माझी फुलराणी

Written by

#माझी फुलराणी
आज जवळच्या मैत्रिणींसोबत एका सामाजिक संस्थेला भेट देण्याचा योग आला. ही सामाजिक संस्था अनाथ, गरीब, अत्याचाराने पीडित असलेल्या मुलींसाठी काम करते. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासापासून शैक्षणिक विकासापर्यंतची सगळी जबाबदारी घेते. बाहेरच्या असुरक्षित जगात वाढणाऱ्या मुली इथेच खूप सुरक्षित राहतात हे त्यांच्याशीच बोलताना कळलं.
सहा सात वयापासून ते अगदी अठरा वयापर्यंतच्या मुली इथे होत्या. काही प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करत होत्या तर काही स्वतःतच हरवून एकटक बघत होत्या….त्यांच्यासोबत काहीतरी भीषण प्रकार घडलेला असावा असच काहीसं वाटायचं. अशीच एकटक बघणारी जुई तिथे दिसली. खरंतर तिला तिथे त्या अवस्थेत बघून माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला…क्षणभर वाटलं तिच्यासारखीच दिसणारी कोणीतरी वेगळी मुलगी असावी म्हणून तिच्याबद्दल चौकशी केली तर कळलं की ती जुईच आहे.
जुई जी रोज मी ऑफिसला जाताना गोड हसून गुड मॉर्निंग म्हणायची. मी बसची वाट बघत असायचे त्या स्टॉपच्या बाजूलाच ही फुले,गजरे, देवांचे हार विकायला बसायची. रंगाने सावळी पण चेहरा नेहमीच गुलाबासारखा टवटवीत. हसली की मोगऱ्यासारखे पांढरेशुभ्र दात झळकायचे…उजव्या गालावर अबोलीची कळी उमटायची. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता जणू देवाला वाहणाऱ्या जास्वंदाच्या फुलाप्रमाणे भासायची.
डोळ्यांत वेगळं तेज चमकायचं आणि तिचा तो निष्पाप हसरा चेहरा पाहिला की माझा दिवसच बनायचा. एकदा ऑफिसमध्ये कार्यक्रम असताना मी घाईघाईत तिच्याकडे गुलाबाची फुलं घ्यायला गेलेले…आधीच मला उशीर झालेला त्यात आयत्या वेळी मला गुलाबाची फुलं आणायला सांगितलेलं म्हणून मी चिडलेले त्यात पर्स मध्ये पैसे असूनही कोणत्या कोपऱ्यात जाऊन लपलेले देव जाणे सापडतच नव्हते…डोक्यावर आट्या पाडून, चिडचिड करून कसेतरी तिच्या हातात पैसे टेकवले आणि गुलाब घेऊन निघाले तेवढ्यात ती म्हणाली..ताई चेहरा हसरा ठेवत जा ग..तू खूप सुंदर दिसतेस हसताना. तिचं बोलणं ऐकून आपसूकच माझ्या तोंडावर हसू आलं..वैतागलेला मूड कुठल्या कुठे पळाला. त्या दिवसापासून रोज सकाळी जाताना मी तिच्याकडे बघून हसायचे आणि ती तेवढंच गोड हसून गुड मॉर्निंग म्हणायची.
मला फुलं जितकी आवडायची.. फुलं जशी प्रसन्नता द्यायची तशी आता जुई आवडू लागली होती आणि म्हणून मी तिला ‘फुलराणी’च म्हणायचे…तिलाही ते आवडायचं.
एक दिवस बस उशिरा येणार होती मग बसले तिच्यासोबत गप्पा मारत. शाळेत जातेस का हा महत्वाचा प्रश्न विचारला, ती म्हणाली, “जाते ग ताई..सकाळी आठ वाजल्यापासून इथे गजरे,फुलं विकायला बसते. अकरा वाजता घरी जाऊन जेवते आणि तशीच शाळेत जाते. शाळेतून आले की संध्याकाळी परत आईसोबत त्या समोरच्या मार्केट मध्ये भाजी विकायला बसते. आई सकाळी धुणी भांडी करायला जाते..लहान भाऊ आहे तो शाळेत जातो… बाप आमच्याकडे कधी येतो तर कधी येतही नाही. आई सांगते त्याची दुसरी बायको आहे तिच्याकडेच राहतो तो. मी आणि आई पैसे कमवून घर चालवतो. बारा तेरा वर्षाच्या मुलीच्या तोंडून ‘घर चालवते’ हा शब्द ऐकला आणि ती वयाने लहान असली तरी परिस्थितीने तिला कधीच मोठं केलंय हे कळलं. तेव्हापासून मी नेहमी तिच्याकडूनच गजरे,फुलं, देवाला हार घ्यायचे. कधी तिला सुट्टे नाहीत ग, ठेव हे पैसे तुझ्याकडे अस म्हंटल तर ती नाकारायची. आईने सांगितलं जितकं प्रामाणिकपणे आपल्या कष्टाचं मिळतं तेवढेच पैसे कमवायचे..असे कोणाकडून घ्यायचे नाहीत अस म्हणायची. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर विलक्षण अभिमान दिसायचा मला. नेहमीच खुश, आंनदी, समोरच्यालाही चैतन्य द्यायची ती.
मी कधी भेटली नाही तर म्हणायची तू दिसत जा ग रोज.छान वाटतं तुझ्याशी बोलून..तू जस प्रेमाने बोलतेस तस आमच्याशी कोणी बोलतच नाही. काही दिवसांतच आमच्यात वेगळंच नात निर्माण झालेलं..विश्वासाच,प्रेमाचं, आपुलकीचं.
बऱ्याचदा दोघींची भेट नाही झाली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. असेच गेले दोन चार दिवस ती त्या जागेवर दिसत नव्हती म्हणून मला काळजी वाटतंच होती.
आणि आज ती मला इथे अनपेक्षितपणे भेटली. तिच्याबद्दल लगेच तेथील मॅडमना विचारल्यावर कळालं की चार दिवसाआधीच दुपारच्या वेळेत तिच्याच चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यावर ही रक्ताने लथपथ पडलेली दिसली…शुद्धीत नव्हतीच फक्त विव्हळत होती..आई आई म्हणत कण्हत होती. तातडीने सरकारी दवाखान्यात नेऊन तिच्यावर उपचार केले. पोलिसांनी ती शुद्धीत आल्यावर चौकशी केली तेव्हा तो नराधम तिचा चुलत भाऊच होता हे कळलं. खूपदा त्याने हिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता..तसं तिने आईला सांगितलंही होत पण भाऊ आहे तो प्रेमाने जवळ घेत असेल आणि तुला वेगळं काय वाटत त्यात अस म्हणून आई गाफीलच राहिली. अखेर त्याने त्याचा डाव साधला आणि पळून गेला.
जुईसोबत जे घडलं ते ऐकून मी स्तब्धच ररोज सकाळी मला तिचा हसरा,प्रसन्न चेहरा दिसायचा..जिच्याकडे बघून माझा ताण मी विसरून जायचे..सकारात्मकता अंगात संचारायची आज ती केविलवाणी,हताश,निराश शून्यात नजर लावून बसली होती. खूप हिंमत एकटवून मी तिच्या जवळ गेले…तिने मला ओळखलं की नाही काही कळलं नाही कारण बराच वेळ ती फक्त माझ्याकडे डोळ्यांची पापणीही न लवता बघत होती. मी मायेने तिच्या गालावरून हात फिरवला तसं तिच्या डोळ्यातून अश्रुधारा बरसू लागल्या.. माझ्या कुशीत शिरून हंबरडा फोडून रडू लागली..तिला खूप काही सांगायचं होत,बोलायचं होतं पण अश्रू अनावर होत होते. रडू दिलं मीही तिला मनसोक्त. रडूनच तिला हलकं वाटणार होतं. ती शांत झाल्यावर जेवणाचे चार घास भरवून मी परत येते अस सांगून तिथून जड अंतःकरणाने मी बाहेर पडले.
भाऊ तर रक्षणकर्ता असतो पण आज तोच राक्षस ठरला जुईच्या बाबतीत. माणुसकीला, पवित्र नात्याला त्या नराधमाने काळीमा फासला होता. पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर त्याला फाशीचीच शिक्षा होईल यासाठी मीच प्रयत्न करणार होते. पण आता जुईला पूर्ववत तिच्या आयुष्यात आणणं खूप महत्वाचं होतं. आठवड्यातून एकदा तरी तिला जाऊन भेटेन..तिला या धक्क्यातून सावरायला मदत करेन अस मनोमन ठरवत चालत राहिले..जुई बसायची त्या जागेवर पोहचले..आताही ती मला तशीच डोक्यावर गुलाबाची फुलं, गजरे,चाफा,हार यांची पाटी घेऊन गोड हसताना दिसते..तेवढीच सुदंर,चेहऱ्यावर निरागसतेचं, आत्मविश्वासाचं सौंदर्य पसरलेली.
कथा काही प्रमाणात सत्य घटनेवर आधारित आहे. अशा गरीब असलेल्या, बिकट परिस्थितीत राहणाऱ्या, पोट भरण्यासाठी छोटं मोठं काहीतरी विकणाऱ्या मुलींचं खूप लहान वयात लैंगिक शोषण तर होत असतंच तर काहिजणींवर तिच्याच घरचे भाऊ,बाप,काका बलात्कार करत असतात. नकळत्या वयात खूप काही सोसावं लागत या मुलींना. कित्येकजणी परिस्थिती समोर हार मानून तोंड न उघडता सगळं सहन करत बसतात…काहीजणींची अवस्था जुईसारखी होते. कोवळ्या वयातच अशा कितीतरी कळ्या खुडल्या जातात ज्या पुन्हा कधीच फुलत नाहीत. माझी फुलराणी बहरायची राहूनचं गेली.
कथा आवडल्यास लाईक,कॉमेंट्स नक्की करा..शेअर करा फक्त नावासहितच😊🙏.
©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा