माझा लाडका भाऊराया..

Written by

©️सौ.योगिता विजय टवलारे✍️

घरा घरात रुजलेले ,. फुललेलं आणि प्रेमाने गंधाळलेलं असं बहीण भावाचं नातं..आम्ही तिघे भावंड! आम्ही दोघी बहिणी आणि सर्वात लहान माझा भाऊ! तो पण खूप लाडका..खूप समंजस, थोडा अबोल ,काहीसा रागीट आणि खूप प्रेमळ.. खरं तर रक्षाबंधन साठी लेख लिहायचे म्हटल्यावर छान वाटले.. त्याच्यासाठी लिहिलेला हा पहिलाच लेख..?

त्याच्यासाठी किती लिहू आणि किती नको असं झालंय.. तसंही आवडत्या व्यक्तीबद्दल लिहायचं म्हटल्यावर मन भरून येतचं.. नशिबाने घावी लागतात नाती… आणि त्या बाबतीत मी मात्र खूप भाग्यवान आहे.. इतकी छान नाती, भाऊ मिळाल्यावर आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.. ?

भाऊ म्हटलं की आदर, प्रेम,जिव्हाळा आणि भांडण सुद्धा आलीच..दादाची दादागिरी म्हटल्यावर बहिणीने काय करावं ? आणि काय करायला नको ? असंच काहीसं घराघरात पहायला मिळतं..माझ्याही घरात भावाची दहशत आहे , पण ती प्रेमळ…भीतीदायक नाही… ?

तसा तिथीनुसार माझा जन्म राखीपोर्णिमेचा ! त्याला मिळालेलं आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट , असं मला वाटतं.. असे लिहितांना सुद्धा मला खूप हसू येतंय..माझ्यापेक्षा तो वयाने लहान असूनसुद्धा त्याने मला कधी ताई म्हटलं नाही ..मी लहानपणी मात्र सतत बाबांकडे, त्याने मला ताई म्हणावं म्हणून तक्रार करायचे..?

बाबांचं सगळं ऐकणारा माझा आज्ञाकारक भाऊ..पण आजतागायत आयुष्यातली हीच गोष्ट कधी त्याने ऐकली नाही..पण वाटतं कधी कधी … त्यानेही मला ताई म्हणावं…मी मोठी म्हणून त्याच्यावर लडिवाळ हक्क गाजवावा…

पण तसे कधी झाले नाही आणि होणार सुद्धा नाही..उलट त्यानेच कधी कधी रागात पाहिलं की गपचुप रहावं लागतं..एकदा ताईने सहजच त्याला म्हटलं ,”का रे इतका शांत असतोस ? बोलत का नाहीस ?त्यावर त्याने खूप शांततेत उत्तर दिलं,”मी कमी बोलत नाही , तुम्ही थोडं जास्त बोलता “..
हे ऐकूण मात्र दोघी गप्प बसलो…?

पण आम्हाला आमचं हसू मात्र आवरता येईना..? एकच बोलायचं पण समोरच्याला विचार करत ठेवायचं..असा काहीसा त्याचा स्वभाव.. कमी बोलतो ,पण त्याचं मूड त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव वरून कळतो..लहानपणी घरातल्या घरातच राजकारण खेळायचा… ?

एखादं अंटिक पीस, प्लास्टिकचे छोटे छोटे हत्ती – घोडे, एखादं खेळणं तो मला घरातल्या घरातच विकायचा..मी मात्र रोज बाबांना पैसे मागायचे , त्याच्याकडून माझ्या आवडत्या वस्तू मिळाव्यात म्हणून… पण एक दिवस बाबांनीच मला रागवल ,रोजच एवढे पैसे कशाला लागतात म्हणून? मी माझा मूर्खपणा त्यांना तरी कशी सांगणार??

लहानपणी खूप दंगा मस्ती करायचा , विनाकारण मारायचा…जेवण करतांना त्याला काही दिले नाही तर ताट लपवायचा.. त्याचं काही ऐकलं नाही की तो ,मी भिंतीवर चिकटवलेल्या माझ्या आवडत्या शाहरुख खानच्या पोस्टरवर पेन घेऊन काहीबाही काढून पोस्टर खराब करायचा प्रयत्न करायचा किंवा मग पोस्टर फाडून टाकेल म्हणून धमकी द्यायचा…?

मी मात्र असे होऊ नये म्हणून त्याचे काम ऐकायचे…त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर तो एकदाच सांगतो…ते ऐकलं तर ठीक ,नाही तर परत तेच सांगण्याच्या भानगडीत तो कधीच पडला नाही..म्हणजे तो , “मी भाऊ आहे म्हणून सगळंच ऐकावं !” असा त्याचा स्वभाव नाही…?

कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणार नाही..तो जरी लहान असला तरी त्याच्याकडे पाहिलं की तोच घरात सर्वात मोठा असल्याचा भास होतो..कधी कुणा बद्दल वाईट बोलणार नाही…कधी आई – बाबांशी वाद घालणार नाही किंवा उलट उत्तर देणार नाही.. ह्याचच मात्र मला त्याचं कौतुक वाटतं..मी केव्हाही त्याला बाबांशी नेहमी आदराणेच बोलतांना पाहिलं आहे..कमी बोलणं असलं तरी मित्र मंडळी भरपूर …कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नाही…?

खरंच,पण ह्या जगात प्रत्येक मुलीला एकतरी भाऊ असावा…भाऊ काय असतो? कसा असतो? हे प्रत्येक बहिणीला कळाव. “तुम्हा दोघींचे लग्न झाल्यावर आम्ही घर चेंज करू ,तुम्हाला मात्र तिथला पत्ता देणार नाही “असं बोलणारा माझा भाऊ डोळ्यासमोर आला की अजूनही तोच लहानगा,गोंडस ,खोडकर भाऊ मनात घर करून बसतो..

त्याच्या स्वभावात बदल होऊ नये,किंबहुना त्याने कधीच बदलू नये असं वाटतं .. त्याने कायम माझ्या पाठीशी नाही तर माझ्या सोबत असावं .. आपण वयाने कितीही मोठे झालो तरीही आपलं मन कायम लहानपणीच्या सुंदर, अल्लड आठवणींमध्ये रेंगाळत असतं ..?

बालपणात आपली भावंड ,आपल कुटुंब आपल्यासोबत असतं..तसे तर कायमचं आपणं सोबत असतो ,पण लहानपणाची गोष्ट काही निराळीच असते..नात्यात लहानपणातील निरागसता कायम राहत नाही.. नात्यातला गोडवा कुठेतरी हरवतो..

प्रत्येकजण आपापल्या व्यापात गुरफटून जातो…म्हणूनच राखी पौर्णिमा हे एक निमित्त नसतं का ? एकत्र येण्याचं ? पण त्याला कधी आपल्या भावना बोलून दाखविता येत नाही.. खरंतर कधी कधी वाटतं त्याने परत लहान होऊन मनसोक्त बोलावं…दंगामस्ती करावी… परत माझ्या आवडत्या वस्तू मला विकाव्यात ,मला विनाकारण माराव .. त्याचं ऐकलं नाही की शाहरुखच पोस्टर फाडून टाकण्याची धमकी द्यावी…

खरंच…येतील का ते गोंडस क्षण परत? बालपणातील भारावलेले ,मंतरलेले अनमोल क्षण ? त्याच्याभोवती गुंफलेले प्रेमाचे,हक्काचे जाळीदार कुंपण तोडून परत बालपणात शिरता आले तर……पण नकोच…बालपणाची किंमत तेव्हा कुठे होती ? तेव्हा ओढ होती मोठे होण्याची .. आणि तसेही “सुखाचे, आनंदाचे क्षण पटकन फुलपाखरा सारखे उडून जातात ,पण दुःखाचे क्षण मात्र सतत अवतीभोवती रेंगाळत राहतात…”?

काही का असेना??? मला जन्मो… जन्मी हेच कुटुंब आणि हाच भाऊ हवाय… त्याचं नीटनेटक काम ,गालातल्या गालात हसणं,”त्याचा मार जन्मो जन्मी मिळत रहावा… आणखी काय हवंय मला? फक्त त्याची जन्मो जन्मी कायम सोबत ….आणि हो , ह्या राखी पौर्णिमे निमित्त माझ्या लाडक्या आणि आवडत्या भावाला खूप खूप शुभेच्छा..कायम असाच राहा माझ्या लाडक्या भाऊराया….??

फक्त तुझीच बहिण…

? योगिता विजय ?

#हा लेख सर्वात आधी पुण्यनगरी पेपरला पब्लीश झालाय..ह्याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी..

#आवडल्यास माझ्या नावासकटच शेअर करावा..माझे नाव वगळून जर का शेअर करण्यात आला तर , योग्य ती कार्यवाही करण्यात येईल..

१४/८/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा