मातृत्वाचा षटकार…..!!!! (भाग 2)

Written by

पण गोलू हट्टाला पेटला होता…शेवटी पांडुरंगाने नाईलाजाने एक थोडी तुटकी बॅट आणि बॉल आणला..

गोलू आनंदला…रात्री कितीतरी वेळ गोलू आणि पांडुरंग खेळत होते…पांडुरंग बॉल टाकायचा, गोल्या नेम लावत बॅट ने तो उडवायचा प्रयत्न करी…

गोलू ला तो छंदच लागून गेलेला…दुसऱ्या दिवशी पांडुरंग कामाला गेल्यावर गोलुने पिंटी कडे हट्ट धरला..

“आता कामं सोडून खेळत बसू का..” पिंटी गोलू वर ओरडली….गोलू जमिनीवर लोळत आरडा ओरडा करत हट्ट धरू लागला..शेवटी पिंटी ने हातात बॅट घेतली आणि म्हटली…”हा टाक बॉल….”

गोलू ने आता रोजचंच लावलं…पिंटी आणि गोलू चा रोज खेळ चालायचा…पिंटी जेव्हाही बॅट हातात पकडत असायची तेव्हा तिला त्या कोच च्या गोष्टी आठवू लागल्या….त्यानुसार ती बॅट ची हालचाल करायची….

एकदा कोच ने त्यांना पाहिलं…पिंटी जाम घाबरली…कोच आता त्यांची बॅट वापरतो म्हणून रागावणार….

“चांगल्या बॅट ने खेळा की….”

असं म्हणत कोच ने नवीन बॅट त्यांना दिली….गोलू उड्या मारत नाचू लागला….

पांडुरंग मैदानाच्या एका टोकाला पाणी मारत होता…पाण्याची नळी जमा करत असताना फरशिवरून त्याचा पाय सटकला आणि पडला…पिंटी ने लांबून ते पाहिलं आणि जिवाच्या आकांताने पळत ती त्याच्याकडे गेली….

“दम खा…किरकोळ लागलंय…” पांडुरंग म्हणाला….

एका ठिकाणी त्याला जखम झालेली …रक्त वाहत होतं… पिंटी पुन्हा आपल्या घराकडे पळाली, कापडाची चिंधी घेतली, पुन्हा त्याच वेगाने परत मैदानाच्या त्या टोकाला पळाली आणि पांडुरंग च्या पायाला गुंडाळली…

कोच तिच्या धावण्याच्या वेगाने चक्रावून गेला होता…

त्याने फर्स्ट एड किट काढलं आणि पांडुरंग ची परत मलमपट्टी केली….

मैदानात मुलींची क्रिकेट ट्रेनिंग चालूच होती, त्याला आता 6 महिने लोटले…आता टुर्नमेंट्स चं वारं वाहू लागलं होतं…20 ते 25 वयोगटातल्या मुलींसाठीच्या सी के नायडू कप ची घोषणा झालेली, कोच ने त्याचा मुलींचा संघ नोंदवला..त्याचा मुली उत्कृष्ट खेळी करत फायनल ला पोहोचल्या होत्या….

फायनल मॅच त्यांचाच ग्राउंड वर होती…

कोच ने मुलींना सर्व इन्स्ट्रक्शन दिल्या…

समोरची टीम जबरदस्त होती, त्यांच्यापुढे टिकाव लागणं अवघड होतं …कोच ला चिंता पडलेली….

फायनल मॅच चा दिवस उजाडला…सकाळी 10 वाजता स्पर्धा सुरू होणार होती…

पिंटी आणि गोलू उत्सुक होते मॅच पाहायला…पिंटी मॅच साठी पटापट आपली कामं उरकून घेत होती…

9 वाजता कोच मैदानावर हजर होता….इतक्यात त्याला एक फोन आला, टीम मधील एक महत्वाची खेळाडू आणि बाकी 3 राखीव मुली पावसात अडकल्या होत्या आणि त्या ठिकाणची रेल्वे बंद होती….त्यांना आता येणं शक्य नव्हतं….

कोच गोंधळला नाही, त्याने तडक टीम चा एक युनिफॉर्म घेतला आणि पिंटी कडे गेला…

पिंटी भाकरी थापत होती…

“पिंटी हा युनिफॉर्म घाल आणि चल खेळायला…”

“साहेब चेष्टा करताय का…माफ करा काही चुकलं असेल तर..”

“चेष्टा नाही, मी खरंच बोलतोय, आज तू खेळायचंस…”

पांडुरंग तिथेच होता…हे काय चाललंय हे पाहून दोघे कितीतरी वेळ निःशब्द होते…

“पिंटे, साहेब म्हणताय तर घाल ते कापडं आणि जा खेळायला…” पांडुरंग म्हणाला…

पिंटीने घाबरत तो युनिफॉर्म घातला…”मला पण पाहिजे” असा हट्ट गोलुने धरण्याच्या आत पांडुरंग ने त्याला दुसऱ्या खेळाच्या नादी लावलं….

आता मॅच सुरू झाली….
कोच ने टीम ची लिस्ट देताना पिंटी चं नाव जोडलं…

पण लागलीच त्याचा लक्षात आलं की 25 वर्षाच्या आतल्या वयातल्या मुलींनाच प्रवेश आहे…त्याने पांडुरंग ला पिंटी चं वय विचारलं…

“21 वरीस… लहान वयातच लग्न व्हता साहेब आमच्यात….”

कोच ने सुटकेचा निश्वास टाकला…

मॅच सुरू झाली…

कोच च्या टीम ची आधी बॉलिंग होती…

एकूण 10 षटकांची खेळी होती…

पहिली ओव्हर सीमा ने टाकली, 8 रन झाले…
दुसरी, तिसरी ओव्हर झाली…कोणीही आऊट व्हायलाच तयार नाही आणि समोरची टीम चौकार षटकार मारत होते…

कोच ने काहीतरी विचार केला…ब्रेक मध्ये टीम ला बोलावलं…पिंटी कडे विकेट किपिंग दिली….

तिला सांगितलं…

“हे बघ पिंटे, असं समज की तुझ्या मागे पेटती चूल आहे…आणि हा बॉल म्हणजे गोलू आहे… तो मागे गेला म्हणजे त्याला चुलीचा चटका बसलाच समज…आणि बॉल हातात घेतला आणि बॅट्समन थोडा जरी पुढे गेला तरी हा बॉल स्टंप ला मारायचा…समजलं?? ”

चूल आणि गोल्या पिंटी च्या डोळ्यासमोर फिरत होते..

मॅच सुरू झाली..

पिंटी विकेट किपिंग ला ऊभी..

बॉल आला, बॅट्समन ला मारता आलं नाही…मागे गेला…जिवाच्या आकांताने “गोलू………..” म्हणत पिंटी ने तो पकडला….आणि स्टंप वर आदळला….बॅट्समन आऊट…एकच जल्लोष…

चौथी ओव्हर…

बॅट्समन च्या बॅट ची कडा लागून बॉल मागे, पिंटीने पळत जाऊन गोलू ला चुलीकडे जाण्यापासून रोखले…without टप्पा कॅच….एकच जल्लोष…

5,6 ओव्हर…टीम ने बऱ्यापैकी रन केले…

7वी ओव्हर…बॉलर ने बॉल टाकला, बॅट्समन च्या पॅड ला लागला….टीम शांत…

“आउट हाय…..”

पिंटी ओरडली….

अंपायर चा बोट वर…

टीम जमा झाली.….

कसकाय आऊट???

“कोच ने शिकवेल नव्हतं का, ते एल बी डब्ल्यू की काय म्हणत्यात ते…वरडलं नाही तर आऊट बी देत नस्त्यात….”

एकच जल्लोष…

पुन्हा 2 बॅट्समन पिंटी कडून कॅच आऊट….

ओव्हर संपल्या, 90 रन्स समोरच्या टीम ने केले…

दुसरी इनिंग…

कोच ची टीम बॅटिंग ला…

कविता आणि पूजा ओपनर…

समोरच्या टीम ची तगडी बॉलिंग…बॅट ला बॉल लागेच ना….

2 ओव्हर झाल्या..कसेबसे 5 रन्स केले…

तिसरी ओव्हर…पूजा आऊट…

चौथी ओव्हर…कविता आऊट…

पाचवी ओव्हर…जेमतेम 15 रन्स झालेले…

[इकडे कोच ची अवस्था वाईट झालेली…

आता 30 बॉल मध्ये 76 रन्स हवे होते…

तिसरी बॅट्समन आऊट…

स्नेहा बॅट घेऊन उतरणार
इतक्यात कोच ने अडवले, पिंटी ला बॅटिंग करायला सांगितले…

“Sir, she don’t have enough experience…”

बाकीच्या खेळाडू बोलल्या…

पण कोच ने ऑर्डर दिली, पिंटी ला बोलावले…

“हे बघ, असं समज की येणारा बॉल म्हणजे पांडुरंग चा शर्ट आहे..आणि तुझ्या हातात बॅट नसून धुपाटणं आहे….जोर लावायचा…”

पिंटी ने ट्रेनिंग च्या वेळी कोच च्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या, त्याही अमलात आणायचं तिने ठरवलं….आणि घरी गोलू मुळे तिची बॅटिंगची रोज प्रॅक्टिस होत असे…त्या सगळ्याचं फलित आता या खेळातून बाहेर येणार होतं….

30 बॉल…76 रन्स…

सहावी ओव्हर…

पिंटी ने संथ खेळी केली…

गोल्याला सांभाळत तिच्यातले पेशन्स खूप वाढले होते, त्यामुळे आधीच जोरात खेळी न करता आधी माहोल समजून घेतला…24 बॉल्स, 70 रन्स…

आता पिंटी ला पांडुरंग चा शर्ट दिसू लागला, मळकट…अगदी बॉल च्या चॉकलेटी रंगासारखा…असला शर्ट घालून पांडुरंग ची इभ्रत घालवायची?? आज्यबात नाय…”

आला बॉल, धु…धु…चौकार…षटकार….चौकार…षटकार…

कोच आणि टीम आनंदाने जल्लोष करत होती…

तिकडून गोलू…”आये मार…मार अजून….” बोलत होता….

पांडुरंग अभिमानाने पाहत होता…

आता 3 बॉल मध्ये 14 रन्स हवे होते…

सर्वजण चिंतेत…

पहिला बॉल…चौकार…

दुसरा बॉल… चौकार….

आता शेवटच्या बॉल ला सिक्स मारण्याशिवाय पर्याय नव्हता…

सर्वजण जीव मुठीत घेऊन बसलेले…

टीम च्या चेहऱ्यावर प्रचंड ताण…

समोरच्या टीम च्या बॉलर ला कॅप्टन ने सूचना दिली….

बॉलर पळत आली, बॉल चा पहिला टप्पा पडला…

पांडुरंग जोरात ओरडला…

“पिंटे………. शर्ट नाय निघाला…….साहेब वरडतुय….भिकारी म्हणला मला….”

पिंटी ने ऐकलं,

“माझ्या धन्याला बोलतोय व्हय रं… त्याची बायको हाये अजून जित्ती…. ती चवताळली….सर्व ताकद एकटवून बॅट हवेत भिरकावली…बॉल बॅट वर आदळल्याचा जोरात आवाज झाला…
बॉल दिसणार नाही इतका उंच हवेतून मैदानाबाहेर गेला…
कोच, टीम, गोलू आणि पांडुरंग ने एकच जल्लोष केला….सगळ्या मुलींनी पिंटी ला उचलून घेतलं…

सी के नायडू कप टीम ला मिळाला…

बक्षीस देणाऱ्याला पिंटी चे कौतुक वाटले,त्याला सगळी हकीकत कळली… त्याने कोच ला गाठले…आणि विचारले की तुम्ही हा हिरा कसा ओळखला??
कोच ने सांगितलं…

“पिंटी चं मी सुरवातीपासून बघत होतो….

गोलू ला चुलीपासून बाजूला करतांना लागणारी सतर्कता विकेट किपिंग ला कामात आली…

तिचा धुपाटणं आपटण्याचा जोर चौकार षटकार लावतांना उपयोगात आला…

पांडुरंग साठी पूर्ण मैदानात पळताना तिची चपळाई दिसून आली…

गोलू ला सांभाळता सांभाळता तिच्यात खूप विवेकबुद्धी आली होती….

मी शिकवत असताना गोलू आणि ती बारीक निरीक्षण करत, मी मुद्दाम तिला समजेल अशा मोठ्या आवाजात शिकवायचो…खरं तर मला तेव्हाच तिला टीम मध्ये घेता आलं असत पण माझं मन चलबिचल व्हायचं…तिला सांगायची हिम्मत होत नव्हती पण आज परिस्थिती अशी आली की तिला घेणं भाग होतं… आणि माझा अंदाज खरा ठरला…

सर, एक मातृत्व एका स्त्रीला परिपूर्ण बनवतं… केवळ स्त्री पणाचं नाही तर सर्व अंगाने ती परिपूर्ण बनते…

तिला क्रिकेट मध्ये तिचं मूल आणि संसार दिसला आणि ती मुलासाठी आणि संसारासाठी जीव ओतून लढली…

ती सतर्क होते, तिची निरीक्षण शक्ती वाढते, तिच्या अंगात एक दैवी बळ येतं… मग अशी स्त्री जगातल्या कुठल्याही क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवू शकते….”

पिंटी हातात ट्रॉफी घेऊन कोच कडे आली…

साहेब, मी पोराला हनुमानाची गोष्ट शिकवायची…हनुमान आपली शक्ती विसरायचा पण जंबुवन त्याला त्याची आठवण करून घ्यायचा…साहेब, तो जांबूवन आज आम्ही आमच्या डोळ्यादेखत पाहिला….

“चल मग आता पुढच्या तयारीला लागू…”

“कसली तयारी?”

“पुढच्या महिन्यात स्टेट लेव्हल मॅचेस आहेत…”

पिंटी बघतच राहिली…तोच तिच्या पाठीवर एक हात आला..

“पिंटे, तू लढ… त्यो पांडुरंग आणि ह्यो पांडुरंग…दोघबी हाय तुझ्या पाठीशी..”

_______________________

कथा कशी वाटली जरूर कळवा, असेच प्रेरणादायी कथांसाठी लाईक करा खालील पेज..

https://m.facebook.com/irablogs

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत