मी आवडती माझीच…💕

Written by

©®सुनीता मधुकर पाटील.

छे !!! असं कसं एकदम सांगू , कोणालातरी मी किती किती आवडते . कोणाच्यातरी कौतुकाने मग मी किती भारावते…

अहो !!! कोण म्हणून काय विचारता…मीच !!! …

हो मलाच मी खूप आवडते…अहो !!! आजकाल भलतेच विचार मनात डोकावू लागलेत…

उंचच्या उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालावी…

पाखरू बनून नभामध्ये मुक्त फिरावे…

किलबिलत्या पक्षांशी छान गुज करावे…

डोंगर माथ्यावर , नदी कपारी , रानावणातून फिरावे…

कोकिळेच्या स्वरात स्वर मिसळून मंजुळपणे गावे…

फुलां पानांवर भ्रमरापरी प्रेम करावे…

फुलांचा वर्षाव अंगावर झेलून सुगंधात न्हाऊन जावे…

पावसात बेधुंदपणे चिंब भिजावे…

लहान बाळा प्रमाणे स्वतःला विसरून जावे…

सगळे पाश , बेड्या तोडून मी फक्त माझीच व्हावे…

नको दुसरी तिसरी कुठली ओळख साऱ्या ओळखी विसरून स्वच्छंद जगावे…उनाड व्हावं…

जसं जसं वय वाढत चाललंय तसं तशी भारीच उनाडकी सुचतेय…पण मस्त वाटतंय बरं!!! मी माझी मलाच नव्यानं गवसु लागली आहे…

कधी कधी मनात विचार येतो…

खरचं गरज आहे का मी कोणाला तरी आवडावं…मी स्वतःलाच आवडते एवढं पुरेस नाही का ?…का मी दुसऱ्या कोणालातरी आवडावं हा अट्टहास…नको वाटतं सांगणं आता आयुष्याच्या पटावर कशी मी एक छान मुलगी , सुन आई , गृहिणी , पत्नी ही पात्र अगदी जीव ओतुन साकारली… कशी आई होऊन मुलांसाठी वेडीपीशी झाले… आठवते मला दुसऱ्यांची मन जपताना माझ्या मनाला घातलेली मुरड… सगळी नाती व्यवस्थित निभावून सगळ्यांच्या हृदयी मी स्थानापन्न तर झाले पण हे सगळे करता करता हरवलेले माझे मीपन…

भूतकाळात डोकावून पाहता जाणवते मला मुळात मी आहे भिन्न पण आता तिथे करतेय दुसरीच कोणीतरी वास…जी आहे माझ्याहून वेगळी… कोणी घेईल का समजून मला…कोणी ऐकेल का माझे हे उद्विग्न मनाचे रुदन…

मनात हे विचारांचे द्वंद्व चालू असतानाच माझ्या लेकीचा फोन आला…तिचा नेहमीचाच प्रश्न काय केलंस आज…? कसा गेला दिवस…? मग काय लिहलं आज…सांगितलं तिला आजचा विषय आहे मी आवडते मलाच…तर म्हणते कशी… ” तो क्या खयाल है आपका…आवडतेस ना तु तुझी तुलाच…”

मी म्हटलं ” माहीत नाही…”

” का ? तु जर तुझी तुलाच आवडत नसेल तर दुसऱ्यानां कशी आवडणार… आधी स्वतःवर प्रेम करायला शिक… स्वतःसाठी जगायला शिक… जगाची पर्वा नको करु… तु स्वतःला आवडतेस ना !!! उतना ही काफी है मेरी प्यारी मम्मा..। ”

बरोबर बोलत होती ती…मी जर माझी मलाच नाही आवडले तर दुसऱ्याना कशी आवडणार …पण आता तो ही प्रश्न गौणच आहे मी स्वतःला आवडते हे माझ्यासाठी खूप आहे…दुसऱ्या कोणाला आवडते की नाही ह्याने फरक नाही पडत मला…मी आहे आवडती माझीच…


मी आवडती माझीच…💕

मी आवडती माझीच…

कारण

मी धैर्यमेरू अविचल

राहुनी धीरगंभीर

वारीन संकटांना…💕

मी आवडती माझीच 

कारण ,

मी आनंदघन 

बरसवुनी प्रेमसरी

देईन नवजीवन…💕


मी आवडती माझीच

कारण ,

मी प्रखरतेज

उजळवीन दाहिदिशा

स्वकर्तृत्वाने…💕

मी आवडती माझीच

कारण ,

मी थंडहवेची झुळूक

घालुनी हळुवार फुंकर

संचारेन नवचैतन्य…💕

मी आवडती माझीच

कारण , 

मी शितल पूनवं चांदण

चंद्राच्या साक्षीने

देईन नवा अर्थ आवसेच्या रात्रीला…💕


मी आवडती माझीच

कारण ,

मी मधुर संगीत

छेडूनी ताण नवी 

गाईन जीवनगीत…💕


मी आवडती माझीच

कारण ,

मी सप्तरंग इंद्रधनू

उधळुनी रंग प्रीतीचे 

रंगेन माझ्याच रंगात…💕

#माझेलेखन

©® सुनीता मधुकर पाटील

Article Categories:
प्रेम

Comments are closed.