माहेर आणि मामाचा गांव (कालचा आणि आजचा…) ©दिप्ती अजमीरे

Written by

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या… परीक्षा संपली आणि आपल्याला वेध लागलेत माहेरी जाण्याचे… अहो, आपले सोडा… मुलांना ही वेध लागले खरं तर, मामाच्या गावाला जाण्याचे…

मग, चलताय ना मामाच्या गावाला…

सकाळची कोवळी ऊन अंगावर येईस्तोवर झोपावे… अंगळाई घेत उठताना मग गरम गरम चहाचा कप हाती यावा…

नको तो पोरांचा पसारा आणि अभ्यास…  नको तो अहोंचा डब्बा नि नाश्ता…  नको ती येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी अन् मेजवानी…  नको ती सासुसऱ्यांचं दुखणं खुपणं… निवांत झुले घेत पहुळावे गावभर…

मैत्रिणींचा यावा मग गलका आणि गप्पांना उत यावा… हिंदळावे स्वप्नांच्या वाटेवर…

झुलताना मग हळुवार झुल्यावर उगाच यावी आठवण घरची… अहोंच्या रुसण्याची आणि पिलूच्या गोड मिठीची… सारं जग मावेल अशी ती गोड मिठी आणि त्याची kissi याहून मोठं कोणतं सुख असणार…

पण आता कुठे ते माहेर-सुख नशीबात… आता राहा इथे… ना माहेर ना- मामाचं गांव…

आमच्यावेळी कसं, शाळेला सुट्टी लागली की आमची रवानगी थेट मामांकडे…

छोट्या भावंडांसोबत मस्ती, मोठ्यांसोबत गावभर हिंडणे…

दूध, दही, लोणी, तूप मनसोक्त… ताज ताज खा… अहाहा!!! मस्तच…

तो बाजार… तिथला फरसाण, जिलेबी… विचारूच नका…

चिंच, बोरं, कैऱ्या जमा करायचे… आपल्या झोळीत भरायचे अन् घराकडे पळत सुटायचे… यात कधी कधी पकडल्या जाण्याची भीती, म्हणून लवकरात लवकर, जास्तीत जास्त जिन्नस जमा करायचा…

आबांसोबत शेतात जायचं… वाडीत जायचं.. तिथला ताजी भाजी काय अन् संत्री काय, त्याला तर कसली तोडच नाही…

बाजूला खळखळून वाहणारा झरा, त्याचं थंडगार पाणी… मनसोक्त खेळा, पाण्यांत डुंबून घ्या…

गावभर हिंडून मग करंट लागून उभे झाल्यासारखे केस आणि कपडे, अश्या अवस्थेत घरी आलो की आजी ओरडायची,

“काय रे कारट्यांनो, कुठं गेला होतात?? कसे झालेत ते कपडे अन् मातीत लोळवलं का कुणी?? त्या शालीच्या कारट्यानं तर नाही न केलं हे?? सांग.. त्याची त आता काही खैर च नाही!!! लय लाडवून ठेवलं त्या शालीनं तिच्या पोराला…”

“अग, आजी तसं नाही.. त्यानं काही केलं नाही… हे बघ!! आम्ही काय आणलं…” 

“ते राहू दे… जा पाहिले अंगावर पाणी घ्या… हात पाय धुवा अन् दोन घास खाऊन घ्या… मामी न पुरी भाजी केली… जा पळा..”—आजी

“अरे वाह!! मामी एक नंबर.. मामी उद्या गुलाबजाम…” — मामीला झाडावर चढवत.

“बाय माझ्या पोराला गुलाबजाम पायजे व्हय… उद्या गुलाबजाम करजो गं… पोर चार दिवस येतं त ईच्छा पूर्ण करायलाच पाहिजे…” —आजी

संध्याकाळी मग मामाच्या मागे लागून कधी icecandy (बर्फाची कुल्फी), पेप्सी , बड्डी का बाल, कधी मटका कुल्फी खायची…

आमच्यासोबत मग आजीची आणि मामीची पण मज्जाच मज्जा…

रात्रीची अंगणात बसलेली पंगत…  रस कुरडई ची मजाच न्यारी…  कैरी च नवीन नवीन घातलेलं लोणचं…

आकाशातील लख्ख तारे मोजत, अंगणात आजीच्या मांडीवर भुताच्या, परीच्या गोष्टी ऐकत कधी डोळा लागायचा काळायचेच नाही…

मामाची टवाळकी, मामीच लाजून गालात हसणं…  आजीची प्रेमळ हाक… तिच्या गोधळीतली ऊब…


आता हरवली आहे काळाच्या पडद्याआड…  ते मामाचं गावं हरवलंय आता…

आताच्या मुलांच्या मामाच्या गावाची ओढ म्हणजे एक tour आहे…

आता आपण मुलांना सोबत घेऊन जातो आणि सोबतच येतो…

त्यात कधी असं असतं की, मामा-मामी जॉब मुळे दुसरीकडे आणि आजी-आजोबा दुसरीकडे… त्यामुळे ती आधीची एकत्र कुटुंबाची मज्जा मुलांना फार कमी वेळा अनुभवता येते…

पण आजची मुलं ती!!! असेल त्यात adjust होऊन, लगेच रमतात… बरं का!!

आता ते मामाबरोबर कॅरम, मामीसोबत chase खेळताना बघायला मिळतात…

आजोबांना घेऊन सायकलिंग ची मजा घेतात तर आजीला मोबाईल मधले नवनवीन आविष्कार दाखवतात आणि शिकवतात सुद्धा…

पिझ्झा, बर्गर, icecream खाऊन मामा-मामी सोबत मूवी पण बघतात… शॉपिंग-हॉटेलिंग करतात… घरी येऊन, आपल्याला मामी सोबत compare करून, मामी कशी मस्त आहे!! मौत्रिणीसारखी!! बिनधास्त!! हे पटवून दिलं की मग पाय पसरून झोपतात…

आणि आपलं काय???

जरा जास्त झोपलं की आई म्हणेल,” काय ही पोरगी??? दोन लेकरांची आई असून एवढी झोपते… दिवस अंगावर येईपर्यंत कोणी झोपतं का???”

“अग बाबांसोबत ना या अमुक शॉप मध्ये जात च येत नाही ग… चल ना… तू आली तर जाऊन येऊ… येताना देवीचं दर्शन घेऊ… तू ओटी भर… मग या तमक्या कडे जाऊन येऊ… बरेच दिवस झाले, बोलावतात, पण हे काही घेऊन जात नाही अन मला गाडी येत नाही… तू आली तर जाऊन येऊ ग…”— आई.

मग वहिनी म्हणते, “अहो ताई, इथे ना sale लागलाय… जाऊन यायचं का ??? चला ना तुमचा चॉईस ना भारी आहे!!”

बाबा “अरे, ही असली policy आहे… इथे असा फायदा होतो… इथे गुंतवणूक कर… चल, त्या काकांना भेटवून देतो.. saving करायला पाहिजे…”

दादा “चला, इकडे ट्रिप काढायची का?? ताई आहे, पोर आहे, सगळेच जाऊ… मजा येईल तेवढीच हवापालट होईल… जीजूंना ही बोलवून घेऊ…”

“अरे नको, मी माहेरपणाला आले आहे… हे सगळं तर मी तिकडे पण करते… मला निवांत झोपू द्या रे… आयतं कोणी जेवायला द्या रे… माझी आवडती गाणी ऐकू द्या, सिरीयल, मूवी बघू द्या pls…”

बरं आपलं ऐकतेय कोण???

पोरांचं मात्र मामाच्या गावाला येऊन सार्थक होतं… मनसोक्त हिंदळणे, खेळणे, फिरणे सगळं कसं मनासारखं… मामाकडून नवीन technology समजून घ्यायची… मामीकडून नवनवीन फॅशन trends शिकून घ्यायचे… काळ बदलला आहे…

“पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया…”

हे गाणं ओठांवर असलं तरी त्यातली खरी मजा हरवली आहे…

आता ना ती झाडं राहिली ना ती गाव राहीली…

मात्र माहेरची ओढ अजूनही तशीच आहे… आणि सुट्टी लागली की मुलांना गावाला… नाही नाही!!! मामाच्या गावाला जायची घाई ही तशीच आहे…

काळ बदलला तरी नातं मात्र तेच असतं… त्यातली ओढ-अपेक्षा तीच असते…  मामाच्या गावाला जायची घाई ही घाईच असते…

 

फोटो साभार:”गुगल”

(शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात…. तुमच्या प्रतिक्रिया आणि suggestions नक्की आवडेल… कथा आवडल्यास like आणि share करायला आणि comments द्यायला विसरू नका…?) ––दिप्ती अजमीरे.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत