मेन विल बी मेन

Written by

#मेन_विल_बी_मेन

आमच्या सहजच गप्पा सुरू होत्या. नवरोबा हजारदा विचारूनही ऑफिसच्या कामांबद्दल फारस काही सांगत नव्हता . मी मात्र त्याला या आधी सांगायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टींचे बारीक सारीक तपशीलही कथन करत होते.

शेजारीच आमचे बाळराजे पुस्तक वाचण्याचे निमित्त करत आमच्या गप्पा ऐकण्यात रंगले होते.

मी सांगत होते…. ,” आई पण ना …. आईचं आहे. मी तिथल्या ( माहेरच्या) मावशींना डोळ्यासमोर ठेवून ‘ रंजना’ ही काल्पनिक कथा लिहिली होती ती त्यांनाच वाचून दाखवली. नुसती वाचून दाखवली नाही तर दोघींनीही मनसोक्त रडून घेण्याचा कार्यक्रम ही पार पडला. मला तर हे ऐकल्यानंतर त्या मावशींच्या समोर जातांना फारच अवघडल्या सारखं वाटत होतं.”

नावरोबाने त्यावर विचारले,” त्यांच्यावर कथा लिहिली … ती ऐकल्यावर त्या मावशींची काय प्रतिक्रिया होती?”

मी तपशील देत,” डोळ्यात पाणी आलं होतं रे त्यांच्या…. मला म्हंटल्या ,” ताई तुम्ही कथा लिहिली…. त्यातला एक अन् एक शब्द माझ्या मनातला वाटला. माझा भूतकाळ तर तुम्हाला मी कधी सांगितला नाही तरी एकदम खरं लिहिलं तुम्ही….. शेवट मनानी लिहिलाय तुम्ही पण देवाचा आशीर्वाद राहिला तर तसाच शेवट होईल बघा माझ्या आयुष्याच्या कहाणीचा”.

खरं तर डोळ्यातलं पाणी रोखण्याच्या नादात तोंडातून शब्द निघत नव्हते माझ्या पण आवंढा गिळून मी बोललेच ,” मावशी मी लिहाला आहे त्यापेक्षाही चांगला शेवट होईल तुमच्या कथेचा …. देव नेहमी मानवापेक्षा श्रेष्ठच निर्मिती करतो “… त्यावर मावशी भारावून बोलल्या,”

ताई तुमच्या तोंडत साखर पडो…. तुमची कथा ऐकली त्यादिवसा पासून संकटांशी सामना करण्याची हिंमत वाढली बघा माझी. तुमची कथा खरी होणार ताई … मी कष्टाला कमी पडणार नाही. माझ्या तिन्ही पोरांनाही तुमची कथा वाचून दाखवली ताई मी , माझ्या दोन्ही मुली तर मला बोलल्याही ,” आई काळजी करू नको आपण आपली कथा खरी करू”…. तुमच्याघरच्यांसारखी … तुमच्यासारखी माणसं पाठीशी आहेत म्हंटल्यावर माझ्या आयुष्याचा शेवट चांगलाच होणार याची खात्री आहे मला ” .

आपल्या शब्दांनी एखाद्याला लढण्याची हिंमत मिळावी या भावनेने मी नवरोबला हा प्रसंग सांगताना भावूक झाले होते.

तेवढ्यात आमच्या बाळराजेंनी बोलण्यात सहभाग घेतला,” मम्मी ….. तू लिहिलं त्याप्रमाणे जर त्यांच्या आयुष्यात घडलं तर तू ‘ वाल्मिकी’ च होशील”.

मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं तसं त्याने स्पष्टीकरण दिले,” वाल्मिकींनी आधी रामायण लिहिलं मग ते तसं घडलं आहे … असं आजीने मागे एकदा सांगितले होते… त्याअर्थी तू वाल्मिकी होशील असं मी म्हणतो आहे .”

त्याच्या या स्पष्टीकरणावर मी संभ्रमित झाले होते … काय बोलावं हा विचारच करत होते.

तेवढ्यात नवरोबाने त्याचे अमूल्य शब्द खर्ची घातले ,” तुझं म्हणणं बरोबर आहे बेटा …. मम्मीची कथा खरी झाली तर ती तेव्हा नक्कीच वाल्मिकी ठरेल पण…… सध्या ती ‘वाल्या ‘ बनून आपल्याला छळत असते त्याचं काय ?”

वडिलांचं म्हणणं शंभर टक्के खरं असल्याची खात्री पटली म्हणून की काय बाळराजे हसू दाबत तिरप्या नजरेने माझ्याकडे बघत होते.

या दोघांपुढे रडून काही उपयोग नाही याची जाणीव होवून मीही त्यांच्या हसण्यात सामील झाले.

©️ अंजली मीनानाथ धस्के

( टिपः ‘ रंजना’ या कथेला वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. माझं लिखाण आवडल्यास शेयर करावसं वाटलं तर नावासहितच करा ही नम्र विनंती

http://anjali-rangoli.blogspot.com/2019/10/blog-post.html?m=1 )

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.