मी कमवत नाही, पण वाचवते तर ना?

Written by

पार्थ आणि गार्गी हे सुखवस्तू घरातलं जोडपं. पार्थ नोकरदार तर गार्गीने मुलांसाठी स्वतःची चांगली नोकरी सोडून गृहिणीपद आनंदाने स्विकारलेलं.

इतर घरात जशा नवरा बायकोच्या कुरबुरी होतात, तशा यांच्यातही चालतात. जेवढ्यास तेवढच पण.
पार्थला गार्गीला उकसवण्यात फार आनंद मिळतो. एकमेकांशी शाब्दिक झटापटी हा त्यांच्या जीवनातला आवडता विरंगुळा……….

पण एकदा मात्र असच बोलता बोलता खर्चाचा विषय निघाला आणि पार्थ बोलून गेला, तुला काय ग? मला कमवावं लागतं, घरी बसून नाही मिळत काही!!

झालं, गार्गीच डोकं फिरलं. वातावरणाने लगेच पेट घेतला.?

हो का, मी पैसे कमवत नाही, पण भरपूर वाचवते मात्र; नाहीतर आपला आणि पैसे वाचवण्याचा काही संबंध येतो??

तुला तर चक्क लाज वाटते बार्गेनींग करायची. एकटं पाठवलं तर समोरचा बोलेल त्या पैशात जराही विचार न करता ती वस्तू घेऊन येतोस.

मला तर बरेचदा डाऊट येतो, नवरे मंडळी गेली की हे दुकानदार थोडे चढवूनच किमंत सांगत असावेत, त्यांनाही माहीत असणार, साहेब बोललेली किंमत झटकन हातावर ठेवणार!!

अगं गार्गी, मलाही असंच वाटत, तुम्ही बायका दुकानात शिरल्या की तुमच्याकडे बघून अगोदरच रेट वाढवत असावेत; कारण तेही ओळखून असतात, बाईसाहेब नक्की खिचपीच करणार!!

आणि मग तुझ्यासारख्यांना आपलं वाटतं, आपण भाव केला, आणि पैसे वाचवले.

अस्सं, तुला आठवतय ना, एकदा आपण प्रयोग करून बघितला होता पार्थ….
दोघांसाठीही नवीन असणाऱ्या दुकानात जाऊन तू किमंत काढून आलास आणि मी ती वस्तू, तू काढून आणलेल्या किमंतीच्या निम्म्या किमतीत घेऊन आले.

तेव्हा कशी जिरली होती रे तुझी???

तुला कमवायचं माहिती असेल तर मला तू कमवून आणलेलं कसं वापरायचं हे चांगलंच माहिती आहे.

व्यवहार ज्ञान आम्हा बायकांत उपजतच असतं बरं!!

आमच्या बायकांच्या कित्येक पिढ्यांतून चालत आलेला वारसाच जणू तो!!

काहीही, काय तर म्हणे वारसा!! पार्थ तोंड वेंगाडून बोलतो.

तुला सरळ कबूल करवत नाही ते सांग ना, पार्थ.

तापाचं निमित्त काय झालं, आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होतास, बिल माहितीये ना किती झालं होतं? कुणी भरलं सांग??

मेडिक्लेम काढूया म्हंटलं, तेव्हा किती भडकला होतास, कशाला नसता खर्च, काही झालं नाही तर वाया जातात उगाच.

पण तुझ्याशी कचाकचा भांडून का होईना तो काढून घेतला होता म्हणून, नाहीतर फटका चांगलाच बसला असता खिशाला!!

कमवत नाहीच रे मी, वाचवते मात्र चिक्कार!!

काय मोठं कौतुक सांगते ग एवढं ??

तू कबुल कर, अजिबात नाही सांगणार?

खरंच आम्ही बायका येड्याच असतो नाही का?

भाजीवाल्याकडे, किराणावाल्याकडे, कपड्यांच्या दुकानात, खेळण्यांच्या दुकानात, भांड्यांच्या दुकानात जिथे जातो तिथे वचावचा करून चार पैसे वाचतायत का बघतो, बरेचदा वाचवतोच!! आणि तुम्ही नवरे मंडळी सहज म्हणता कमवायला कुठे जाता, अरे न का जाईना; वाचवायला तर जातो सगळीकडे!!

काहीही खरेदी करताना तुला मी बरोबर लागतेच ना, कुणाशी पैशाचं बोलायचं म्हंटलं की मला का पुढे करतो सांग??

कशी जीभ अडकते तुझी आणि ही घरात बसणारीच चुरू चुरू बोलून जागोजागी पैसे कसे आणि कुठे कुठे वाचतील ते बघते, नाही का?

तुम्ही कमवता आणि आम्ही आमच्या व्यवहारचातुर्याने ते टिकवतो म्हटलं!

हा कधी साड्या, ड्रेस, पार्लरला होतो थोडा हात ढिला, पण ते पॅचअप करतो आमचं आम्ही बरोबर.

महिनाभरात जीवाचा आटापिटा करून एवढे वाचवले जातात की त्यात आमच्या सौंदर्य वृद्धीवर होणारा खर्च तसा फुटकळच म्हणता येईल.?

आठवतं ना, त्या दिवशी शॉपिंगला गेलो तेव्हा मला खरं तर ती 2000 ची साडी आवडलेली, पण मी ती न घेता 1800 ची घेतली, 200 रुपये तर खडे खडे वाचवले बोल मी तुझे!!

आणि तरी तू मला कमवण्यावरून ऐकून दाखवावस, जा नाही करणार मी आजपासून बार्गेनींग, कशाला उगाच त्या साध्या भोळ्या दुकानदारांची हाय लावून घ्यायची…..जाऊ दे जातायत तर, अपने पास बहोssत पैसा है………!!

नको ग बाई नको, रहेम कर, तुम्ही बायका जर अशा सुतासारख्या सरळ झालात तर त्या दुकानदारांना मुळी आपण काही विकतोय असा फिलच येणार नाही …….ते तर कल्पनाही करू शकणार नाही की, कोणी बाई आली आणि किंचितही घासाघीस न करता सांगितलेल्या भावात हसत हसत वस्तू घेऊन गेली. पचणारच नाही त्यांना, अटॅक बिटॅक यायचा ना उगाच एखाद्या सॉफ्ट हार्टेडवाल्याला.?

बरं चल, मलाही माफी देऊन टाक आता, भांडणाच्या आवेशात निघालं तोंडातून……

अगं तू सगळं व्यवस्थित मॅनेज करतेस म्हणून तर सगळा पगार तुझ्याच ताब्यात देतो ना…..आताही बघ माझं कार्ड कोणाकडे आहे??

तुझ्या सल्ल्याशिवाय एकही काम करतो का सांग??

तूच चीफ आहेस, आम्ही आपले इकडे तिकडे सगळीकडेच नोकरदार, बरोबर ना??

अगं, तुझ्याच वाचवण्याच्या सवयीमुळे कधी मी रिकामा झालो तरी घर भरलेलंच असतं नेहमी, अडीअडचणीला हे तुझं वाचवलेलं कितीदा कामी आलंय! हळूच कुठून काढतेस कोण जाणे, त्यामुळेच कुठल्या नडीला कोणासमोर हात नाही पसरावे लागले कधी; तू कमवत नाहीस कबूल पण वाचवतेस मात्र कैक पटीनं!!

गार्गीच्या नवऱ्याने मान्य केलं एकदाचं, तुमच्या घरचा काय हालहवाल, बघा एकदा प्रेमाने विचारून…… तुला काय वाटतं रे मी वाचवते की उडवते?

नवरे मंडळी आतापर्यंतच्या अनुभवानुसार रागरंग पाहून परिस्थिती हाताळतील, यात काही शंकाच नाही!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

लेख आवडल्यास लाईक, कमेंट, फॉलो नक्की करायचं आणि शेअर करताना नाव सुध्दा उचलायचं हा?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत