माहेरवाशिणीची पाठवणी

Written by

माहेरवाशिणीची पाठवणी?…

©स्वप्ना मुळे,..(मायी)

सगळीकडे नुसता आनंद पसरलेला,… उत्साह, चैतन्य,..मरगळलेल्या घराला एक वेगळीच उभारी,..आणि माहेरवाशिणीच्या वाटेवर आतुरतेने वाट पाहणारे डोळे,..आजकाल मोबाईल असल्यामुळे अर्ध्या अर्ध्या तासाला जाणारे काळजीचे आणि कुतूहलाचे फोन,..”कुठपर्यंत आली,.. खाल्लं का काही,..प्रवास नीट होतोय ना,..”…हे सगळं चालू असलं तरी घरात जर जुन खोड असेल तर ते आवर्जून सांगणार,..दारात फुलपात्र पालथं ठेवा,..लवकर येईल लेकरू,…असं म्हणत दिसत नसलं तरी दूरवर रस्ता न्याहाळणारी आजी पण जागची हालत नाही,….स्वयंपाकघरात लेकीसाठी आवडीचे पदार्थ बनवणारी आणि भावजाय जिला अजून ह्या माणसांची सवय नसली तरी ह्यांची माहेरवाशिणीची आतुरता बघुन आपलं माहेर आठवून नकळत आपल्या कर्तव्याची जाणीव शिकणारी ती सुद्धा अशीच माहेरी आपणही जातो ते आठवून सुखावत असते,… आई मध्येचं दिवा लावून लेकीला सुखरूप घरी आण म्हणणारी आई,…एरवी रागवणारे, चिडणारे बाबा,….ओट्यावर अस्वस्थपणे येरझरा घालणारे दिसतात,..
दाराशी रिक्षा येऊन थांबते,..चिल्लर पार्टी आजोबा म्हणत गळ्यात पडते,..एवढ्या वेळ फरार असणारा भाऊ पटकन सामान उतरवतो,..आई दारात भाकरीचा तुकडा घेऊन उभी,..आणि नीट दिसत नसलं तरी धडपडत उभं राहून डोकून बघणारी आजी,…
सगळेजण आपली किती वाट बघत होते हे दारात पालथं घातलेल्या फुलपत्राने सांगितलंच तिला,..जिथं लहानच मोठं झालो त्या अंगणात असं पाहून बनून आल्याने तिचे डोळे पाणावतात,…सगळं घर आनंदून जातं,… अश्याच थोड्या फार अंतरान आणखी तिघी माहेरवाशिणी येतात,..छोटसच केविलवाण वाटणार घर माणसांच्या येण्यानं उजळून निघत आणि श्रीमंत भासतं,… नातवंड,पोरी ह्यांची खसखस पिकते,…आजी पदराने डोळे पुसत भरलं गोकुळ बघत असते,..आई आपले सगळे दुखणे बाजूला ठेवून मोठ्या हिमतीने सगळ्यांच आनंदाने करत असते,.
अंगणातल्या परिजातकालाही जरा जास्तच फुलं आल्याचे आईला जाणवते तो ही आनंदी झाला बहुतेक माझ्या लेकीबाळी आल्याने,..बहिणींचे गप्पांचे फड रंगतात,..आजोबांच्या बोटाला धरून नातवंड देवळाकडे वळतात येताना वाण्याच्या दुकानातून आलेली चिप्सची पाकिट खुदखुद करत हसत असतात,…भावजायीची बेडरूमही आता सार्वजनिक होते,..आडवे ,तिडवे,..पालथे,उलथे ज्याला जिथे जागा मिळेल तिथे सगळे झोपतात,..ac किंवा बंगल्यातली झोप आजच्या ह्या माणसांच्या उबेतली झोप अजून गाढ लागते,…चार दिवस भुरकन उडून जातात,….

घरभर पसरलेले एकत्र होऊन पडलेले कपडे,कंगवे,..इतर सामान ज्याच्या त्याच्या बॅग मध्ये जाऊन बसते,..पसरलेल्या बॅगा थोडायवेळात निघण्याची सूचना देत राहतात,..सोबत देण्याचे लाडू,करंजीचे पाकिट त्या बॅगांवर येऊन बसतात,..खिखी करणारा घर उदास व्हायला लागतं,.. दाराशी रिक्षा येते,..पाणावलेले डोळे प्रवासाला निघतात आणि अंगणातले टाटा करणारे उदास हात घरात वळतात एक गेली तरी अजून बाकीच्या आहेत म्हणून परत ओले डोळे दुःखासोबत सुख साजरं करायला शिकवतात,..एक एक करत सगळे निघतात,..आजी परत मौन घेऊन आपल्या नामस्मरणात दंग होते,..आईची दुखणी परत डोके वर काढतात,..भाऊ भावजयी परत आपल्या व्यापात गुंततात,..आणि आजोबा एकटेच मंदिराकडे वळतात आज बोटाशी नसलेले नातवंड त्यांना घंटा वाजवताना आठवतात आणि हात जोडून नकळत म्हणतात,…….” माहेरवाशिणीची पाठवण करायला मानसिक बळ देत जा रे देवा,…?”
©स्वप्ना मुळे(मायी)..औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा