माहेरचे आंबे

Written by

माहेरचे आंबे

 

HR ला मे महिन्याच्या सुट्टीचा अर्ज करायचा आहे, काम सुरू असताना तिला आठवले, ईथे लवकर अर्ज केला की आपण मोकळे कारण आपल्या आधी जर कोणी सुट्टया टाकल्या तर आपल्या सुट्टया अडचणीत येतात. असो…

एकदाच काम संपवून ती घरी निघाली….
घरी आल्यावर तीने सुट्टीच्या अर्जाबद्दल सांगितले… सुट्टी पास झाली आहे तयारीला लागा… चिऊ आपण फिरायला जायचे हा… तिने तिच्या मुलीला उत्साहाने सांगितले… आणि ती किचनमध्ये शिरली…

आई आज काय भाजी बनवू?? (तिने सासूला सहज विचारले)

तुला कोणती हवी ती बनव.. (सासूबाई म्हणाल्या)

परत तेच उत्तर … (फ्रीजमध्ये डोकावत तीने विचारले )
गवार चालेल, शेंगदाण्याचे कुट घालुन???

सासूबाई : नको…

सासरे : हो पण कुट नको, दही घालून कर. .

सासूबाई : नको ती आंबट आंबट लागते…..

ती : बर भेंडी बनवू ???

सासरे : चालेल .. मसाला भेंडी… हव तर मी बनवतो.. आजच युट्यूब वर पाहिली रेसिपी..

ती : (म्हणजे 1 तास किचनमध्ये पाय नको ठेवायला ती मनातल्या मनात विचार करत) नको नको मी बनवते…..
सासूबाई : त्यापेक्षा वांगी बनव, सगळ्यांना आवडते….

ती : ठिक आहे. .
तीने स्वयंपाकाला सुरूवात केली. इतक्यात तिचे “अहो” पण आले. येताना आंबे घेऊन आले.

घरात एकूण आठ माणसं होती. मोठे सात आणि एक छोटी चिऊ…. सासू, सासरे, नणंद, दीर आणि धाकटी जाव …..घरी एक नियम होता रात्रीच्या जेवणात पोळ्या गरमागरम असाव्यात……जेवायला सगळे एकत्र बसायचे…..
जावेने ताट मांडायला घेतली, नणंदबाईंनी आंबे कापायला घेतले … सर्वांनीच आंब्यावर ताव मारला.. सासूबाईंनी एक आंब्याचा रस काढून स्वतःसाठी ठेवला… ती मात्र किचनमध्ये पोळ्या करण्यात व्यस्त होती….सगळ्यांसाठी पोळ्या करून तिही जेवायला बसली…. जेवताना मधेच आंबा आठवला पण बघितल तर सगळे आंबे संपले…. ती काही न बोलता मुकाट्याने जेवली…

हे नेहमीचं ठरलेल… ती किचनमध्ये आहे हे कोणाच्या लक्षातच यायच नाही….. आल की आपल संपवायच, हे कधी भजीच्या बाबतीत तर कधी गुलाबजामच्या बाबतीत होतच असायच. .. तिलाही या आठ वर्षाच्या संसारात यासगळ्याची सवय झाली होती….

असच काही दिवसांनी सुट्टी लागली, सहकुटुंब गाडी काढुन फिरायला निघाले… गाडी चिपळूणला कुलस्वामिनीच्या दर्शनाला निघाली… यावेळेस गावी मुक्काम न करता चिपळूणवरुन गुहागर मग गणपतीपुळे, तिथून पुढे मिनी कोकण दर्शन अस वेगवेगळे ठिकाणी फिरून गाडी थांबली ती थेट तिच्या आजोळी…. लग्नानंतर कित्येक वर्षाने ती आली होती… तिच्या अहोंकडू सरप्राइज होत हे खास तिच्यासाठी… तिही आजी आजोबांना भेटून सुखावली…. आजीने घरच्या आंब्याची पेटी दिली म्हणाली पोरी ही आमच्याकडून भेट घेऊन जा….. सुट्ट्या पण किती लवकर संपल्या बघा ना…., आजोळी राहण्याची हाव लागली आणि फक्त भेटूनच निघाव लागल…

परत घरी आल्यावर घरची आवराआवर सुरू झाली कारण लगेच दुसऱ्या दिवशी अॉफीसची ड्युटी सुरू म्हणून ती आजच सगळी घरची कामं संपवत होती…
आजोळी भेटून आल्यापासून ती खूपच खूश होती…..

दुसर्‍या दिवशी अॉफीसमध्ये तिला आंब्याची आठवण झाली, अरे!!!! काल गडबडीत आपण आंबे पाहीलेच नाही .. सिझनचा एकही आंबा असा खाल्यासारखा वाटला नाही….

कामावरून घरी आल्यावर बघते, तर किचनवर खाल्लेल्या आंब्याच ताट ठेवल होत आणि त्यात एकच फोड शिल्लक होती… तिने चहा गरम करुन घेतला आणि ती खुर्चीवर बसली तेवढ्यात सासूबाई आल्या तिच्या पुढ्यात तेच आंब्याच ताट सरकवत म्हणाल्या, ” हि फोड तुझ्या लेकीने टाकली, तेवढीच उरलीये खाऊन टाक”. हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली पण काय बोलणार आणि कोणाला बोलणार…..

तिने फक्त नको म्हटले आणि ती किचनमध्ये शिरली…. मस्तपैकी आजीने दिलेल्या पेटीतले चार आंबे काढले आणि धुवून त्याचे काप केले….

चिऊ माझ्या आजोळचे आंबे खाणार का??? ये लवकर म्हणत तिने लेकीला हाक मारली…..

पहिली फोड तोंडात जाताच स्वर्ग गाठल्यासारख झाल… इथे सासूबाई म्हणाल्या अग लवकर स्वयंपाकाला लाग…

“यही हे, राईट चॉईस बेबी…. आहा!!!! (रेडिओवर आवाज ऐकू आला)

तिने आणि चिऊने एकमेकींकडे पाहील आणि त्या आंब्यांवर तुटून पडल्या…..

समाप्त…

सदर कथा घराघरात पाहायला मिळते, पण आंबे खाण्याची मजा काही औरच असते

 

(कथा आवडल्यास जरूर कळवा)

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा