मी पूरग्रस्त ओली बाळंतीण

Written by

©सरिता सावंत
ज्या महापुराने आज सगळं जनजीवन विस्कळीत केलं त्याच महापुरातील मी एक ओली बाळंतीण. पहिल्यांदा मातृत्वाची चाहूल लागलेली मी. पहिल्यांदा आई होणार म्हणून खूपच नवखेपण,उत्सुकता,कुतूहल,भीती सगळ्या संमिश्र भावना होत्या मनात. घरातही उत्साह आणि आनंद नांदत होता. माहेर आणि सासर एकाच गावात असल्यामुळे गरोदरपणात सगळे हट्ट पूर्ण झाले. काय पाहिजे हे सांगायच्या आधीच आई खायला आणून द्यायची.
पहिलं मूल म्हंटल्यावर होणाऱ्या आईचेही खूप लाड होतात. मी ही सगळे लाड पुरवून घेत होते. होणारे बाबा पण काय हवं नको आवर्जून विचारायचे, घरातल्या कामात हवी ती मदत पण करायचे. आईला बाळाला प्रत्यक्ष अनुभवता येत आणि होणाऱ्या बाबांना त्या आईमार्फत ते अनुभवता येत. आमच्या दोघांसाठी हे क्षण खूप अनमोल होते.
नेहमी प्रमाणे माझं पौष्टिक खाणे,वेळेवर गोळ्या घेणे,व्यायाम करणे, गर्भसंस्कार पुस्तक वाचणे, ज्ञानेश्वरी वाचणे सगळं चालू होतं. सातव्याच महिन्यात पोटात दुखू लागलं आणि मनात धडकी भरली की आताच डिलिव्हरी होईल की काय. पण वेळेत डॉक्टर कडे गेलो आणि काही अनर्थ नाही घडलं. बाळ सुखरूप होत. आणि मीही सुटकेचा निःश्वास सोडला आता.
डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे पुढील महिने काळजी घेतली. नववा महिना आता चालू झाला होता. आता उत्सुकता शिगेला पोहचली होती. एक एक दिवस वाटायचं खूप मोठा आहे. रोज वाट बघायचे की आज पिटुकल माझं माझ्या कवेत असेल.
नववा महिना संपत आलेलाच की एक दिवस त्रास सुरू झाला. हॉस्पिटलमध्ये आलो. त्रास वाढतच चाललेला. बाळाला नाळेचे वेढे असल्या कारणाने डॉक्टरांनी c-section चाच पर्याय सुचवला होता. पण असह्य वेदना मी माझ्या बाळासाठी सहन केल्या आणि पिटुकल्याचा जन्म झाला. मुलगा झाला असे डॉक्टर सांगत असतानाच मी चक्कर येऊन पडलेले. जेव्हा जाग आली तेव्हा माझं पिटुकल माझ्या बाजूला होत. इवल्याश्या डोळ्यांनी त्याच्या आईला बघत होत. खरंच तो क्षण अवर्णनीय असतो. ते नजरेतील प्रेम आणि ओढ बाळ आणि त्याच्या आईलाच कळू शकत. सर्व काही ठीक असल्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी सोडलं. पाऊस पडतच होता. गाडीतून पहिल्या पावसाचे थेंब बघत पिटुकला घरी आला.
छान आंघोळ शेक झालं आणि आम्ही दोघे गाढ निद्रेत हरवलो.
काही वेळाने खूप धो धो आवाज येत होता. आईला विचारलं तर तिने सांगितलं पाऊस वाढलाय. पाणी अंगणात आलंय. तशी झोप उडाली. बघितलं बाहेर जाऊन तर पाणी खरंच अंगणात साचलेलं.आजूबाजूचा सगळं परिसर पाण्याने वेढलेला. काही वेळात लाईट जाण्याची शक्यता होती.हळूहळू पाणी वाढत होत तस माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. तेवढ्यातच बाळाचे बाबा , आजोबा, बाकी नातेवाईक आले आणि म्हणाले पाणी वाढतंय,इथून आताच्या आता आपल्याला निघावं लागणार. पिटुकल तर माझं शांत झोपलेलं. त्याच्याकडे बघून अजून काळजी वाढत होती. तसच हाताला लागेल ते सामान बॅगमध्ये भरलं आणि घराबाहेर पडलो. तोपर्यंत पाणी घरात यायला सुरू झालेल. बाळाचा पहिला दिवस आणि पावसाने थैमान घातलेलं. बाळाकडे बघून खूप रडायला येत होतं. काही अंतरापर्यंत चालत आलो. गाडी बाळ आणि माझ्यासाठी बोलवलेली त्यात बसलो. सोबत बहीण होती. आई,बाळाचे बाबा,आजोबा सगळे मागून येत होते. अर्धा जीव बाळामध्ये अडकलेला तर अर्धा बाकीचे नातेवाईक मागे होते त्यांच्यात.पाऊस वाढतच चाललेला. बाहेर बघितलं तर सगळी माणसे घरात आहे ती परिस्थिती सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत होते. बाळ उठून डोळे किलकिले करून सगळीकडे पाहत होत. त्या बिचाऱ्याला काय माहीत की काय घडतंय. कुठे जाणार हेही माहीत नव्हतं. काही वेळाने कळलं की जवळ एक धर्मशाळा आहे तिथे जायचंय. ७ किमी अंतर होत. रस्त्यावरच पाणी वाढत होत. गुडघ्यापर्यंत पाण्याची पातळी वाढलेली. आता खूप भीती वाटत होती. बाळाला उराशी कवटाळून बसलेले मी. देवाला मनोमन प्रार्थना करत होते की नऊ महिने ज्याला पोटात वाढवलं,अनुभवलं त्याचा प्रत्यक्ष सहवास मला आज लाभतोय. काहीहीत अघटित घडू देऊ नकोस परमेश्वरा. आता लाईट गेलेली. अंधार वाढत होता. माझा देवाचा धावा चालूच होता. तोच गाडी पुढे जात नव्हती. ती रस्त्यातच बंद पडली. एक किमी अंतर राहिलेलं आणि गाडीने दगा दिलेला. दुष्काळात तेरावा महिना याला म्हणतात.
गाडीमधून उतरून खाली आले तर कमरेपर्यंत पाणी वाढलेलं. आता तर खूपच अस्वस्थ झाले. त्यात सोबत फक्त बहीण आणि गाडीचा ड्राइवर. मागून सगळे येतात की नाही त्याचंही टेंशन होतच. चारी बाजूनी संकटांनी घेरलं अस वाटत होतं. कमरेपर्यंतच्या पाण्यातून बाळाला घट्ट उराशी कवटाळून मी चालत होते. मनाला इतकच सांगत होते की बाळाला काही होऊ देणार नाही मी. नऊ महिने स्वतःपेक्षा जास्त जपलंय मी त्याला. माझा आनंद,सुख सगळं त्याच्यासोबतच आहे आता. बाळाकडे बघून डोळयातून पाणी वाहिल्याशिवाय राहायचं नाही.झरकन नऊ महिने डोळ्यासमोरून जायचे. प्रत्येक पावलाला माझ्या पिटुकल्याला सांगत होते की तुला सुखरूप ठेवेन,तुला काही होऊ देणार नाही. पिटुकल पण रडून झोपी गेलेलं. चालल्यामुळे पूर्ण मी भिजलेले आणि बाळ पण.काही वेळाने धर्मशाळेत पोहचलो. थंडीने कुडकुडत होतो दोघे. पटकन कोणत्या बाईने स्वतःच्या हातातील सुका कपडा दिला आणि म्हणाली पूस आधी बाळाला आणि तुला पण. बर वाटलं जरा की काळजी करणार कोणीतरी तिथे आहे. तोवर दुसरं कोणीतरी येऊन बाळाला कपडे देऊन गेलं. मदत करण्यासाठी तिथे खुपजण आलेले. काय हवं नको ते विचारत होते. मला ही घालण्यासाठी साधेच का होईना पण कपडे मिळाले. बाळाला पुसून कपडे घालून आधी जवळ घेतलं. दूध पाजलं. मनोमन देवाचे आभार मानले. जो जो तिथे मदत करणारा होता त्या त्या माणसात मला देव दिसला. मला गरम पाण्यापासून बाळाच्या आवश्यक वस्तुपर्यंत सगळं मिळालं. खूप आतून हादरलेले पण तिथे जाऊन सावरले. बाळ हसताना पाहून आनंदाश्रू यायचे डोळ्यात. आजू बाजूच्या शहरात,परिसरात राहणाऱ्या बायकांनी आमची चांगली काळजी घेतली.
मागून आई,नवरा,बाकी नातेवाईक आलेच तस अजून बर वाटलं. आधार वाटला.
खरंच आज नऊ दिवस झालेत आम्ही इथे आहोत पण कसली कमतरता भासवून दिली नाही आम्हाला. माणसातल्या देवाला बघून बर वाटलं. पुरासारखी भीषण परिस्थिती आता सावरते. घरी परतून नव्याने सुरुवात करायची आहे पण आता पिटुकल सोबत आहे त्यामुळे धैर्य अजून वाढलंय. माझं बाळ सुखरूप आहे यातच मी भरून पावले. हे मातृत्वच बळ देईल आता विस्कटलेली घडी पुन्हा पसरवायला.
शेवटी आई ही आईच असते.
लेख लेखिकेच्या नावासाहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही.
©सरिता सावंत

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा