माणुसकी…

Written by

माणुसकी…

माणुसकी म्हणजे काय हो…?

माणुसकी म्हणजे प्रेम…
माणुसकी म्हणजे जाणीव…
माणुसकी म्हणजे
माणसाने माणसाची केलेली कदर…
माणुसकी म्हणजे
माणसाने माणसाचा केलेला आदर…
माणुसकी म्हणजे
माणसाने माणसास दिलेली समानतेची वागणूक…
माणुसकी म्हणजे…
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…

माणुसकी म्हणजे निस्वार्थ भावनेने
केलेले निरागस प्रेम…
माणुसकी म्हणजे जाणीव…
याचा अनुभव मध्यन्तरी मी घेतला.

आमच्या सोसायटीतील स्टोअर रूममध्ये तीन मांजरीची पिल्ले होती… काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी जन्मलेली असावीत.. पण त्यांची आई मात्र कुठे दिसत नव्हती… उपाशी पिल्लांना ओरडतानाचा आवाज येऊ लागला तसे आमच्या सोसायटीतील बालचमुंचे त्याकडे लक्ष गेले..

मग काय.. बालचमू सरसावले मदतीला… यात माझी मुलगी देखील सामील होती आणि तिचे अन तिचे मित्रमंडळी देखील… सर्वांचेच वय दहा वर्षे.

आई विना पिलांना पाहून मुलांना खूप वाईट वाटले.. त्यांनी पिलांना दूध दिले..
सर्वांनी मिळून विटांचे घर रचले अन वर झाकण म्हणून पुठ्ठा ठेवला.

कुणी टोपली आणली, कुणी आणले दूध तर कुणी आणला टॉवेल… अशा सर्वांनी मिळून वस्तू जमा केल्या अन बनवलेल्या घरात ठेवल्या.

पिलेही सुखावली.. पोटभर दूध पिऊन झोपी गेली… पिलांची नावेदेखील त्यांनी ठेवली…
सर्वांनी मग दूध कधी कुणी आणायचे हि वेळ ठरवून घेतली… रोज मुले शाळेत जाताना आणि शाळेतून आल्यावर पिलांची काळजी घ्यायचे.

मुलांचा नुसता आवाज येताच पिले देखील कान टवकारून बाहेर यायची… मुले खेळत असताना त्यांच्या अवतीभवती खेळायची.. इकडून तिकडे पळायची… अन मुले गेली की गुपचूप घरात जाऊन बसायची… तो नजारा पहायला खूप गंमत यायची.. यातून मुलांची त्या पिलाविषयीची काळजी आणि प्रेम दिसायचे.

सरेचजन मग खुश झाले जमेल तसे लक्ष ठेऊ लागले…
बोकोबांपासून पिलांचे रक्षण करू लागले…
आईविना मांजरीची लेकरे पाहून मुलांचे मन हळहळले…
अन माणसाच्या पिलात माणुसकीचे दर्शन मला घडले…

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
इतर

Comments are closed.