मृतदेहाची चिरफाड आणि पोटाची खळगि (सत्यकथा)

Written by

अग् बाईच्या जातीने कसं नमून रहावं. पोरींनी कसं नटून थटून घरदार सांभाळावं, चुल -मूल हे बाईचंच काम आहे. बाईच्या जातीने कसं नाजूकच रहावं तेच शोभत असतं तीला. अगदी थोड्याफार फरकाने ह्या सारखीच वाक्य हल्लीच्या प्रत्येक मुलीने कधीना कधी ऎकलेली असतात.

खरतर स्त्री म्हणजे आपली सर्वसामान्यपणे एक अशी ओळख झालीये की, जिच्या मनात दया आहे, जी नाजूक अाहे किंवा अगदी झुरळ आणि पालींना जी घाबरत असते ती म्हणजे स्त्री होय अशी साधारण व्याख्या बनली आहे, नाही का?

अरे पण जिथे स्त्री नाजूक बनते तिथेच ती कणखरही होते हे आपण का विसरतो. शांत ,सुंदर लक्ष्मी – सरस्वतीला जिथे आपण पुजतो तिथेच दुर्गा- काली लाही मानतोच की …..मग आजची स्त्री कमजोर आहे असा युक्तिवाद का असतो? ….

स्त्री नाजुक, घाबरणारी असते म्हणुन एक टिपिकल क्षेत्र सोडून ती बाकी काही करु शकत नाही असा जर गैरसमज असेल तर जरा क्षणभर थांबा आणि भेटा माझ्यासोबत ह्या आपल्या मराठमोळ्या शीतल चव्हाण ला … … नावात जरी शितलता असली तरी तिचं काम मात्र आपल्या अंगावर शहारे नक्कीच आणतील.

आता तुम्ही म्हणाल असं काय करत असेल ब्वाॅ ही पोरगी …. कुठेतरी काम करत असेल, कराटे बिरेटे खेळली असेल फार तर फार पोलीस बिलीस असेल असलच काहीतरी वाटतय ना तुम्हाला ?…….जरा थांबा देतीये ना मी तीची ओळख करून ….

अगदी बेताची परिस्थिती असलेलं एका गावातलं हे कुटुंब ज्यात शितल चा जन्म झाला. दोन वेळचे जिथे खायचे वांदे असतात तिथे बाकी गोष्टींना तर थाराच नसतो. हलाखीच्या परिस्थितीत शितलचे वडिल हे पोटाची खळगी भरण्यासाठी शवविच्छेदनाचे काम करत होते. शवाची परिक्षा करण्यासाठी शवविच्छेदन करतात. शववीच्छेदन म्हणजे, शवाची म्हणजेच मृतदेहाची आतून – बाहेरून केलेले निरीक्षण व त्यानुसार त्या मृतदेहासोबत नक्की काय झालं असेल याचा अंदाज बांधणं होय ते काम डाॅक्टर च करतात पण त्या मृतदेहाची चिरफाड करणं व नंतर त्यास आधी प्रमाणेच शिवणे हे काम डाॅक्टरांसोबतचे सहाय्यक करतात.

शितलचे वडील हे काम करायचे नंतर वयोमानामुळे त्यांना हे काम करणे जड जात होते पण पोटाची भुक कधी कमी होत असते का?…. म्हणूनच शितल वडिलांना त्या कामात मदत करु लागली. मृतदेह उचलणे, त्यांना पकडणे अशी थोडीफार कामं करणारी शितल नंतर एकटीने हे सगळं काम करू लागली. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम शितल करू लागली. घाण वाटायची, किळस वाटायची, कधीतरी तर आळ्यांनी भरलेलं शरीर आणि कधी सडलेलं ….ज्याला हात लावणं सोडा पण जवळ पण कोणी जाणार नाही अशा मृतदेहाची चिरफाड करून शितल त्यांना शिवू लागली.

जिथे भल्या – भल्या पुरूषांना हे काम करण्यासाठी व्यसनांची मदत घ्यावी लागते तिथे ही पठ्ठी शुध्दीत राहून नेटाने हे काम करते. तिलाही आधी किळस वाटायची  उलट्याही व्हायच्या पण नंतर हळूहळू तीची नजर मेली आणि जिवंत माणसांपेक्षा मृतदेह कमी भितीदायक असतात हे गणित तीला समजलं. जिथे पोटाची खळगी भरण्यासाठी कधीकाळी मजबुरीने हे काम करणारी शितल आता समाजसेवा म्हणून हे काम स्वेच्छेने करते. मृतदेहाला न्याय मिळवून देण्यात तिचाही वाटा असतो ह्याच कर्तव्यपूर्तीचा आनंद तिच्या मनाला उभारी देतो आणि ती तिचं काम जोमाने करते. कधीकधी तर सलग ४० – ४२ तास ती काम करते. मांढरदेवी, भाटघर धरण आदी ठिकाणच्या दुर्घटनांवेळीही शितलने शवविच्छेदनाचे काम केले आहे. आतापर्यंत तब्बल सहा हजार मृतदेहांचे शवविच्छेदन तिने केले आहे. असे काम करणाऱ्यांमधली महाराष्ट्रातील एकमेव महिला म्हणजे शितल होय.  


आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी तीला सन्मानित करण्यात आलय . ‘हिंदू महिला सभा, पुणे’ या संस्थेनेही शितलच्या कार्याची दखल घेऊन तीला नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात दुर्गा पुरस्कार देऊन गौरविले.

माझ्या लेखी जी फक्त रणांगण गाजवते तीच रणरागीणी नव्हे तर ती प्रत्येक स्त्री जी परिस्थितीनूसार रणरागीणी बनते. स्वतः ची वेगळी वाट शोधते आणि आलेल्या संकटाला, परिस्थितीला निडर होऊन उत्तर देते तीच खरी रणरागीणी आणि अाजच्या ह्या रणरागीणी शितल ला माझा मानाचा मुजरा…..

टिप:- पोस्ट लिहिण्यास आणि छायाचित्र साभार गुगल

©Sunita Choudhari. 

(मित्र – मैत्रीणींनो नमस्कार, आजचा लेख तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या ह्या आधुनिक रणरागीणीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा आणि हो मला फाॅलोही करा .) 

प्रतिक्रिया व्यक्त करा