मातृत्वाची आस… भाग – 2

Written by

कथा पूर्णपणे समजण्यासाठी मातृत्वाची आस भाग 1 वर क्लिक करा व नक्की वाचा…….

प्रिया आता बावीस वर्षाची झाली होती. तिच्या आई बाबांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तिनी आई बाबांना सांगितले की जो…

Geplaatst door ईरा op Vrijdag 19 juli 2019

 

 

@अर्चना अनंत धवड

प्रिया च्या आई वडिलांना परत काळजी वाटणे सुरू झाले. परत तिच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू झाले.  नाही हो करता प्रिया पण लग्नाला तयार झाली पण यावेळी तिने सांगितले की लग्न करीन तर सर्व खरी माहिती देऊन….

तिने मॅरेज मॅट्रोमनी वर नाव नोंदविले…

आता प्रिया एकतर घटस्फोटित अणि त्यातल्यात्यात बाळाला जन्म देऊ शकत नसणारी त्यामुळे विदुर, घटस्फोटित अणि वयस्क माणसाची स्थळ येऊ लागली. काही काही स्थळं तर अगदी तिच्या बाबाच्या वयाच्या मुलांची असायची .  सुरवातीला वाईट वाटायचे नंतर ती गम्मत म्हणुन बघायची.  असेच एक स्थळ दिसले. विश्वास, वय अठ्ठावीस, मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, गलेलठ्ठ पगार, स्वताःचा बंगला, सहा महिन्याचे बाळ, चार महिन्यापुर्वी लग्नासाठी रजिस्ट्रेशन केलेले. प्रिया मनात म्हणाली, काय माणसं असतात ना. दोन महिने बायकोला जाऊन झाले नाही अणि लग्नाला तयार.   मुलगा बरा वाटतो .दिसायला पण एकदम रूबाबदार आहे. बघू या काय म्हणतो. तिने त्याला  पॉझिटिव्ह रीप्लाय केला.

दुसर्‍या दिवशी विश्वास चा फोन आला. त्यानी आपली सगळी माहिती दिली अणि तिची पण घेतली.

तिला त्याच्या घराचा पत्ता दिला अणि 4 वाजता एकटे भेटायला बोलावले.  तिने आईला सगळ सांगितले अणि भेटायला गेली.

चार वाजता प्रिया नी डोअर बेल वाजवली. विश्वास नी दार उघडले.  तो काही वेळ प्रिया कडे पाहाताच राहिला.  तिची ती नेव्ही ब्लू साडी, स्लीवलेस ब्लाऊज, लांब वेणी अणि हलकासा मेकअप. मनात म्हणाला, देवानी काय सौंदर्य दिल या मुलीला! पण एक कमी ठेवून तीच सौंदर्य शापित केले .

विश्वास पण एकदम दिसायला  रूबाबदार तरुण होता.

ये प्रिया… बस….

विश्वास नी केअरटेकर ला आवाज दिला..

ही रेखा, माझ्या बाळाला सांभाळते अणि घराकडे पण लक्ष देते…..

रेखा, बाळ झोपले ना. मॅडम साठी चहा पाण्याच बघ.

रेखा निघून गेली….

प्रिया मी पूर्ण हॉल मध्ये नजर फिरवली. हॉल मध्ये एका फोटो वर तिची नजर खिळली.  जवळपास तिच्याच वयाच्या सुंदर युवतीचा फोटो. फोटो ला हार असल्यामुळे तिला कळले की ही याची बायको असावी.

विश्वास म्हणाली, ही माझी बायको कविता फोटो कडे बोट दाखवून म्हणाला .  तुला आश्चर्य वाटले असेल ना हा माणूस चार महिन्यात लग्न करतोय.

नाही… मुळीच नाही आपल्या पुरुषप्रधान समाजात ही गोष्ट सामान्य आहे.  एखाद्या स्त्री ने जर अस केल असत तर आश्चर्य वाटले असते…

विश्वास ला तिच्या बोलण्यातली खोच समजली….

तो म्हणाला, चल तुला घर दाखवतो.  तो तिला बाळाच्या रूम मध्ये घेऊन गेला बाळ पाळण्यात झोपले होते.  शेजारी केअरटेकर उभी होती. तिनी   पूर्ण खोलीवर नजर टाकली.  सगळी खोली खेळण्यांनी भरली होती . विश्वास म्हणाला, ही सगळी खेळणी कविता नी घेतली होती. तिला कविता बद्दल खूप वाईट वाटले . खरच किती स्वप्न पहिली असेल तिनी बाळाची.  प्रियाच्या डोळ्यातुन अश्रू आले.

तो म्हणाला चल दुसरी रूम बघु या.  ती वळणार इतक्यात बाळ जोराने रडू लागले.  तो म्हणाला चल घर बघू या. पण तीच लक्षच नव्हते. तिनी रडणार्‍या बाळाला घेतले.  अरे पिल्लू… काय झाल पिल्लू ला.. अल अलललल…… अस बाळाच्या भाषेत बोलू लागली.  बाळ शांत झाले.  दोन्ही हाताच्या मुठी तिच्या गालावर मारून मम मम मम मम करू लागल .  अणि विश्वास ते माय लेकाच दृश्य डोळ्यात साठवून घेऊ लागला. तिनी बाळाला थोपटले. बाळ झोपले तिनी बाळाला पळण्यात टाकले.  विश्वास म्हणाला, चल घर बघू या.

नाही विश्वास, मला नाही  बघायचे घर. विश्वास तु जर तयार असेल तर मी या लग्नाला तयार आहे.

प्रिया, होशील ना माझ्या बाळाची आई?

विश्वास मी तुझ्या बाळाची आई व्हायला तयार आहे. भरलेल्या गळ्याने प्रिया म्हणाली.

हो प्रिया, तूच माझ्या बाळाची आई होऊ शकते….

प्रिया तुला आश्चर्य वाटले असेल ना हा माणूस चार महिन्यात लग्न करतोय? इतक्या लवकर बायकोला विसरला?

का करतोय मी लग्न जाणून घ्यायचे आहे?

हो मला आवडेल जाणून घ्यायला. मला वाटते वर्तमान काळ जर सुखी जावा अस वाटत असेल तर आपल्याला एकमेकांच्या भूतकाळाची माहिती असावी….

ठीक आहे. ऐक तर मग

कविता अणि मी अगदी बालपणीचे मित्र.. तिचे बाबा अणि माझे बाबा मित्र.  ती माझ्यापेक्षा दोन वर्ष लहान. सोबत खेळतच आम्ही मोठे झालो . बारावीनंतर मी बाहेर शिक्षणाला गेलो.  ती मला मात्र रोज फोन करायची.  बारावीत चांगला अभ्यास करून माझ्याच कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन मिळविली अणि त्या दोन वर्षात आमचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले . आमचे दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते .

घरून विरोध असण्याचे काही कारणच नव्हते.  आमच लग्न झाले . तिला लहान मुले खूप आवडायची म्हणुन आम्ही प्लॅनिंग वगैरे काही केले नाही अणि लगेच लग्नानंतर गरोदर राहिली.

किती प्लॅनिंग केले होते तिनी बळाच्या भविष्याची.  बाळ आल की अस करु, बाळ आल की तस करू.  सतत तिच्या बोलण्यात बाळ अणि बाळ. पूर्ण बाळाची रूम खेळण्यानी सजवून ठेवली होती.  मी म्हणायचो, अग कविता किती स्वप्नं पाहशील बाळाला येऊ तर दे.

तिला बाळंतपणासाठी अ‍ॅडमिट केले . बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाली . मुलगा झाला पण तिची तब्येत खालावली.  खूप ब्लीडिंग झाले. डॉक्टर नी शर्थीचे प्रयत्न केले पण ऊपयोग झाला आहे .डॉक्टर नी मला सांगितले की तिला भेटून घे कदाचित शेवटचे.

ती बेड वर अशक्त पडली होती. हाता पायाला नळ्या लागल्या होत्या. पाळण्यात माझ बाळ झोपले होते .  मी आतमधे गेलो. तिने केविलवाणे माझ्याकडे बघितले अणि नंतर बाळाकडे…

माझ्याकडे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.  ती म्हणाली, विश्वास आपल्या बाळाला संभाळशील ना रे .  माझ्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते.  तोंडातून शब्द येत नव्हते. आवंढा गिळून मी म्हंटले, अग कविता तुला काहीच झाल नाही.  चार दिवसांनी तुला सुट्टी होईल आपण दोघ सांभाळू बाळाला.

ती कसनुसं हसली. विश्वास तुला खोट बोलता नाही येत.  अरे तुझा चेहराच सांगतोय तू खोट बोलतो ते.  अरे मला माहिती आहे आता मी नाही जगू शकत.  तेव्हा तू मला वचन दे की तू दुसरे लग्न करशील.

कविता, काय बोलतेस तू. अग आपला वीस वर्षाचा सहवास मी कसा विसरू शकतो.

तू मला विसरूच शकत नाही. मी आपलं प्रेमाचे प्रतीक तुला देऊन जात आहे .हे आपल बाळ, बघ बिलकुल माझ्यावर गेलाय. बाळाला बघितले की तुला माझी आठवण येईलच….

अग, मी आपल बाळ अणि तुझी आठवण यावर पूर्ण आयुष्य जगू शकतो.

हो,मला माहिती आहे तू जगू शकतो पण तरी तुला लग्न करावेच लागेल. तुझ्या साठी नाही माझ्या बाळासाठी.

विश्वास तुला तुझ्यासाठी बायको नाही तर आपल्या बाळासाठी आई शोधायची आहे.  शोधशील ना रे आई.  मला वचन दे विश्वास.  मला वचन दे… तिने विश्वास चा हात घट्ट दाबला….

हो नक्की शोधील . मी आपल्या बाळासाठी आई नक्की शोधेल .  तिच्या हाताची पकड सैल पडली होती . कविता दोन दिवसाचे बाळ माझ्या झोळीत टाकून निघून गेली.  विश्वास नी डोळे पुसले.  प्रिया आणखी काही विचारायच आहे.

प्रिया नी नकारार्थी मान हलवली.

प्रिया चार महिन्यापासून मी बाळासाठी आई शोधत होतो… एक वर्षांपूर्वी जेव्हा मला लग्न करायचे होते तेव्हा मुलीच्या रांगा लागल्या होत्या. पण जेव्हा मला बाळाची आई हवी होती तेव्हा कुणीच तयार झाल नाही . काही मुली तयार होत्या पण त्याच म्हणण होत.. 24 तास केअरटेकर ठेऊ या . केअरटेकर तर आता ही आहे मग मला लग्नाची गरजच काय?

मी विधवा, घटस्फोटित, अगदी माझ्यापेक्षा वयानी मोठया मुली पण पसंद केल्या.. मी त्यांना त्यांच्या मुलांसोबत सुद्धा स्विकारला तयार होतो . मी त्यांना जेव्हा भेटायचो तेव्हा  बोलताना त्याच लक्ष त्याच्या स्वताच्या मुला मध्ये असायचे. त्यांच्यातली आई माझ्या बाळाची आई नाही होऊ शकत याची मला जाणीव व्हायची.

एक दोन मुली पसंद आल्या.. त्यांना घर दाखवायचे म्हणुन बाळाच्या खोलीत घेऊन गेलो… रेखा ला आधीच सांगितले होते की मी आत मध्ये आलो की बाळाची दुधाची बॉटल ओढायची म्हणजे बाळ रडत… परंतु त्या मुलींनी रडणार्‍या बाळाकडे ढुंकूनही पाहिले नाही  आधी सगळे घर बघितले. मला हवी असलेली बाळाची आई कुणातच दिसली नाही.

प्रिया मला तुझ्यात माझ्या बाळाची आई दिसली.

होशील ना माझ्या बाळाची आई.

प्रिया नी होकार दिला. अणि प्रिया बाळाची आई झाली.

प्रिया मनात म्हणाली, किती छान ना..  कविता च्या बाळाला आई मिळाली, मला माझ बाळ अणि विश्‍वास ला त्याच्या बाळाच्या आईच्या रुपात पत्नी.

बाळा, तू माझ्या शापित स्त्रीत्वाचा उःशाप आहे. आज  तुझ्यामुळेच माझ स्त्रीत्व पूर्ण झाल…..

कृष्णा तिला आवाज देत होता. आई, तुझ लक्ष कुठे आहे ग? बाबा अणि मी कधीचेच आलेलो. तिनी कृष्णाला जवळ घेतले अणि त्याचे पटापट मुके घेऊ लागली. मनात म्हणाली……..

“बाळा होऊ कशी उतराई

तुझ्यामुळे मी झाले आई.”

विश्‍वास माय लेकाचे प्रेम पाहून तृप्त झाला अणि फोटो तून कविता सूद्धा.

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

शेअर करायचे असल्यास नावासकट करायला हरकत नाही

धन्यवाद

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत