“मी डॉक्टर का झालो “

Written by

आज युवराजचा एम.डी. मेडिसिन चा निकाल लागणार होता. त्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं होतं.तीन वर्ष त्याने अहोरात्र जागून अभ्यास केलेला होता.कुठलाही सणवार नाही.की कुठे बाहेर जाणे नाही फक्त अभ्यास केला होता आणि परीक्षा पण खूप चांगली गेली होती. External examiner ने तर युवराजचं  खूप कौतुक केलं होतं.

निकाल लागला आणि युवराज त्या परिक्षेत प्रथम आला होता. त्याला सुवर्णपदक मिळाले होते. युवराजचे पहिले स्वप्न पूर्ण झाले होते. आता त्याचे दुसरे स्वप्न होते की आपल्या गावाकडे प्रॅक्टिस टाकायची कारण त्यांच्या गावात कुणीही एम.डी. मेडिसिन नव्हता.गावातील लोकांना उपचारासाठी दूर शहरात जावे लागे.

युवराजला वाटले आपल्या गावात आपला उपयोग व्हायला हवा. आता जास्त उशीर न करता युवराज ने दोन रूम भाड्याने घेऊन आणि आवश्यक ते साहित्य घेऊन प्रॅक्टिस सुरु केली.गावातल्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणून अगदी नाममात्र फीस तो घेत होता. अहोरात्र जागून त्याने रुग्णाची सेवा केली. लवकरच त्याची प्रॅक्टिस फळाला आली.

गावात स्थिर झाल्याने युवराजच्या लग्नाची मात्र खूप पंचाईत झाली. त्याला मनासारखी मुलगीच मिळत नव्हती शेवटी त्याला वेगळ्या क्षेत्रातील मुलीशी लग्न करावे लागले.

युवराज आता स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित झाला होता. हॉस्पिटल अवाढव्य बांधलं होतं. त्याने त्यासाठी भरपूर कर्ज घेतले होते.आणि त्या गावात जमतील तेवढ्या जास्त सुविधा तो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असे.

एक दिवस रात्री एक रुग्ण आणि त्याच्यासोबत दहा ते बारा माणसे युवराजच्या हॉस्पिटल मध्ये आले.त्या रुग्णाच्या छातीमध्ये दुखत होते.त्याला severe हार्ट अटॅक आलेला होता. डॉ युवराज ने लागलीच त्याची ट्रीटमेंट सुरु केली. सलाईन लावून त्यात इंजेक्शन सोडण्यात आले. आणि बाकी उपचार करत असताना तो रुग्ण अजून सिरीयस झाला आणि दगावला.

लोकांनी धिंगाणा सूरू केला. आणि म्हणायला लागले डॉ युवराजनेच त्याला मारले.चुकीचे इंजेक्शन त्याला दिले.इंजेक्शन दिल्या दिल्या कसा मृत्यू येऊ शकतो? त्यातला एकजण ओरडला मारा रे त्या डॉक्टरला. लगेच जमाव त्याच्याकडे पळाला. त्याला मारायला लागला. काही जण त्याच्या दवाखान्यात असणारी किमती (कर्जाने घेतलेल्या) वस्तूंची तोडफोड करायला लागला. त्या जमावाला कसलेही भान नव्हते आणि त्यात आजूबाजूला असलेले अजून काही लोकं हात धुऊन घेत होते.

युवराजच्या बायकोने पोलिसाना फोन लावून बोलावून घेतले. पोलीस आले तेव्हा कुठे जमाव पांगला. पण युवराजला खूप लागले होते. नशिबाने हाड वगैरे मोडले नव्हते. जागजागी खरचटलेले दिसत होते आणि मुक्का मार ही होता. तसंच त्याचं खूप आर्थिक नुकसान झालेलं होतं इतक्या दिवसात कमावलेलं एका क्षणात गमावलं होतं.

युवराजला हा अनुभव एक नवीन धडा शिकवून गेला होता. आता त्याने रुग्ण हॉस्पिटलमध्ये admit करताना एक नियमावली बनवली होती. तो मोजकेच रुग्ण बघायला लागला.

तुम्हीच सांगा काय दोष होता युवराजचा

1 अहोरात्र जागून अभ्यास केला

2 गावातील लोकांचा विचार करून त्याने गावात हॉस्पिटल टाकले.

3 त्याने तडजोडीने दुसऱ्या क्षेत्रातील मुलीशी लग्न केलं. गावाच्या भल्यासाठी

4 नवनवीन उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्या.

5 नाममात्र फीस घेतली. कामाशी प्रामाणिक आणि कितीतरी रात्री रुग्णसाठी जागून काढल्या.

असं फक्त युवराज सोबतच होत नाही तर आजकाल बऱ्याच डॉक्टरांना असा अनुभव येतो. बऱ्याचदा कोर्ट कचेरी चकरा नको म्हणून रात्र रात्र जागून केलेली कमाई प्रकरणे मिटवण्यासाठी अश्या लोकांच्या खिशात घातली जाते.

अश्या वेळेस मी डॉक्टर का झालो असा युवराजला प्रश्न पडला.

# टॉपब्लॉगकॉन्टेस्ट ऑक्टोबर 2019

पोस्ट आवडल्यास like करा,share करायची असल्यास नावासहित share करा

©डॉ सुजाता कुटे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा