मालवणी गाळी(शिव्या)

Written by

आमच्या कोकणात कोणाचं सरळ नाव घेणं हे कमीपणाचं समजतात.म्हणजे बघा महेशचं मयग्या,सचिनचं सचल्या,साक्षात पांडुरंगाचं नावही याला अपवाद नाही बरं पांडगो,पांडग्या करतात.आमच्या तात्यांचं पांडगो इलो रे बा इलो रे हे भुताचं नाटक फेमस होतं.रामचं रामग्या,विष्णू चं इष्ण्या.

मुलींचीही तशीच हो.लताचं लतली,काशीचं कासली,प्रणोतीचं पणवती,सुमतीचं सुमल्या,वासंतीचं वासल्या..अशी सगळ्याचं नावांची पडझड ठरलेली.

बरं नाव घेण्यापूर्वी अस्सल मालवणी हा एखादा प्रेमळ गाळीअलंकार हा त्यापुढे लावतोच.या गाळींतही विविधता असते.

अगदी समोरुन जाणाऱ्या माणसालाही एखादी गाळ घालून चहा प्यायचं आगत्याचं आमंत्रण देतो तो खरा मालवणी.गाळी ह्या दोन अक्षरी,तीन,चार ,पाच अगदी अष्टाक्षरीसुद्धा असतात.

साध्या गाळी,मध्यम पातळीच्या,त्याहून वरच्या पातळीच्या अशी गाळींची पातळी माणसानुरुप ठरलेली असते.एखाद्याबद्दल वात्सल्य दाखवायचे असेल तरकाय मेल्या/मेले असे संबोधले जाते.

आवशीक खाव व्हरान हे आश्चर्योद्गार आहेत.
आवशीक खाव व्हरान मेल्या नयी गाडी घितलस!अशी वाक्यरचना करतात.

कोण जास्तच शायनिंग मारत असेल तर ‘बघ कसो मरताहा’ किंवा काय मेलो आकाडताहा कासारासारखो असे म्हणतात.

एखाद्याचा खूप राग आला तर’भंगो मेल्याचा मुसका ता’ असे म्हणण्याची प्रथा आहे.

मुलं खूप मस्ती करत असली,ऐकत नसली तर फटकीचो वाको इलो तुमच्यार तो असं मोठी माणसं आवर्जून म्हणतात.पटकी म्हणजे तीव्र जुलाबाची साथ.पण असा शब्दशः अर्थ कोकणी माणूस घेत नाही.

कोणाला गप्प बसायला सांगायचं असेल तर ताँड मिट म्हणतात.

कोणाला निघूंन जा म्हणून सांगायचं असेल तर ताँड घिऊन चलत रव्ह,भायरो हो असं म्हणतात.

हाक मारण्यासाठी प्रेमाने माय#या,रां#च्या असे म्हणतात.

शिरा पडांदे हाही एक वाक्प्रचार आहे.
उदा.शिरा पडली त्या पावसार ती डोळे ढापून वतताहा.
शिरा पडली तुझ्या तोंडार ती तुका बाजारात जाऊक सांगललय ता हयच फुगडे घालीत रव्हलहस.

तळपाट होऊंदे,नायनाट होऊंदे,भंगान जाऊदे,भंगो रे तेचा ताँड व्हरान,संपुष्टान होवदे,शाप वाटोळा होवंदे म्हणजे नष्ट होऊंदे.
उदा.माझ्या काजींवयले काजी चोरून नेणाऱ्याचा शाप वाटोळा होऊंदे.
काही मुले काम न करता उंडगत रहातात त्यांना काय मेल्या गुकाडीच्या ढोरासारखो उंडागतहस असं म्हणतात.

काही मुलं घरातच बसून रहातात त्यांना चुलकोंबो म्हणतात.

एखाद्याचा राग आला की त्याला बायेचो घो तुझ्या,आवशीचो धगड/घो तुझ्या असं म्हणतात.

तसंच बुळकान लागुदे म्हणजे हगवण लागुदे.
उदा.माझो आरवतो कोंबो जेनाकोनी खाल्यान तेका बुळकान लागतली.

तर जाग्यार बसांदे म्हणजे त्या व्यक्तीचा गोळा होऊदे.
उदा.आमच्या वयचे ठोंबे कोन कुपळून घेऊन गेलो त्याचो शाप गोळो होतलो.
उजवाडाचे अगुदर जासनीची फुला नेणाऱ्याचो गोळो होतलो.या काही सुवाच्य शिव्या.

बऱ्याच अर्वाच्य शिव्या या मात्र आई व बहिणीवरुन सूरु होतात.उदा.बायेक###,….. हे म्हणजे भांडण कोणाचं व मार कोणाला असं व या शिव्यांचं वैषम्य वाटतं.पण तरी ते मालवणी माणसाला वाटत नाही.

एक आमची काकी आहे.ती गणपतीच्या वेळी बाहेरची झाली.ती पडवीत बसलेली.काका शेतावरून येत होते.गावी ज्या बाईला अडचण असेल तिच्या नवऱ्यालाही पाच दिवस गणपतीचे दर्शन घेता येत नाही.

तर काकांनी काकी पडवीत खांबाला टेकून बसलेली पाहून तिला अडचण आलेय हे ओळखले व रां#च्या ही शिवी दिली.

काका त्यांना गणपतीचं दर्शन काकीमुळे करायला मिळणार नाही म्हणून नाराज झाले होते.

आमची काकी हजरजवाबी ती पटकन उत्तरली,”माका रां#च्या म्हणतास ते तुमी वर कवा गेलास ता सांगा.”

काका गुपचूप घरात गेले व पिटी ढवळू लागले.

——गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा