मामाच्या गावाला जाऊया… नात्यांना नवजीवन देऊया..

Written by


साक्षीला सुट्टी लागली आणि तिचा आईजवळ सतत तगादा सुरू झाला, “आई, सुट्टी सुरू झाली की माझे सगळे मित्र मैत्रिणी मामाच्या गावाला जातात..मस्त मज्जा करतात..आल्यावर गमतीजमती सांगतात..मला सांगायला काहीच नसते.. आपण पण जाऊया ना..मी अजून मामाचं गावं नाही बघितलं…तू दरवर्षी हेच सांगते की यावेळी नको.. नंतर कधीतरी जाऊ.. यावेळी आपण मामाकडे जायचं म्हणजे जायचं..”
आईला म्हणजेच सविताला साक्षीच्या बोलण्याने खूप वाईट वाटले. साक्षी बोलून मोकळी झाली, खेळण्यात रमली पण तिच्या बोलण्याने सविता भूतकाळात गेली.
सविता दोन भावांना एकुलती एक बहिण, तिन्ही भावंडांमध्ये सगळ्यात लहान. वडील लहानपणीच गेले, आई आणि दोन्ही भाऊ वहिनी एकत्र गावी राहायचे, घरी छान संत्र्याचा बगिचा, शेती, गावात मस्त टुमदार घर. सविताचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले आणि ती पुण्याला आली. सविताचे सासर अगदी सुखी कुटुंब, आर्थिक परिस्थिती चांगली शिवाय शैलेश म्हणजेच सविताचा नवरा चांगल्या नोकरीवर. सविताला कशाचीही कमी नव्हती. तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनी भावाचा फोन आला, आईची तब्येत ठीक नाहीये, तू भेटायला ये. सविता आणि शैलेश भेटायला गेले. आईला स्वतःच्या नावावर असलेली घरची मालमत्ता आता तिघा बहीण भावांमध्ये वाटून मोकळं व्हावं असं वाटत होतं. तिने तसं बोलूनही दाखवले, झालं त्या संपत्तीच्या वादातून गैरसमज निर्माण झाले, सविता सधन कुटुंबात आहे, तिला वाटा देण्याची गरज नाही असं दोन्ही वहिनीचे मत, सविताला‌ सुद्धा काही नको होते पण वहिनींच्या अशा बोलण्याने ती दुखावल्या गेली. वहिणींची इच्छा नसताना, सविता शैलेश ला काहीही नको असताना आईने काही मालमत्ता सविताच्या नावावर केली, शेवटी आईचं मन ते, मुलींसाठी जीव तुटतोच ना. त्या क्षणी सुरुवात झाली नात्यात फूट पडायला. आईचं आजारपणामुळे निधन झालं, सगळ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि मालमत्तेच्या वाटणीवरून भावंडांमध्ये गैरसमज निर्माण झाले. सविताचे माहेर संपल्या सारखेच झाले.
सविताचे माहेरी येणे जाणे बंद झाले. भावांना पोस्टाने राखी पाठवायची, कधी तरी फोन वर चौकशी करायची पण मागच्या आठ वर्षांत समोरासमोर भेटीगाठी नव्हत्याच. सविताचे बाळंतपण ही सासरीच झाले, माहेरहून कुणी भेटायला सुद्धा नाही आले. सविताला वाटायचे, भावांनी पुढाकार घ्यावा, मी काही मागितले तर नव्हते, आईच्या इच्छेखातर मला‌ संपत्तीचा वाटा मिळाला तोही नको पण नातं जुळायला पाहिजे. माझी आठवण सुद्धा येत नाही दादा वहिनींना, मुलगी झाली तर साधं भेटायला सुद्धा नाही आले. आता साक्षी सात वर्षांची झाली, भाचीला‌ बघावं नसेल का‌‌ वाटत. इकडे भाऊ वहिनींना वाटायचे सविता मोठ्या घरात गेली, गावात यायला आवडत नसेल, आमची गरज वाटत नसेल म्हणून गावी येत नाही.
किती दिवस, किती वर्ष असंच चालणार..कुणीच पुढाकार घेत‌ नाही.. आपलं ठिक आहे पण मुलांसाठी आता नातं नव्याने जुळायला पाहिजे.
मन पक्कं करून सविताने दादाला फोन केला, सगळ्यांची चौकशी केली आणि अवघडल्या सारख्या मनस्थितीत म्हणाली, “साक्षी ला घेऊन सुट्टीत गावी यायच म्हणतेय..तिला मामाचे गाव बघायचं आहे..”
दादाला ते ऐकताच इतका आनंद झाला, काय बोलावे सुचेना.. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रु आले..
दादा‌ म्हणाला, “सविता, अगं गेली आठ वर्षे आम्ही तुझी वाट बघतोय..खूपदा वाटायचे तुला भेटायला यावं, गावी बोलवावं ‌पण असं वाटायचं की तू आता बदलली, सासरी रमली, आमची आठवण येत नसेल तुला.. गावी यायला आवडत नसेल..पण सगळा आमचा गैरसमज होता गं, आमची चिऊताई अजूनही तशीच आहे.. नक्की ये.. आम्ही आमच्या भाचीला भेटायला आतुर आहोत.. कधी निघते सांग..”
सविता म्हणाली, ” रात्री शैलेश आले की कळवते येण्याची तारीख..”
सविता येणार कळताच तिकडे सगळेच उत्साहात.. नुसत्या गैरसमजातून इतके वर्ष नात्यात फूट पडली होती..मीपणा मुळे  कुणी पुढाकार घ्यायला तयार नव्हते..आज साक्षी मुळे सविताने पुढाकार घेतला आणि नात्याला एक नवजीवन मिळाल्यासारखे वाटले. शैलेश ला सविताने याविषयी सांगताच त्याला खूप आनंद झाला, तो कित्येकदा म्हणायचा की तू स्वतः पुढाकार घे पण दादा‌ वहिनींच्या मनात राग असेल, ते नीट वागले नाही तर माझा अपमान होईल अशा गैरसमजामुळे सविता इतके वर्ष टाळत आली.
लगेच येणाऱ्या शनिवारी मी तुम्हाला दोघींना गावी पोहचवून देतो असं शैलेश ने सांगितले. सविताने दादाला तसं कळवले. इकडे साक्षीचा उत्साह , आनंद गगनात मावेनासा झाला होता. मामाचं गावं कसं असेल.. या उत्सुकतेने ती दिवस  मोजत होती…कधी जाते कधी नाही अशी तिची अवस्था झाली.‌ सविताचीही अवस्था वेगळी नव्हती.. इतक्या वर्षांनी माहेरी जायचं ‌म्हणून ती आनंदात होती, तिच्या चेहऱ्यावर एक तेज शैलेश ला जाणवत होतं.
बघता‌ बघता शनिवार आला, तिघेही साक्षीच्या मामाच्या गावाला पोहोचले. तिकडे भाची येणार म्हणून सगळ्यांची जोरदार तयारी सुरू होती. माहेरी पोहोचताच वहिनीला मिठी मारत सविता इतके वर्ष मनात ठेवलेलं सगळं दु:ख बाहेर काढत ढसाढसा रडली. दोन्ही वहिनींना त्यावेळी बोलण्याने सविता किती दुखावल्या गेली हे कळून चुकले होते. त्या म्हणाल्या,” सविताताई, आई नसल्या म्हणून माहेर संपलं असं मुळीच समजू नका, आमच्या मुळे तुम्ही दुखावलात पण इतक्या रूसल्या की माहेरी येणेच बंद केले..आता यापुढे असं वागायचं नाही..तुमचा हक्क आहे माहेरी..”
वहिनींच्या बोलण्याने सविताला एक आधार वाटला.. नुसते गैरसमज..मीपणा यामुळे आपण नात्यात दुरावलो होतो हे घरात प्रत्येकाला कळून चुकले होते.
साक्षी गावी पोहोचताच सगळ्या घरात पळत सुटली, मामाची मुलं मुली, साक्षी पहिल्यांदा भेटत असले तरी त्यांची ओळख होऊन त्यांना एक व्हायला क्षणाचाही विलंब लागला नाही. सगळे भावंडे मिळून लगेच मस्ती सूरू, गावी अंगण असलेल्या घरात, अंगणातल्या झाडाखाली सावलीत साक्षीला जी मज्जा येत होती ती तिने यापूर्वी कुठेही अनुभवली नव्हती. अंगणात एक गोंडस कुत्रा, एक मोठे आंब्याचे झाड, त्याला लटकणारे आंबे , कैरी, अनेक फुलझाडे, ती मोकळी हवा साक्षीला एक वेगळाच उत्साह देत होता, प्रत्येक गोष्टीचे तिला खूप कुतूहल वाटत होते, भावंडे तिला नविन नविन गोष्टी दाखवत सगळीकडे फिरवत होते आणि साक्षी सुद्धा तितक्याच उत्साहाने सगळं एॅंजाॅय करत होती.
शैलेश दुसऱ्या दिवशी परत गेला. सविता माहेरपण आणि साक्षी मामाच्या गावाची मज्जा अनुभवत होत्या. साक्षीसाठी सगळ्या गोष्टी नवीन होत्या, भावंडांबरोबर खेळताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता तो बघून सविताला मनोमन समाधान वाटत होते. मामासोबत सगळी बच्चा कंपनी संत्र्याच्या बगिच्यात, शेतात, मंदिरात मनसोक्त फिरायची, घरी मामीच्या हातची छान छान मेजवानी, रात्री अंगणात झोपून तारे , चंद्राची लपाछपी‌ बघायची, मामी मस्त गोष्टी सांगणार, सगळे इतका लाड करायचे की साक्षीला सविता जवळ जरा वेळ सुद्धा फुरसत नव्हती.साक्षीचा आनंद बघून सविता‌ मनोमन सुखावली. इकडे ननंदबाई आल्या म्हणून काय करू नी काय नको असं वहिनींचं झालेलं, सोबत द्यायला वेगवेगळे पापड , कुरोडी, लोणची अशी तयारी सुरू होती.
सविता आणि वहिनी मनसोक्त गप्पा मारायच्या, सासर कितीही चांगलं असेल पण माहेर हे माहेर असते हे तिला क्षणोक्षणी जाणवत होते. दादा सुद्धा शेतातून बोरं, चिंचा, कैरी  आणायचे.
मजेत दोन आठवडे घालवल्यानंतर शैलेश दोघींना घ्यायला आला तेव्हा साक्षी अजूनही परत जायला तयार नव्हती. भावंडांमध्ये ती रमून गेली होती. परत जाताना माहेरहून मोठमोठ्या बॅग वहिनींनी भरून दिल्या, सगळं बघून सविताला वहिनींच्या रुपात आई दिसली. परत जाताना साक्षी म्हणाली, “आई आता प्रत्येक सुट्टीला आपण मामाकडे येऊया..मला खूप मजा आली..??”

हल्ली बर्‍याच कुटुंबात अशी परिस्थिती आहे, शहरीकरण, माणसाच्या स्वभावातला मीपणा, अहंकार, संपत्तीवरून गैरसमज, वाद अशा कारणांमुळे नात्यात फूट पडली आहे. या सगळ्याचा परिणाम मात्र बालमनावर होत आहे, मोठ्यांच्या मतभेदांमुळे लहान मुलांना मामाच्या गावाची मज्जा अनुभवता येत नाही, भावंडांशी ओळख नाही, नात्यात फूट पडते आहे. पण स्वतः पुढाकार घेतला तर कुणीच लहान होत नाही, सविताच्या पुढाकाराने जसे गैरसमज दूर होऊन साक्षीला मामाच्या गावाची मज्जा अनुभवता आली, भावंडांबरोबर मज्जा मस्ती करता आली  तशी तुमच्याही मुलांना नक्कीच अनुभवता येईल ??

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा