मुक्त ( कविता)

Written by

मुक्त

आयुष्यात अनेक बंधन असतात….. कधी आपण स्वतः हून ती लादून घेतो, तर कधी आपल्यावर लादली जातात…… बंधनं झुगारून देत…. काही करण्याची मजा काही औरच….. प्रेम…….. जेव्हा प्रेमात अपेक्षा येतात तेव्हा त्याचेही कधी कधी बंधन होते……
अशाच बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणीचे बोल….. या कवितेतून व्यक्त झाले आहे ….

*मुक्त*
तुजपासून दूर जाता
माझ्यात मी परतत आहे
पुरे कवटाळणे दु:ख आता
तुझे नसणे मना भावत आहे

विरहगाथा गात नाही
स्वातंत्र्यगीत गात आहे
तुजसाठी झुरणे नकोच आता
प्रेमात माझ्याच मी पडत आहे

नको जीवघेणा खेळ आठवणींचा
वास्तवात मी मजेत आहे
भूतकाळात रमणे नकोच आता
भविष्याशी नाते जोडत आहे

गुंता सुटत नाही भावनांचा
दोर सारे कापत आहे
जुने सारे मागेच सोडून आता
पुढे पुढेच मी जात आहे

तुझ्यावर विसंबुन न राहता
नवा मार्ग मी चालत आहे
माझ्या क्षमतांची ओळख आता
नव्यानेच मला होत आहे

ओझे नकोच बंधनाचे
मुक्त मी आज होत आहे
माझ्याच आकाशी मी आता
गगन भरारी घेत आहे

©️ अंजली मीनानाथ धस्के
Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत