मातृत्वाचा षटकार…..!!!! (भाग 1)

Written by

मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलींकडे पिंटी टक लावून बघत होती…तिला तो छंदच जडला होता..प्रत्येक मुलीचं बारीक निरीक्षण, कोच च्या शिकवण्याकडे नीट लक्ष देण्यात तिला भारी गंमत वाटे…

“गोल्या कुठं पळतोय रं… बस की एक जागी…वैताग आणलाय या पोऱ्यानं…. आरे पोरं पळू ऱ्हायलीत आपटशील रं….”

मैदानात नजर असता अचानक तिचं लक्ष गोलू कडे गेलं..
गोलू ला आवरत आवरत पिंटी च्या नाकी नऊ आले होते…गोलू जबरदस्त हट्टी होता…

पिंटी आणि तिचा नवरा एका स्पोर्ट्स क्लब च्या आवारात
छोटंसं पत्र्याचं घर बांधून पूर्ण मैदानाची देखभाल करत होते. पिंटी चा नवरा पांडुरंग मैदानाला पाणी मारणे, जिम मधल्या क्रीडा साहित्याची देखभाल करणे इत्यादी कामं करत असायचा आणि पिंटी त्याला हातभार लावत असायची…काही वर्षांपासून ती इथेच होती…त्यांना 3 वर्षाचा एक मुलगा होता…गोलू….

या स्पोर्ट्स क्लब लाच त्यांनी आपलं जग मानलं होतं… इथल्या सर्व सामानाची आणि मैदानाची मालकी जणू त्यांच्याकडेच होती.

पांडुरंग अतिशय उत्तम पद्धतीने मैदानाची देखभाल करत असे…गोलू ला डोळ्यादेखत 24 तास खेळच खेळ दिसायचा त्यामुळे त्याचा पूर्ण दिवस मजेत जायचा…गोल्या आणि पिंटी कौतुकाने मैदानातला खेळ बघत…

या काळात महिला क्रिकेट ला बऱ्यापैकी ग्लॅमर निर्माण झालं होतं… अधिकाधिक मुली आता क्रिकेट कडे वळू लागल्या होत्या…मैदानावर एक नवीन कोच काही मुलींना मैदानावर घेऊन आला होता…पांढरा शर्ट, त्यावर क्लब चा लोगो, त्यावर स्वेटशर्ट…त्या मुलींना पाहून पिंटी ला भारी कुतूहल लागलं…पटापट कामं आवरून गोल्या ला घेऊन ती मैदानाच्या कोपऱ्यावर जिथे त्या मुली आणि कोच होत्या तिथे गेली….

कोच तिथे नावं लिहिण्यात आणि सूचना देण्यात बिझी होता…पिंटी आणि गोलू तिथून निघाले… कोच चं सहज लक्ष गेलं…तोवर पिंटी आणि गोलू तिथून निघून गेले होते, त्यांची पाठमोरी आकृती केवळ दिसत होती….

दुपारचा 1 वाजला होता…गोलू ला झोपवून पिंटी तिच्या घराच्या बाजूला कपडे धुण्यात मग्न होती…मैदानावर काम करून पांडुरंग चे कपडे जाम मळकट होत असत… ते धुताना पिंटी ला फार मेहनत करावी लागायची…धोपटण्याने आपटत आपटत ती सगळा मळ काढून कपडे अगदी लक्ख धुवायची….

काम करता करता तिच्या लक्षात आलं की मागून आपल्याला कोणीतरी पाहतंय… तिने हळूच मागे वळून पाहिले तर कोच उभा होता….त्याला काहीतरी हवे असेल असं तिला वाटलं…तो काहीतरी बोलेल याची वाट ती पाहू लागली…पण त्याने तिच्याकडे फक्त निरीक्षण केले आणि निघून गेला…

पिंटी गोंधळून गेली, हा काय प्रकार आहे…?

दुसऱ्या दिवशी पिंटी चुलीवर चहा करत होती..तिची चूल बाहेरच होती…चहाचा मस्त वास येत होता..क्रिकेट कोच तिथूनच जात होता…चहाच्या वासाने त्याला मोह आवरला नाही..न लाजता तो अधशासारखा तिथेच थांबला…पिंटी ला हसू आलं..

“साहेब बसा, गरम गरम चहा घ्या…”

खुर्ची देऊन तिने साहेबांना बसवले..

तिचा 2 कप चहा तिने 3 कपात ऍडजस्ट केला आणि साहेबांना, पांडुरंग ला आणि तिला गाळला… पांडुरंग साहेब शेजारी खाली बसून राहिला…चक्क साहेब आपल्या गरीबघरचा चहा पितोय पाहून त्याला भारी कौतुक वाटलेलं…

तेवढ्यात गोलू तिथे आला…सारखा चुलीजवळ जायचा…पिंटी हात लांबवून गोल्या चा हात पकडून त्याला दूर पिटाळायची… पण गोल्या जाम हट्टी… सारखा तिथे पाळायचा आणि पिंटी शिताफीने दुसऱ्या सेकंदाला तिथून बाजूला करायची…कितीतरी वेळ हा खेळ चालला होता…कोच श्वास रोखून ते पाहत होता…त्याचा डोक्यात कसलेतरी विचारचक्र चालू होते…

“साहेब चहा थंडा व्हायचा…घ्या की लवकर….”

कोच भानावर आला…उरलेला चहा पटकन संपवला आणि समाधानी चेहऱ्याने मैदानाकडे वळला…

कोच मैदानात मुलींना बॅटिंग शिकवत होता…पिंटी आणि गोलू परत ते पाहायला मैदानाच्या कोपऱ्यावर गेले…
लांबूनच ते सगळं पाहत होते…
कोच च्या लक्षात आलं…त्याने खूण करून दोघांना जवळ बोलावलं…पिंटी घाबरली…बिचकत बिचकत जवळ गेली…कोच ने त्यांना तिथेच उभं राहायला सांगितलं आणि कोच ने पुन्हा आपलं काम सुरू केलं…बॅट हातात कशी पकडायची, कुठल्या बॉल ला कसा फटकारा मारायचा हे तो शिकवत होता…पिंटी आणि गोलू ते बघत होते…पिंटी ला अजून धाकधूक होती…

कोच ने सांगितलं की रोज इथेच उभं राहायचं…

“माफ करा साहेब कुठे चुकलं तर…”

“अगं शिक्षा म्हणून नाही, प्रेक्षक असले की खेळणाऱ्याला हुरूप येतो….म्हणून…”

पिंटी खुश झाली, आता जवळून सगळं पाहायला मिळणार…

पण गोल्या च्या डोक्यात भलतंच खुळ भरलं…घरी आल्यावर आपल्यालाही त्यांच्यासारखं क्रिकेट खेळायचं म्हणू लागला…पिंटी ने पांडुरंग ला जिम मधून बॅट बॉल आणता येईल का म्हणून विचारलं…पांडुरंग ने नकार दिला…”ते आपलं सामान नाही, आपण हात नाही लावायचा…”

 

पुढील भागाचे लवकर अपडेट्स मिळण्यासाठी खालील फेसबुक पेज लाईक करा

https://m.facebook.com/irablogs

 

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत