#माझी कविता# प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं…

Written by

प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं…

कुणी स्वतःशी प्रामाणिक असतं,
कुणी प्रामाणिक असल्याचं भासवत
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी इतरांच्या उपकराखाली जगणं पसंत करतो,
कुणी स्वाभिमान जपण्यात गर्व मानतो
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी दुसऱ्याचा अपमान करण्यात मोठेपणा मानतो,
तर कुणी इतरांना मान देण्याचे संस्कार राखतो.
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी आहे त्यात समाधान मानतो
कुणी हेवा करण्यात दिवस वेचतो
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी कलह माजवून स्वार्थ साधतो
कुणी मन जोडण्यात आयुष्य खर्ची करतो
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी हक्क ओरबाडतो
कुणी आपले हक्क हिरावले म्हणून हतबल होतो.
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी दुसऱ्याच्या सुखात आनंदी होतो
कुणी फक्त तिरस्कार करण्यात आयुष्य घालवतो.
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी श्रीमंतीत वाढून अगतिक असतो
कुणी फाटक्यात राहून तृप्त असतो.
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी स्वार्थी होऊन नामानिराळा होतो
कुणी निरागस चेहऱ्यामगचे दर्प जाणतो
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं.
कुणी वर्चस्वासाठी उपकारांची सरबत्ती करतो
कुणी मदतीची शृंखला अबाधित ठेवतो
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं….

✍️ स्नेहा किरण नवाळे (पाटील)

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत