मी…. लहान …..आहे….की….मोठी….??

Written by

शितल ठोंबरे….

मी….लहान…आहे…की…मोठी….??

मला किनई काही कळतचं नाही.जॅम लोच्या झालायं माझा.ही मोठी मंडळी अशी का वागतात हो?

काय झालं काय विचारता. या मोठ्या माणसांनी ना माझी फारच गोची केलीय.

कधी मला हे म्हणतात तू आता ताई झालीस, मोठी झालीस तर कधी हे मला म्हणतात तू अजून लहानच आहेस.
मला तर कळतच नाही बुवा मी नक्की लहान आहे की मोठी झालीय.

आता बघा न दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट आमचा पिंट्या.पिंट्या म्हणजे माझा लहान भाऊ.त्याच खरं खरं नाव आहे प्रीत पण घरातले सगळे त्याला लाडाने पिंट्याच बोलतात.

तर आमचा हा पिंट्या इतका मस्तीखोर आहे की सांगून सोय नाही त्यादिवशी पट्ठ्याने माझी डॉल घेतली आणि तिच सरळ सरळ पोस्टमॉर्टमच केलं.

हात, पाय,डोकं सगळे अवयव वेगवेगळे .मग काय कोणी नाही पाहून मी पण चान्स मारला अन दिल्या डोक्यात दोन टपली ठेऊन.

लागलाच की लगेच भोकाड पसरायला.उगाच मम्माला दाखवायला.तशी मम्मा पण आलीच की धावत.एरव्ही मी कितिही हाका मारल्या बोंबलले तरी मम्मा तिच काम सोडून येत नाही पण ह्या पिंट्याने भोकाड पसरलं की आलीच लगेच.
दिलान ठेऊन माझ्या पाठीत एक धपाटा वरुन मोठी बहीण अशी वागते का लहान भावाबरोबर असं म्हणत चार गोष्टी पण ऐकवल्या.

पण तुम्हाला सांगते ह्यात माझाच फायदा झाला.काय म्हणून काय विचारता.मला आज समजलं मी आता मोठी झाली आहे.म्हणजे मोठ्यांसारखं आता मला पण मिरवता येणार.
माझी कॉलर ताठ.

पण कसलं काय माझा फुगा जसा फुगला तसा फुटला देखील.काल पप्पांचे कोणी लांबचे नातेवाईक घरी आलेले.मला पाहिलं अन म्हणाले ” पहिल्यांदाच पाहतोय हिला केवढी मोठी झाली. काय गं कितवीला आहेस पहिली की दुसरीला?”

मी तोंड उघडणार इतक्यात मम्माच पटकन म्हणाली”अजून लहान आहे हो ती सिनियर केजी ला तर आहे.”
आज्जीने अजून माहितीत भर घातली ‘तिच्या पप्पावर गेली आहे न उंचीला म्हणून मोठी दिसते छकुली आमची.’

अरे हे काय? किती कन्फ्युजन करून ठेवतात ही मोठी माणसं.मम्मा अन आज्जी ला बहुतेक शाळेत difference between small and big शिकवलचं नाही माझ्यासारखं.

त्यादिवशी पुन्हा मला समजलं मी तर अजून लहानच आहे.

मम्माने मला त्यादिवशी माझी प्लेट उचलून किचन वर ठेवायला लावली.मोठी माणसे ठेवतात अगदी तशी तर आज्जी ला केवढा राग आला.” लहान आहे ग ती अजून आत्ताच कशाला कामाला लावतेस तिला ”

मम्मा किचन मधे जाऊन हळूच म्हणाली ‘तुमच्याच लाडाने बिघडलीय ती.’

आज मम्मा पोळ्या करत होती मी म्हटलं मला पण करायची आहे पोळी तुझ्यासारखी.तर मला म्हणते कशी,बेटा अजून लहान आहेस तू .लहान मुलांनी खेळायचं असतं.तू मोठी झालीस की करायचच आहे हे सगळं तुला.

या मम्माच मला काही कळतचं नाही .कधी मला लहान म्हणते तर कधी मोठी.तिच्या सोइनुसार ठरवते मी लहान आहे की मोठी.

अरे ! पण माझी किती गोची होते. लहान मुलांसारखं मुक्त बागडायचंय की मोठ्यांसारखं जबाबदारीने वागायचयं.

आता तुम्हीच माझ्या मम्माला सांगा समजावून एकदाचं काय ते ठरव म्हणावं ,” मी लहान आहे की मोठी’…….

( लेख आवडल्यास लाईक करा शेयर करा.लेखिकेच्या नावासहित….आणि हो तुमच्या प्रतिक्रिया ही नक्की द्या)

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.