की माझ्या मुलाचं सगळं चांगलं व्हावं पण आता तो फक्त आपला मुलगा राहिलेला नाही आहे. तो एक गुन्हेगार झालेला आहे, rapist झालेला आहे. ह्या समाजासाठी तो घातक आहे..”

“काहीही असलं तरीही तो माझा मुलगा आहे आणि मी त्याला वाचवणारच.. माझ्याजवळही त्याच्या काही छेडखानीच्या complaints आल्या होत्या पण मी तुझ्यासारखा मूर्खपणा केला नाही.हे वयच असं असतं. ते प्रकरण मीच हुशारीने निस्तरल. आताही त्या विमलाला पैसे देऊन हा मामला रफादफा करता आला असता पण तुझ्या मूर्खपणामुळे..”

“काय? म्हणजे ह्या आधीही असले प्रकार झाले होते..का पांघरूण टाकलंस ओमकार त्याच्या गुन्हावर? त्याला वेळीच अद्दल घडली असती तर आज त्याची rape करण्याची हिंम्मत झाली नसती. हा दिवस आपल्याला बघावा लागला नसता. तुझ्या अतीप्रेमापायी राजन एक बलात्कारी झालाय.”

“माझ्यामुळे झालाय की तुझ्यामुळे? ह्या घटनेचा कुणालाच पत्ता लागला नसता जर तू हे प्रकरण गपचुप निपटवल असतं तर पण तू? तू तर सगळ्या जगासमोर त्याला बलात्कारी जाहीर केलंय.. सांग तू सगळे पुरावे कूठे ठेवले आहेत? आत्ताच्या आत्ता मी ते सगळे नष्ट करतो..” ओमकारने जवळजवळ माझ्या गळ्याभोवती त्याचे हात आवरले.

“पुरावे पोलिसांकडे सुरक्षित आहेत..”

ओमकारने मला लोटले आणि तो इकडेतिकडे फोन लावून राजनला सोडायचे मार्ग शोधू लागला. ओमकार आणि मी दोघेही पालक होतो पण आमच्या पालकत्वाच्या पद्धतीत खूप फरक होता. ओमकारची  धडपड मी समजू शकतं होते पण जेव्हा जेव्हा माझ्या मनात राजनबद्दल कीव वाटायची तेव्हा तेव्हा रखुमाचा निरागस चेहरा, तिच्या डोळ्यांतली व्यथा नि तिच्या शरीरावरचे घाव आठवायचे. आणि मग तेव्हा मीच मला सांगायचे, “नाही ..काहीही झालं तरिही ह्या गुन्ह्याला माफी नाही..”

भाग 3:

ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. एकतर सोळा वर्षांच्या मुलीचा  rape, त्यात आरोपी वकील आणि एका मोठ्या businessmanचा मुलगा आणि स्वतःच्या मूलाविरूद्ध case file करणारी एक आई. mediaला काय तिखटमीठ लावून विकायला एक मसालेदार news मिळाली होती. आमची सगळीकडे खूप बदनामी झाली. एका rapistचे मायबाप म्हणून नवीन ओळखही मिळाली. सगळीकडे छी-थू व्हायला लागली. मुलांच्या गुन्ह्यांचे शिंतोडे हे त्यांच्यापेक्षाही त्यांच्या आईवडिलांवर जास्त फेकल्या जातात. ओमकारने वेळीच राजनला खडसावले असते, योग्य ती शिक्षा केली असती तर कदाचित हा दिवस आज बघावा लागला नसता. नातेवाईकांनीही मलाच दोष दिला पण मी डगमगले नाही. ओमकार आणि मी ह्या सगळ्या मतभेदांमुळे वेगळे रहायला लागलो. कोर्टात केस सुरू झाली. रखुमाच्या बाजूने मी तर राजन च्या बाजूने ओमकारने एक नामांकित मोठे वकील नेमले.

एके दिवशी, राजनला भेटायला मी पोलीस स्टेशन मध्ये गेले. त्याला पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी खूप मारले होते. त्याला धड चालताही येतं नव्हते. माझ्या लेकराला, थोडे खरचटले तरी माझ्या डोळ्यांत चटकन पाणी यायचे. औषधं लावण्यास माझी धडपड सुरू व्हायची पण आत्ता..आत्ताही हृदयात कळ आली पण मी स्वतःला सावरले.

“आत्ता का आलीस मला भेटायला? मला अश्या परिस्थितीत बघण्याचा आनंद लुटायला आली आहेस का? काय सिद्ध करायचे आहे तुला? कुठला अवॉर्ड वगैरे जिंकायचा आहे का mother india चा? नक्कीच मिळेल. सगळीकडे तर तुझी वाहवा होतं असेल.किती

महान बाई आहे ही. स्वतःच्या मुलात आणि सत्यात हिने सत्याला निवडलं आणि मुलास गजाआड पाठवल.टाळ्या टाळ्या..सत्कार करा हिचा..असली आई होणे नाही. खरंच मी तुझाच मुलगा आहे ना? की रस्त्यावरून उचलून आणलं होतस? तुझ्यापेक्षा तर बाबांना माझी कदर आहे.किती धडपडत आहेत ते माझ्यासाठी आणि तू इथे तमाशा बघायला आली आहेस? चालती हो, इथून.. ”

“एकवेळ तुझी  वासना शमविण्यासाठी तू एखाद्या वैश्येकडे गेला असतास तरिही कदाचित मी तुला माफ़ केले असते पण बलात्कार..खरंच तुला माझा मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते. इतका मोठा गुन्हा करूनही तुझ्यात अपराधीपणाची भावना नाही आहे. मला वाटलं होतं, तू कळवळशील, माफी मागशील, पश्चाताप करशील पण तू .. तुझ्यासारख्या मुलाची आई असल्यापेक्षा मी निपुत्रीक म्हणून जगणं पसंत करेल.. माझा निर्णय योग्य असल्याचा मला आज आनंद आहे. तुला जास्तीतजास्त शिक्षा कशी होईल ह्याचा मी आता आणखीन प्रयत्न करेल. धन्यवाद राजन. मला भिती वाटतं होती की कोर्टात लढताना माझ्यातली आई, मातृत्व, करुणा जागृत होईल आणि मी चुकेल. पण तुझ्या अश्या वागण्यामुळे मी आणखी कणखर झालेय. एक आई म्हणून जरीही मी fail झाले असले तरिही एक स्त्री, एक माणूस म्हणून fail होणार नाही, ह्याची मी काळजी घेईल..”

मी तिथून मागे न वळता निघून आले.  त्याचं काळात आणखी एक वीज आमच्यावर कोसळली.ह्या बलात्कारातून रखुमाला दिवस गेले होते. सोळा वर्षांची असल्यामुळे तिचे abortion करण्यास कुणी तयार नव्हते. विमला आणि तिचा नवरा ह्या बातमीने आणखीनच घाबरले. ते मला case मागे घेवून रखुमाच लग्नं राजनसोबत लावून द्या, अश्या विनवण्या करू लागले.

“एका बलात्काऱ्यासोबत रखुमा खुश राहिलं असं तुम्हाला वाटतं? आणि हे वय आहे का रखुमाच लग्नाच? असल्या माणसाशी लग्नं लावून तिला तिने न केलेल्या अपराधाची शिक्षा दिल्यासारखे होईल. हे लादलेल बाळ, लादलेला नवरा तेही स्वतःच कमी वयाची असतांना नकोच.मी तिच्या बाळाची पूर्ण जबाबदारी घेईल आणि रखुमाच्या शिक्षणाचीही. आधी आपण तिला शिकवून सक्षम बनवू नि मग तिला तिचा जोडीदार निवडू देऊ..” मी बरंच समजावल्यावर त्या दोघांना धीर आला.

कोर्टाच्या तारखे मागून तारखा जात होत्या. एखाद्यावेळी आमचं पारड वर जायचं तर कधी विरोधी पक्षाच्या वकिलाचं. आमचं झुकत माप दिसताच लोकांची, mediaची चर्चा सुरू व्हायची की कदाचित ही case हरण्यासाठीच मी ही case लढवते आहे जेणेकरून मी माझ्या मुलाला वाचवू शकेल. विरोधी पक्षाच्या वकिलांनी एकही प्रयत्न सोडला नाही. खोटे साक्षीदारही उभे केले. राजनला आरोपी म्हणून बघून डोळे भरून यायचे पण दुसऱ्याच क्षणी मी रखुमाकडे बघायचे आणि आणखी जोमाने बोलायचे. अधूनमधून राजनला bail मिळाली की तो ओमकार कडेच रहायचा. मला कधीच भेटला नाही.case सुरू असतांनाच रखुमाला मुलगी झाली. मी तिला माझ्या घरी घेवून आले नि तिचे संगोपन करू लागले. रखुमाला शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवले. रखुमाची medical test घटनेनंतर तीन दिवसानी झाल्या मुळे rape झालाय हे सिद्ध करणे कठीण जात होते. पण मी गोळा केलेले पुरावे आणि तिला राजनपासून झालेल्या बाळाची DNA test ह्यामुळे आमचे पारडे जड झाले. आणि शेवटी दोन वर्षानंतर मी ती case जिंकले.

राजन गेल्या सात वर्षांपासून jail मध्ये आहे. ओमकार आणि मी विभक्त झालोय.

रखुमा आज स्वतःच्या पायांवर उभी आहे. तिच्या मनावरचे आघात कमी होणं शक्य नाही पण ती आता एक आत्मविश्वास असलेली स्वतंत्र स्त्री म्हणून जीवन जगते आहे .अजून तिला तिच्या मनासारखा जोडीदार सापडला नाही पण एक दिवस नक्कीच सापडेल ही मला आशा आहे.  रखुमाची मुलगी, ‘मुक्ता’ आता शाळेत जाते. खूप गोड आणि समजूतदार आहे ती. ती मला आई म्हणते. आजही ओमकार आणि राजन च्या नजरेत मी एक वाईट आई आहे, काही लोकांच्या नजरेत मी एका बलात्काऱ्याची आई आहे. एका  गोष्टीची मात्र मला खात्री आहे की ह्यानंतर राजन jail मधून सुटून जेव्हा बाहेर येईल तेव्हा असं कृत्य करण्यास तो शंभरदा तरी विचार करेल.

आज ही कधी   कधी राजन आठवण आली की डोळे पाणावतात पण मग डोळ्यांसमोर उभी राहते, रखुमा नि तिची केविलवाणी नजर, तिच्या शरीरावरचे घाव आणि अंतरमनातून एकंच आवाज उठतो,

“नाही..ह्या गुन्ह्याला माफी नाहीच..”

(आपल्या मुलांचे गूण स्वीकारणं जितकं सोपं आहे त्यापेक्षा कितीतरी पटींनी कठीण आहे त्यांचे दोष स्वीकारणं आणि त्याही पेक्षा लाखों पटींनी त्या दोषांना न लपवता ते लोकांसमोर आणून त्याला शिक्षा करणं आणि त्या दोषांची जबाबदारी स्वतःवर घेणं. प्रत्येक पालकाने जर आपल्या मुलांच्या गुन्ह्यांवर परदा न टाकता वेळीच त्यांना योग्य ते शासन केले, योग्य तो मार्ग दाखवला तर असले गुन्हेगार आपल्या समाजात जन्माला येणार नाही..कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. मुलींना सात च्या आत घरात या असं शिकवल्या पेक्षा आपल्या मुलांना हे जग मुलींसाठी कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी  सुरक्षित करण्यास शिकवणे ही काळाची गरज आहे. मुलींनी कसले कपडे घालावे हे त्यांना शिकवल्यापेक्षा मुलांनी स्त्री कडे कुठल्या नजरेने, अदबीने बघावे हे  आपण आज शिकवायला हवे. प्रत्येकास आपआपल्या पद्धतीने जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असावं. ती late night बाहेर असते, कपडे छोटे घालते म्हणून तुम्हाला तिच्यावर हात टाकायचा परवाना ती देत नाही. आपल्या मुलांचं काही चुकतं असल्यास ते लपवू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.. हे सुंदर जग देवाने स्त्री पुरूष दोघांसाठीही बनवलं आहे नि त्यात सामान हक्काने जगण्याचा हक्क ही दोघांनाही दिलाय.. मग मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगळे नियम का? हे सगळं बदलणं पालकांच्या हाती आहे.म्हणून आता पालकत्व शैली बदलवणे अनिवार्य आहे.)

समाप्त..

नमस्कार वाचक मित्रमैत्रिणींनो, कथा वाचल्याबद्दल खूप खूप आभार. .Like, share, comment आणि मला follow करायला विसरू नका. 

 लिहिलेल्या इतर वैविध्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर click करा आणि नवीन कथांसाठी फॉलो ही करा..

[email protected] © 2018 Nisha Adgokar Rase 

All rights reserved. No part of this publication may reproduced, distributed, or transmitted in any form or by any means, including printing , photocopying, recording, or other electronic or mechanical methods, without the prior written permission of the writer, except in the case of brief quotations embodied in critical reviews. For permission requeinsts, contact the writer Nisha Adgokar Rase on [email protected]  

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत