मी कलेक्टर होणार

Written by

मी कलेक्टर होणार

एक कटींग चाय नी पार्ले जीचं बिस्कुट
मग सुटतो मी पेपर टाकायला
मायबाप दोघंबी आहेत
पण दोघंबी अधू आहेत ओ
दोघांनाबी पाय न्हाईत
कदीकाळी गाडीखाली चिरडलेले
मी बारका दिड वरसाचा
मायच्या कडेवर होतो तेंव्हा
तेंव्हापासून शेजाऱ्यांनी वाढीवला मला
ते तरी किती काळ पोसतील ओ.
माझं आयुष्याचं गणित थोडं
अवघड आहे खरं
पन मी सोडवणार आहे ते गणित
मला दया नको आहे कोणाचीही
तो वरचा बाबा घेणार माझी काळजी
माजा विश्वास आहे त्याच्यावर
माझ्या मायचे पाय नाहीत
तरीबी खुरडत खुरडत सगळा सैपाक करते
माझा बाप तिला मदत करतो
मी शाळत बी जातो
सहाव्या इयत्तेत आहे
पाचवीची स्कालरशीपबी मिळाली मला
तेंव्हा माझे मायबाप लय खूष झाले होते
इथंच झोपडपट्टीत घर आहे आमचं
पन बैठ्या चाळीत घर घेनार मी
पैसे जोडतोय सध्या
पेपर टाकल्यावर य भूक लागते
मग हा असा चायबिस्कुट खातो
पोटातला आगडोंब आपणच थांबतो
घरी जाऊन मायला पानी भरुन देतो
आंघुळपांघुळ करुन,भाजीभाकरी खाऊन शाळत जातो
शाळतून आल्यावर येका हॉटेलात काम करतो
रातच्याला अभ्यास
अहं दया नको हां तुमची
मी खूप शिकनार आहे
कलेक्टर होणार आहे
माझा बाप सांगतो कलेक्टर लय मोठा असतोय
मी कलेक्टर होणार
सगळ्यांची कामं करणार
माझ्या मायबापाला मी राजारानीवानी ठेवणार
तुमचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असुदे

——–गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.