माझी कोकणची भूमी

Written by

#माझी_कोकणची_भूमी

माझी कोकणची भूमी गाते निसर्गाचं गान
तिच्या धमन्यांमधुनी वाहे जाज्वल्य अभिमान

आरसपानी प्रताप लेती भव्य सह्यगिरीचे कडे
पाचुंच्या रानांमधुनी चरती गोडगोजिरी गुरे

निळ्याभोर अस्मानावर इंद्रधनुची कमान शोभे
रंगरंगुल्या गवतफुलांवर भिरभिरती फुलपाखरे

वेळूंच्या बनातूनी चंचल वारा शीळ घाले
सागराच्या लाटा गाती शिवबाचे पोवाडे

रतनअबोलीचे वळेसर पिवळ्याशेवंतीची पाती
सुगंधी सुरुंगीचे हार माळी कोकणची माई

सारवलेलं खळं त्यात शोभे तुळशी व्रुंदावन
माडापोफळीची बाग भव्य चिरेबंदी घर

करवंदाच्या जाळीत बालपणीची गाणी
गर्दकेशरी हापूस घेतो युरोपभरारी

बोली अमुची मालवणी आहे रसाळ फार
मायाळू इथली माणसं यांचं कष्टाळू हाड

इथल्या विहिरींचं पाणी त्याची काय सांगू चव
गोडमधुर शहाळी कापारसाळ फणस

माझी कोकणची भुमी आहे दु:खीकष्टी आज
मला विकू नका रे कुणी घाली आर्ततेने साद

नाही ऐकू येत साद तिची तिच्या लेकरांना
दिडदमडीसाठी विकती अपुल्या मातेला

छायाचित्र सौजन्य: भन्नाट फोटोग्राफी

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा