मी , ती , फेसबुक आणि तो (भाग 2 )

Written by

काही दिवसांनी मित्र देखील गावाला निघुन गेला .माणस दूर गेली की मग त्यांच्या नसण्याची किंमत कळायला सुरुवात होते . काही दिवसानी निकाल जाहीर होणार होता . मी आतुरतेने वाट बघू लागलो . निकालासाठी नाही हो ,निकालाच्या निमित्ताने ती दिसेल म्हणून !! पहिला क्रमांक हमखास असल्याने हवा होणार होती ती वेगळीच . “मावशी ,अम्या आहे का ? ” आवाज कानी पडला !! मी तसाच बाहेर . राक्षसी स्माईल पुढे उभी होती .” इकडे ये एक जादू दाखवतो . मामाने त्याचा जुना मोबाईल दिला मला .त्यात नेट पण चालतं ते पण 2G . फादर च कृषी कार्ड टाकलंय यात !! महिन्याला डायरेकट 1 GB .” यातले अनेक शब्द मला नवीन होते .” हे बघ फेसबुक , यात कुणाशी पण बोलता येतं ! म्हणजे चॅटिंग रे ” मी हुशार असल्याने डोक्याची ट्यूब पेटली !! माझा चेहरा खुलला . फेसबुकच्या रूपाने देव द्वारी आले होते . मला काय हवंय हे त्याला कळालं !! फेसबुक मध्ये काहीतरी टाईप करून तो म्हणाला ” तुझं बॅड लक लै वाईट आहे रे अम्या , तिचं अकाऊंटच नाहीये फेसबुक वर ” माझा चेहरा पुन्हा उतरला .” आपण एक काम करू तुझं अकाऊंट चालु करू म्हणजे ती आली की लगेच तुला कळून जाईल ” आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी मित्र देवरूपाने आला आहे की काय असे भासू लागले !! आयडी आणि पासवर्ड विसरू नको असा बहुमोल सल्ला त्याने दिला !! तिच्यासाठी कुणा-कुणाचं ऐकून घ्यावं लागतं होतं , असो .. रिझल्टचा दिवस आला ! मागच्या दिवाळीतला न वापरलेला ड्रेस आणि चेहऱयावर थोडी पावडर लावून मी शाळेत हजर !!ती कुठेच दिसेना .. मित्र येऊन म्हणाला ” अम्या , ती येणार नाही , काकांकडे गेली आहे ती . कदाचित तिकडेच पुढचं शिक्षण पण ” ‘ तुला कोण बोललं आणि कुठे ‘ मी विचारणा केली. ” अरे फेसबुक रें , ती शितली म्हणाली मला ” माझ्या पायाखालची जमीन सरकली !! दहावीत द्वितीय क्रमांक ” अमेय ,92 टक्के …. “. दुःखाचा डोंगर कोसळला ! आधी ती गेली आणि आता पहिला नंबर देखील !! ” तुझं बॅड लक लै वाईट आहे रे अम्या ” मित्र जखमेवर मीठ चोळत होता !! ” टेन्शन नको घेऊ , ती फेसबुक वर येईल लवकर , मग होईल काहीतरी !! ” जोडीला पून्हा ती राक्षसी स्माईल !! काहीतरी गौडबंगाल आहे असं जाणवू लागलं !! याला देवाची उपमा देऊन मी खुप मोठे पाप केले होते .आयडी आणि पासवर्ड विसरू नको असा बहुमोल सल्ला त्याने पुन्हा दिला होता !!

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा