माझी ग्रुहलक्ष्मी सदा आनंदी दिसली पाहिजे!

Written by

माझी ग्रुहलक्ष्मी सदा आनंदी दिसली पाहिजे!

सहा महिने झाले होते,यशवंतरावांचा मुलगा,संजय जाऊन. सैन्यात होता तो. यशवंतरावांच्या सेवानिवृत्ती दिवशी येणार होता तो. पण सीमेवर गस्त घालताना शत्रुसैन्याच्या एका गोळीने घात केला.गोळी छातीतून आरपार गेली.

पुरी पंचक्रोशी लोटली होती संजयच्या अंत्यसंस्कारासाठी. मुलगा तर अगदी लहान एक वर्षाचा. सुनबाईचं दु:ख आभाळाएवढं. तिच्याकडे पाहून काळीज फाटत होतं .

भेटायला येणाऱ्यांना सुनबाई,कुसुमने सरळ सांगितलं, “मला कोणाचीही सहानुभूती नको. माझ्या बाळालाही नको. खरंच तुम्हाला देशाबद्दल प्रेम असेल तर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्याला सैन्यात सामिल होण्यास प्रव्रुत्त करा किंवा सजग नागरिक तरी बना.ती खरी श्रद्धांजली ठरेल.” सगळी लोकं अवसान गाळून पाठी परतलेली.

यशवंतरावांना दु:खातही सुनेच्या करारी मुद्रेचं कौतुक वाटत होतं. दोनेक महिन्यांत सुनबाई दु:ख मनाच्या कोपऱ्यात बांधून ठेवून नोकरीला लागली. भाऊ घेऊन जायला आला तिचा, तर नाही म्हणाली त्याला. त्याला म्हणाली,”आपल्या आईवडलांना बघायला तू आहेस. संजयच्या आईवडलांना कोण बघणार? आत्ता मी त्यांचा संजय आहे व ते माझे आईवडील. भाऊ आल्या पावली परत गेला. यशवंतराव सुनेचं हे रुप पाहून सदगदित व्हायचे.

घरात कपडेभांड्याला बाई लावली. स्वैंपाकाचं सासूसुना वाटूनवाटून करत होत्या. दोघींचही दु:ख मोठं. तरी एक ठरवलेलं त्यांनी घरात बाळासमोर रडायचं नाही. मुळी रडायचंच नाही.

अशातच मार्गशीर्ष आला. पहिला गुरुवार. गेल्या वर्षी किती हौसेने पुजलेला कुसुमने. यशवंतराव बाजारात गेले. पिशवीभरुन फळं घेतली. फुलवाल्याकडे गेले.टवटवीत शेवंती, दुर्वा,तुळसी, पानं,सूपारी,धुप,कापूर सारं काही घेतलं. सुनेच्या आवडीची सिताफळं जरा जास्तच घेतली. लीटरभर म्हैशीचं दूध घेतलं,बासुंदीसाठी. घरी येईस्तोवर त्यांना अकरा वाजले.

सगळी सामुग्री सुनेच्या हवाली करुन म्हणाले,”कुसुम,चल पूजा करायला घे बघू लक्ष्मीमातेची. गेल्यावर्षी पोथी ऐकायला फक्त तुझी सासू बसलेली. यावेळी मीही बसणार तिच्यासोबत व आमचा नातूसुद्धा.”

प्रथमच कुसुमचे डोळे भरुन आले. सासऱ्यांना व सासुबाईला मिठी मारुन खूप रडली. सासूने तिच्या पदराने कुसुमचे डोळे पुसले. कपाटातली साडी कुसुमसमोर ठेवून म्हणाली,”छान तयार होऊन ये.माझी ग्रुहलक्ष्मी सदा आनंदी दिसली पाहिजे.” कुसुम केसांवरुन न्हाऊन,साडी नेसून आली. दोघींनी मिळून पुजेची तयारी केली. नातू व आजोबांचा तोवर घोडाघोडा चालला होता. आजीने पंचामृत तयार केलं. दिवा लावला. नथ ,शेवंतीची वेणी,मंगळसूत्र ,दागिने घालून लक्ष्मीमातेला नटवलं. सासू कुसुमचे दागिने घेऊन आली व तिने स्वत: तिच्या हातात हिरवा चुडा,तोडे घातले. तिच्या गळ्यात राणीहार,मोठं मंगळसूत्र घातलं.तिला छान हळदकुंकू लावलं.

सासुसासऱ्यांच्या पाया पडून कुसुम पुजेला बसली. फोटोतल्या संजयलाही ते द्रुष्य पाहून गहिवरुन आलं.

———-गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा