मॅन वर्सेस वाइल्ड

Written by

ईश्वराच्या किंबहुना निसर्गाच्या चमत्कारिक मुशीतून मानव नावाचे अद्भुत शिल्प साकार झालेले आहे. बुद्धिमत्ता अन विचारशक्तीचा जोरावर सर्वश्रेष्ठ जीव म्हणून निसर्गाने , विज्ञानाने त्याचा गौरव केला .पानझाडांची वल्कले अंगीकृत करणारी , जंगलच्या पर्णकुटीत राहणारी मानवी जीवाची उत्पत्ती अवस्था हळूहळू उर्जितावस्था प्राप्त करू लागली. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या आयुधांचा वापर करून विलक्षण अविष्काराचा साक्षात्कार मानवी मनाला झाला.भौतिक सोयीसुविधांचा वारू उधळला गेला. जंगलातून गगनभेदी महाला पर्यंत ( सत्ताधाऱ्यांच्या भाषेत म्हटलं तर स्मार्टसिटीपर्यंत ) मानवाने भरारी मारली. परंतु उत्क्रांती , प्रगती , उत्कर्ष , उन्नती , भरभराट यांच्या जोरावर मानवी सीमारेषा पादाक्रांत करत असताना संवेदनशीलतेची आणि माणुसकीची लत्तरे वेशीवर टांगून निसर्गाच्या अधपतनाचीखोल दरी खणण्यास सुरुवात झाली .वैभवसंपन्नतेची झालर एकीकडे तर विनाश , विध्वंसाचे जाळं दुसरीकडे ..ते हि कमी होत म्हणून कि काय आता तर मुक्या जीवांच्या जीवाशी खेळण्याचा बुध्दीभ्रष्ट अघोरी प्रकार मोठ्या दिमाखात सुरु झाला आहे.. मुळातच २१ व्या शतकातून परतीचा प्रवास करून मानवाच्या उत्क्रांतीचे श्राद्ध घालण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली आहे ,याचे कारण सर्व संवेदनशील मनांना श्रुत आहे .. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आदर्श बाळगणाऱ्या पुण्यनगरी पुण्यात काही महिन्यापूर्वी कुत्र्यांचे हत्याकांड ( हो , हत्याकांडच ) घडवूंन आणले गेले ..काही ठराविक संवेदनशील मनाच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या घटनेवर प्रकाश पडला गेला.मानवी विकृतींनी मानवी मर्यादांचे उल्लंघन करताना माणुसकीचे विसर्जन केले . आणि मनात घालमेल सुरु झाली.. हे हत्याकांड , छळवणूक फक्त पुण्यापर्यंत मर्यादित राहते का ? नाही ..अर्थातच नाही..आमच्या अश्या पराक्रमांवर नजर जरी फिरवली तरी मान शरमेने झुकली जाते..वेळोवेळी आम्ही कसे आणि किती जीव ओरबाडून ठार केले याचा हिशोब लागत नाही (महत्वाचं म्हणजे आम्हाला कुणी जाब विचारत नाही )..विषारी प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन होणारे गायीचे हत्याकांड , वेगाशी स्पर्धा करताना आमच्या वाहनाखाली येऊन प्राण सोडणारे जीव , परिसरात निघालेल्या सर्पांना काठीच्या एका टोल्यात ठार मारण्याचा आमचा आवेशी पराक्रम , रासायनिक सांडपाण्यामुळे माश्यांचा पडणारा बळींचा सडा , मोकळ्या विद्युत वाहिनींना लटकून कोळसा झालेले पक्षी…अश्या कित्येक हत्याकांडाचे पाप मानवाच्या माथी लागलेले आहे..पण आमच्या कुत्सित मनांना त्याची अजूनही जाणीव नाही हि शोकांतिका आहे..मेंदू मिळून असे दुष्कर्म करण्यापेक्षा मेंदू नसण्याचे सुख अधिक असावे असेच चित्र दिसत आहे..आमच्या प्रत्येक कृतीतुन जहरी विचारांचे सातत्य दिसून येते..” विचारातील सातत्य हा गाढवाचा (गाढवी वृत्ती )गुण आहे . कोणताही विचारी माणूस आपल्या पूर्वी व्यक्त केलेल्या मताशी सातत्याच्या नावाखाली स्वतःला बांधून घेत नसतो..सातत्यपेक्षा जबाबदारी हि अधिक महत्वाची आहे .जबाबदार माणसाकडे पुनर्विचार करण्याचे आणि विचार बदलण्याचे धाडस असले पाहिजे..” अश्या शब्दात बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी वृत्तीवर सडेतोड भाष्य केले आहे आणि जोडीला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली..कोणत्याही राष्ट्राच्या , संघटनेच्या कक्षांच्या पलीकडे जाऊन निसर्गाने सर्वांना ” जगण्याचा अधिकार ” बहाल केला आहे . आणि तो नाकारण्याचे सामर्थ्य कुणातच नाही…1960 मध्ये पंडित नेहरू पंतप्रधान असताना प्राण्याच्या संरक्षणासाठी बहुचर्चित असा ” THE PREVENTION OF CRUELTY TO ANIMALS ACT ” आणण्यात आला होता. त्यातील सेक्शन ११(1) (a) ते (0) नुसार कोणत्याही जीवित प्राण्याला विषारी पदार्थ देणे किंवा क्रूरपणे छळ करणे शिक्षापात्र ठरते ..दंडसंहितेमध्ये याबद्दल सखोल मार्गदर्शन केलेले आहे. पण तरीही परिस्थिती तशीच !!..मुळात ह्या ऍक्ट मध्ये शिक्षांचे स्वरूप खूपच सौम्य आहे..खरं तर प्राण्याशी कस वागावं हे कायद्यांच्या रूपात मानवाला समजावून सांगण्याची वेळ येणं हीच नामुष्की आहे..कायदा आहे मग गुन्ह्याला शिक्षा होणार असा भाबडेपणा ठेवणं खुळचटपनाच ठरेल .कायदा कुठे आणि कसा वाकवायचा यामध्ये सर्वच जण निष्णात झालेले आहेत. त्यामुळे नाही म्हटलं तरी प्राण्यासाठीच्या अश्या कायद्यातून मानवी विकृतींना प्रतिबंध घालण्याचा प्रयन्त हा केवलीवाना आहे हे नक्की !!
भूतकाळाच्या चौकटीत अडकून जे वर्तमान अंधारात ठेवतात त्यांना त्यांचा भविष्यकाळ कधीच माफ करत नाही हे वास्तव आहे..माणसाला बुद्धिमान प्राण्याच्या चौकटीला आता न्याय द्यावा लागेल.बुरसट विचारांचे पाश तोडून एक नवीन सुरुवात करावी लागेल. ” माणुसकी हा एक विशाल समुद्र आहे .त्यात काही घाणेरडे थेम्ब पडले तरी समुद्र पूर्ण अशुद्ध होत नाही ” गांधीजींनी माणुसकिवर दाखवलेला हा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी याच मानवावर टिकून आहे..शून्यातून सुरुवात करावी लागेल..समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून समाजाच्या प्रत्येक अंगाचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल..आपल्या परिसरात प्राण्यावर किंवा निसर्गावर होणाऱ्या अमानुष अत्याचार रोखण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे..इतर प्रसारमाध्यमांनी देखील अधिक जोमाने प्राणिरक्षणासाठी आपली मोहीम उघडायला हवीय ..सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्राणिरक्षणाचा जो वसा उचलला जाईल त्यास साहाय्य करण्याची जबाबदारी आमची आहे..मोकाट प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला जागे करायला हवे. जागी झालेली जनता बघून प्रशासन अजून तत्परतेने काम करते हा आमचा इतिहास आहे. तर्कशुद्ध सद्सविवेकबुद्धीचा अवलंब करून निसर्गाचे , मानवेतर प्राण्याचे रक्षण करताना पर्यायाने आमच्याच भविष्यातील पिढीचे रक्षण करण्यासाठी माणुसकीचा वसा आम्हाला टिकवावा लागणार आहे.यातच आमच्या सर्वांचे भले सामावलेले आहे. माणुसकीचा वसा जपत असताना बदलते जग निसर्गाकडे , प्राण्यांकडे आपल्यापेक्षा अधिक वरच्या पातळीवर प्रेमाने पाहू शकेल इतकं पुढच्या पिढीचा मन मोठं करण हे आमच्या आजच्या पिढीचे कर्तव्य आहे..

Article Tags:
· · ·
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा