मोहर ( संपूर्ण )

Written by
  • 2 आठवडे ago

मोहर

( 1940 च्या आसपास चा काळ ) सकाळची वेळ गार वारा सुटला होता. सर्व शरणपूर गाव झोपेच्या कुशीतून जाग होत होतं. पाखरं किलबिलाट करून अरुण देवाचं स्वागत करत होते. गाई -म्हशी, वासरं रानावर जाण्यासाठी सज्ज होत होते.घराघरातून चुलीवर भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा खरपूस वास दरवळत होता. शांत आणि मनमोहक वातावरण होत. गावातल्या अश्याच एका मोडकळीला आलेल्या वाड्यात शिव आपल्या आई -वडील आणि 7 भावंडांसोबत राहत होता. पूर्वी या वाड्यात वैभव होतं, लक्ष्मी पाणी भरत होती, पण मागील काही पिढयांपासून वाड्याला आणि वाड्याच्या वैभवाला उतरती कळा लागली होती. जेमतेम शेती उरली होती आणि त्यातूनच कसबस घर चालत होतं. शिव जेमतेम 20-22 वर्षांचा आणि घरातला थोरला मुलगा होता.

शिवचे बाबा – शिव आज जाऊन रान वाढलंय शेतात, ते काढून टाक आणि जमीन मोकळी कराय घे. पाऊस सुरु होण्या अगुदर जमीन मोकळी करून घेतलेली बरी.

शिव – बरं हाय बा, आज कराय घेतो काम हाती.

शिवची आई – लेकरा भाकरी खाऊन जा म्हंजी तुला बि काम कराय ताकूद येल.

शिव – व्हय माय.

शिव न्याहारी करून शेतावर जातो. शेतावर पोहचल्यावर संपूर्ण शेतावर नजर मारत कामाची आणि कामासाठी लागणाऱ्या वेळेची आखणी करत होता. हा विचार करतच तो शेतातल्या विहिरीजवळ जाऊन विहिरीतून पाणी काढतो आणि पाणी पितो, पाणी तोंडावर मारून तरतरीत होतो. शेतात वाढलेलं गवत काढताना बराच वेळ होतो. घामाघूम झालेला शिव काम करत असताना त्याची लहान बहीण दुपारचं जेवण घेऊन येते.

बहीण – भाऊ अरे ये भाऊ भाकर आणली बघ खाऊन घे. ( मोठ्याने आवाज देत शेतात येते. )

शिव – व्हय खातू नंतर, तू ठेऊन जाय.

शिवची बहीण भाकरीची दुरडी विहिरीजवळच्या झाडाजवळ ठेऊन निघून जाते. दुपार ओसरताना पूर्ण शेतातलं गवत काढून होतं आणि तो जेवायला बसतो. जेवत असताना आज जमीन जमेल तेवढी मोकळी करायची हा विचार करत होता.
जेवण करून शिव जमीन खणायला सुरुवात करतो. खोदताना तो कधी विहिरीजवळ आला आणि विहिरीजवळ खोदु लागला ते कळलंच नाही. लक्षात आल्यावर शिव दुसरीकडे काम करायला जाणार तोच त्याच्या मनात विचार आला की विहिरीजवळ खोदून इथे पण जमीन व्यवस्थित करून घेऊ. विहिरीजवळ खोदत असताना संध्याकाळी कधी झाली ते त्याला कळलंच नाही. अश्यातच खोदताना टगगगगगगगग असा आवाज झाला आणि संध्याकाळी गडद रात्र जाणवू लागली. ढग गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. शिव दचकला आणि विचार करू लागला अजून पाऊस सुरु व्हयला अवकाश असताना ढग गडगडाट करतायत आणि विजा चमकतायत..? त्याने आवाज आला होता तिथे हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली. माती जसं जसं बाजूला करत होता तसं तसं गडगडाट वाढत होता आणि ही गोष्ट शीवच्या लक्षात आली. माती बाजूला झाल्यावर त्याखाली त्याला एक लोखंडी पेटी दिसली. त्याने त्याला स्पर्श करून माती बाजूला करू लागला तसं त्याच्या हाताला झटका बसावा असं काहीसं झालं. शिव धीट होता त्यामुळे पुन्हा त्याने त्या पेटीला स्पर्श केला यावेळी मात्र असं झालं नाही. त्याने ती पेटी स्वच्छ केली आणि घरी नेऊ लागला. शेतातून बाहेर पाय ठेवताच सर्व सामान्य झालं, जणू वारा, गडगडाट, विजा चमकणे असं काही झालंच नव्हतं.
शिव आनंदच घरी परत येतो. त्याला कुठे तरी असं वाटत होतं की यात नक्कीच खजाना असणार. कोणालाही काहीही न सांगता तो ती पेटी वाड्यात वर अडगळीच्या खोलीत ठेवतो. मध्यरात्री तो सर्व झोपल्यावर वर अडगळीच्या खोलीत येतो आणि ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच प्रयत्नानंतर ती पेटी उघडते. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यात खजाना असायला हवा होता, पण त्यात एक लाल रंगाचं कापड होतं तेही गंड्या- दोऱ्यानी बांधलेलं.
शिवाने ते कापड उघडतो त्यात त्याला एक मोहर दिसते. एवढ्या मोठ्या पेटी मध्ये एकच मोहर पाहून त्याचा हिरमोड होतो. मोहर हातात घेताच तिथे मोगऱ्याचा सुगंध पसरतो आणि वातावरण धुंद होतं. मोहर जुनी असली तरी सोन्या चांदीची नसून तांब्याची होती. त्यामुळे ती तिथेच ठेऊन तो खाली येऊन झोपतो.
येणारी सकाळ त्याच्यासाठी नवीन संकटं घेऊन येणार आहेत याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती.

सकाळी जाग आली तेव्हा शिवाचं अंग खूपच दुखत होतं , खूप अशक्तपणाही जाणवत होता. असं वाटत होतं जसं त्याच्या अंगातून थोडं रक्त कोणीतरी शोषून घेतलंय. पण पाऊस सुरु होण्याआधी शेत मोकळ करायचं होतं. म्हणून इच्छा नसताना सुद्धा तो शेतावर निघाला. आज कालपेक्षा जास्त वेळ लागत होता काम करायला. दुपारी त्याची बहीण जेवण घेऊन आली. शिवाकडे बघून तिला वाटलं त्याची तबियत बरी नाही.

बहीण : काय रं दादा , काय झालंय ? चेहरा पडल्यासारखा वाटुया ? बरं नाय वाटतं का ?

शिवा : हो गं राधे. आज अंग खूप दुखत हाय बग .

बहीण : मग राहूदे काम उद्या कर .
शिवा : नाय गं . आज उद्या २ दिवसात काम पूर्ण होईल . मग थांबायच कशाला ? एवढा पण आजारी नाय म्या .
बहीण : बरं मग मी मदत करू का ?
शिवा : नको , तू घरी जा ?
बहीण : बरं . …… पण लवकर घरी ये .
शिवा : ह्म्म्म ………..

( शिवाची बहीण घरी जाते. शिवा जमेल तसं काम करत होता. संध्याकाळी तो घरी जायला निघाला आणि कालसारखं वातावरण दिसू लागला. शिव विचार करू लागला काल ती मोहर सापडल्यापासून काहीतरी विचित्र होतंय. नक्की काय प्रकार आहे ते पाहिलं पाहिजे. )

शिवा : आई आलो गं. असलं ते वाढ.
आई : व्हय लेकरा बस गरमगरम वाढते . अन काय रं राधा सांगत व्हती तुला बरं वाटत नाय म्हणून.
शिवा : फकस्त थोडं अंग दुखतंय बस बाकी कायनाय.
( एव्हडं बोलून त्याने विषय संपवला. त्याने आज रात्री मोहर पुन्हा नीट पाहायची हे पक्कं केलं .)
रात्री सर्व झोपी गेल्यावर शिवा अडगळीच्या खोलीत येतो आणि ती मोहर हातात घेऊन निरखून पाहू लागतो, तो दोन बोटांच्या मध्ये पकडून घासून हि पाहातो नंतर त्याच्या लक्षात येतं मोगऱ्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता. पण अचानक ते धुंद वातावरण बदलू लागलं. मोगऱ्याचा सुगंध खूपच वाढला अगदी सहन करण्यापलीकडे होऊ लागले. आणि त्यानंतर त्याला कोणीतरी चाबकाचे फटके मारताय असं वाटू लागलं. त्याला सर्वत्र आता रक्त दिसू लागलं आणि त्याच्या वेदना वाढू लागल्या. कोणीतरी तोंड दाबून ठेवल्यासारखं वाटत होतं म्हणून ओरडताही येतं नव्हतं. हा प्रकार कोण्या कमकुवत माणसासोबत घडलं असतं तर हृदयविकाराच्या धक्याने मेला असता. पण शिवा धाडसी असल्यामुळे अजून जिवंत होता. पण होणारा त्रास तो सहन करू शकला नाही आणि बेशुद्ध झाला. त्याला दुसऱ्यादिवशी दुपारी जाग आली तेव्हा तो दुसऱ्या खोलीत होता आणि आजूबाजूला घरचे आणि शेजारीपाजारी होते. सकाळी तो जागेवर नव्हता म्हणून शोधाशोध केल्यावर तो अडगळीच्या खोलीत सापडला त्याच्या अंगावर चाबकाच्या फटक्याचे वण होते, बेशुद्धावस्थेत सर्वानी उचलून त्याला दुसऱ्या खोलीत आणलं होतं.
शुद्धीत आल्यावरही त्याला नीट बोलता येत नव्हतं. वडिलांनी विचारल्यावर मोहर सोडून बाकी सर्व रात्री घडलेलं सांगितले. शेजारी राहणाऱ्या रामा आजोबांनी शिवाच्या वडिलांना सांगितलं ,,
रामा आजोबा : रघु ( रघुनाथ ) मला हे प्रकरण बरोबर वाटत नाय. एक काम कर इथून ८ गाव सोडलं कि एक गाव लागेल शेवरी नावाचं तिथे एक वैद्य राहतात ८५ च्या वर वय आहे बघ त्याचं, पैलकर वैद्य म्हणून हाताला गुण असा आहे कि आजूबाजूच्या ५० गावात कोणाच्या नाही. आणि त्यांना बाहेरच काही असेल तर ते पण कळत. मी लहान असताना मावशीकडे राहायला होतो तेव्हा मावशीच्या मुलाला बाधा झाली होती तेव्हा त्यांनीच मदत केली होती. तेव्हा तरुण होते पण आता या वयात त्यांना जमेल का बघ यायला.
रघुनाथ: पण बाबा आता ते आहेत पण का नाही तर ………….
रामा आजोबा : मी १५ दिवसांपूर्वी तेथून आलोय आहेत अजू न . पण वय ………………. ते जर आले तर तुज्या मुलाला काहीही होणार नाही.
रघुनाथ : पण बाबा ८ गाव सोडून जायच म्हणजे ३ दिवस जायला अन ३ दिवस यायला लागतील. पोराला असं टाकून कसा जाऊ ?
रामा आजोबा : अरे मी सारखा एवढा मोठा प्रवास नाही करू शकत , तेव्हा तुलाच जावं लागेल आणि आता ते आणि तू येई पर्यंत देवच पाहिलं. मी पण आहेच. तेव्हा तू उद्याच निघ.
रघुनाथ : उद्या नाय आताच निघतो. रमे भाकरी बांध माझी. जेवढ्या लवकर जाईन तेवढ्या लवकर त्यांना घेऊन येता येईल.

रघुनाथ निघाले मजल दरमजल करत. पण इकडे शिवाची तबियत अजून बिघडत होती. रोज हळूहळू त्याची तबियत खालावत होती. त्याला त्या रात्री आलेला अनुभव रोज रात्री येई. असहाय्य मोगऱ्याचा सुगंध, चाबकाचे फटके. त्याला आता हे सर्व असहाय्य होऊ लागलं होतं. आणि आता त्याच्या मनात जीव देण्याचे विचार येऊ लागले होते पण एक आशा होती वडील आल्यावर बरं होण्याची म्हणून अजून तग धरून होता.
तिकडे ३ दिवसांनी रघुनाथ शेवरीला पोहचले. पैलकर वैद्यांचा पत्ता विचारात विचारात त्यांच्या दाराशी येऊन उभे राहिले, आवाज दिला. एका लहान मुलाने त्यांना आता घेतलं पाणी दिलं आणि आजोबांना बोलावतो म्हणून गेला. थोड्या वेळात वैद्य येतात त्यांना पाहून त्यांचा अनुभव काय असेल याचा अंदाज लावता येत होता. एवढं वय असूनही तरतरीत, चेहऱ्यावर तेज. शिवाच्या वडिलांनी सर्व हकीकत सांगितली आणि पाय पकडून माझ्यासोबत चला म्हणून आर्जवे करू लागले. त्यांची ती अवस्था पाहून पैलकर वैद्य त्यांच्यासोबत यायला तयार झाले.
शिवाला आता रात्रीची भीती वाढत होती. आई , बहिणी , भाऊ फक्त रडू शकत होते .ते परिस्तिथी समोर हतबल होते. पुढील ३ दिवस परतीचा प्रवास चालू राहिला. रघुनाथला मुलाला कधी पाहतोय असं झालं होतं. घरी पोहचल्या पोहचल्या रघुनाथने मुलाकडे धाव घेतली पण पैलकर वैद्य मात्र उंबऱ्याजवळच थांबले होते. त्यांना काहीतरी अनिष्ट आहे आणि बलवान आहे याची जाणीव झाली होती …………………

( ६ दिवसांचा प्रवास करून रघुनाथ पैलकर वैद्यांना घेऊन येतात. आणि घरी पोहचल्या पोहचल्या मुलाला बघायला आत धाव घेतात. पण पैलकर वैद्य मात्र उंबऱ्याजवळच थांबतात. )

पैलकर वैद्यांना असं दारातच थांबलेलं पाहून रघुनाथ विचारतो : काय झालं वैद्य बाबा ? असं दारात का उभं ?

वैद्य : काही नाही . ( असे म्हणून ते आत येतात आणि दोघेही शिवाच्या खोलीत येतात. येऊन बघतात तर त्याच्या शरीराची फक्त हाड दिसत होती या ६/ ७ दिवसात त्याची एवढी तबियत खालावली होती. )

रमा ( शिवाची आई ) : बाबा काय पण करा पण माझ्या लेकराला बरं करा . ( वैद्याचे पाय पकडत. )

वैद्य : माझ्याकडून जे होईल ते मी नक्की करेन. ( शिवाच्या आईला उठवत. )

पैलकर वैद्य येऊन शिवजवळ बसतात आणि शिवाला विचारतात : शिवा बाळा मला सगळं नीट , सुरुवातीपासून आणि खरं खरं सांग .

रघुनाथ: वैद्य बाबा, मी आपल्याला भेटल्या भेटल्या सर्व सांगितलं होतं मग परत का विचारताय ?

वैद्य : कसं आहे ना रघुनाथ त्याने सांगितलं ते अर्ध सांगितलं आता पूर्ण सांग .

रघुनाथ : म्हणजे शिवा तुझ्या हातून काही चुकीचं तर नाही ना घडलं ?

शिवा : नाही बाबा . ( घाबरून आणि क्षीण आवाजात.)

वैद्य : शिवा मी असं नाही म्हणत की तू काही चुकीचं केलंयस पण तू पूर्ण सांगितलं नाहीयेस. ते तू पूर्ण सांग म्हणजे मला नीट उपचार करता येतील.

शिवाला वैद्यच बोलणं ऐकून धीर येतो आणि तो घटनाक्रम सांगू लागतो. मोहर मिळाल्यापासून ते त्यामुळे होणाऱ्या त्रासपर्यंत सर्व काही शिव सांगतो.

वैद्य : मला घराच्या उंबऱ्याजवळ आल्यावरच कळलं होतं काहीतरी चुकीचं घडलं असणार. असो , मला सांग आता ती मोहर कुठे आहे ?

शिवा : अडगळीच्या खोलीत आहे.

वैद्य : रघु एक काम कर विहिरावर जाऊन ताज पाणी घेऊन ये.

रघुनाथ विहिरीवरून पाणी घेऊन येतात. सर्वाना खालीच थांबायला सांगतात आणि ते पाणी कलशात घेऊन काही मंत्र पुटपुटत वैद्य त्या अडगळीच्या खोलीत प्रवेश करतात. थोडं शोधल्यावर वैद्यांना ती मोहर सापडते. ते अभिमंत्रित पाणी त्या मोहरवर टाकून एका लाल रंगच्या कापडात बांधतात, आणि ती तिथेच ठेऊन खाली येतात. सर्वजण या मोहरबद्दलच विचार करत असतात. वैद्य खाली आलेले पाहून सर्वजण प्रश्नार्थक नजरेने पाहतात. वैद्य खाली येऊन बसतात आणि बोलू लागतात.

वैद्य : रघु , शिवा म्हणल्याप्रमाणे त्याला ती मोहर विहिरीजवळ खणताना मिळाली. तुला काही माहित आहे का त्याबद्दल ?

रघुनाथ : नाही वैद्य बाबा. काहीच माहित नाही आणि विहीर शेताच्या कोपऱ्यात असल्यामुळे तिथं कधी खोदकाम झालंच नव्हतं.

वैद्य : पण ती मिळाली त्याला तुमच्याच शेतात ना ?

रघुनाथ : होय …

वैद्य : म्हणजे तुमच्या घरचा काही न काही तरी संबंध असणारच ना .

( रघुनाथला नक्की काय चालू आहे तेच कळत नसतं. तो आपल्या घराचा आणि त्या मोहरचा काय संबंध यांचा विचार करत असताना वैद्य पुन्हा बोलतात.)

वैद्य : हे बघ जर काही माहित असेल तर आतच सांग कारण हे प्रकरण फक्त आजारपणाचं नाहीय.

रघू : म्हणजे ???

वैद्य : म्हणजे बाहेरची बाधा आहे त्याला आणि ताकतवान पण आहे. आता सकाळ आहे आणि या वेळेत वाईट शक्ती कमजोर असतात म्हणून मी सहज ती मोहर बांधून ठेवली आहे पण फक्त ३ दिवस ती शक्ती बांधून राहील कारण चौथ्या दिवशी अमावस्या आहे, त्यावेळी ती शक्ती खूप ताकातवर होईल आणि मी घातलेलं बंधन सहज तोडून टाकेल. अश्या शक्ती जीव घेतल्याशिवाय शांत बसत नाही म्हणून म्हणतोय काही माहित असेल तर सांग कारण जो पर्यंत रोगच माहित नसेल तर उपचार काय करणार ?

रघुनाथ : ( रडव्या सुरात ) वैद्य बाबा मला खरंच काही माहित नाही पण पाया पडतो तुमच्या माझ्या पोराला वाचवा . त्यासाठी वाटेल ते करेन मी.

वैद्य: बरं मला सांग हा वाडा खूपच मोठा आणि वैभव संपन्न असेल कधी असं वाटतंय पण आता याची रयाच गेल्यासारखी वाटतेय असं का ?

रघुनाथ : बाबा फार पूर्वी आमचं घर जमीनदारांचं होतं. पैसा , वैभव सारं होतं पण काही पिढ्यांपासून ही उतरती कळा लागली. आबा आणि आजोबांपासून ऐकून आहे मी . पण का ते माहित नाही. कधी काळीचे जमानदार आज २ वेळ पोटभर जेवणासाठी वणवण करताय.

वैद्य : बरं हा पूर्ण वाडा वापरात आहे का ? आणि या आधी कधी असं घरात कोणाला काही जाणवलं होतं का ?

रघुनाथ : नाही हा वाडा पूर्ण नाही वापरात आम्ही कारण एवढी जागा नाही लागत त्यात पूर्ण वाडा वापरला तर मशाली , दिवे एवढे जाळावे लागतील आणि देखरेख सर्वच मग उगाच पैसा का वाया घालावा म्हणून आम्ही आधीपासूनच म्हणजे आजोबा होते तेव्हा पासूनच जवळजवळ अर्धाच वाडा वापरतो.

वैद्य : बरं , किती साधारणतः खोल्या बंद असतील ?

रघुनाथ : तरी ८ एक खोल्या बंद आहे.

वैद्य : एक काम करूयात एक एक करून आपण सर्व खोली पाहुयात. कुठं तरी काही तरी मिळेल. आणि कदाचित त्यावरून आपल्या दिशा मिळेल.

रघुनाथ आणि पैलकर वैद्य एक एक खोली निरखून पाहू लागले. ३/ ४ खोल्या पाहिल्यानंतर ते एका खोलीत प्रवेश करतात. ती खोली कधीकाळी लेखी कामकाजासाठी वापरात होती असं वाटत होतं. लाकडी कपाटे, शाईचे दौत, खलिते, पत्रे असे बरेचसे साहित्य त्यात होते. एक एक कागद ते चाळू लागले. थोड्या वेळाने एक खलिता उघडला त्यातला मजकूर होता .

मा. श्री. पैलकर वैद्य यांस,

शिर साष्टांग दंडवत,

पत्र लिहिण्यास कारण की………………………………………………………………………………………………………………..

हे पत्र वाचताना दोघांनाही काही तरी जुनी घडामोड आज समोर येणार हे कळलं आणि ते एकमेकांकडे पाहू लागले.

मा. श्री. पैलकर वैद्य यांस, दिनांक: ०४.०९.१८३४

शिर साष्टांग दंडवत,

पत्र लिहिण्यास कारण की, आज ९ दिवस झालेत खंगत चाललो आहे. सर्व वैद्य / हकीम, मांत्रिक सर्व करून झालं आहे. काहीच फरक पडत नाहीये. तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे. तुम्हीच मला आणि माझ्या घराला या सर्वातून वाचवू शकता. कृपा करा वैद्य बाबा पण मला वाचवा. ती मला सोडणार नाही. काहीही करून वाचवा.

माधवराव मोहिते.

पत्र वाचून रघुनाथ ला धक्का बसतो. पैलकर वैद्य बोलू लागतात ….

पैलकर वैद्य : रघु, याचा अर्थ माझ्या पूर्वजांना तुझ्या पूर्वजांनी बोलावलं होतं मदतीसाठी. पण प्रश्न असा आहे की, हे पत्र तर इथेच आहे मग माझ्या पूर्वजांपर्यंत निरोप कसा गेला ? गेला की नाही ? आणि पत्रात उल्लेख असलेली ती कोण ???

रघुनाथ: वैद्य बाबा, अहो मला काहीच माहित नाही. मलाच हे सर्व आताच कळतंय, हे पत्र वाचल्यावर.

पैलकर वैद्य : रघु, आपल्याला असं बसून चालणार नाही. माहित नाही तर माहित करून घ्यायला हवं. एक काम करुया पुन्हा हि खोली शोधू. काहीतरी सापडेल.

दोघेही खोली धुंडाळतात. बराचवेळ शोधाशोध केल्यावर एक वही लागते. जवळजवळ १०० वर्ष जुनी वही असल्यामुळे पाने बरीच फाटलेली, आणि शाईही फिकट पडत चालली होती. पाने व्यवस्थित करून दोघेही वाचू लागतात.

मी सोमनाथ मोहिते,

आबांनी तातडीची तार पाठवून मला सुरतेहून बोलावून घेतलं. आबासाहेब मोहिते माझे वडील, मला ५ भाऊ आणि ३ बहिणी सर्वमिळून ९ जण आम्ही. लहानपणीच सर्वांची लग्न झाल्यामुळे बहिणी सर्व सासरी. असं असताना आबांनी मला तातडीने यायला का सांगितलं कळलं नाही. पण आबांनी बोलावलंय म्हणजे तातडीचं असणार म्हणून सौ. ना सोबत घेऊनच निघालो. गावी पोहचायला २५ दिवस गेले. पोहचतो तो समोर सुतकी वातावरण पाहून छातीच दडपली. दरवाजातून आत आलो तसं आई- आबा मला घट्ट पकडून रडू लागले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली. माझे दोन थोरले भाऊ आता या जगात नव्हते. वाहिनी आणि आई आबा यांनी मला पाहून हंबरडा फोडला. मला नक्की काय प्रकार चालू आहे कळतंच नव्हतं. माझ्यापेक्षा मोठा भाऊ माधवराव पण अंथरुणाला खिळून होता. रात्री मी आणि आबा बसलो तेव्हा मी विचारलं.

सोमनाथ : आबा, हे सर्व कसं झालं ?

आबा : त्या मोहरमुळे …..आणि आपल्या कर्मांमुळे ………

सोमनाथ : मोहर ? कुठली मोहर ? आणि कसले कर्म ? आबा सर्व नीट आणि सविस्तर सांगा मला .

आबा : आपलं घराणं आधीपासूनच अब्रुदार आणि कर्मकांड जपणार. माझ्या हातात कारभार होता तो पर्यंत मी तो योग्य प्रकारे जपलं. पण नंतर मी सर्व कारभार तुझ्या मोठ्या भावांच्या हाती सोपवला आणि त्यानंतर तुझ्या भावांनी त्यांच्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. इंग्रज, मुगल व्यापारी, पोर्तुगीज सर्वांशी संधान बांधलं. त्याच्या सारखं वागू लागले. तू सुरतेमध्ये तुझ्या कामात होतास. पुढे पुढे ते बायका नाचवू लागले. गरीब लोकांना लुबाडू लागले. मी बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण आता ते माझ्या ऐकण्यात राहणाऱ्यातले नव्हते. एकदा तुझे २ भाऊ बाहेर गावी गेले होते. २५ -३० दिवसांनी परत आले तेव्हा सोबत एक १५ -१६ वर्षांची मुलगी होती. विचारल्यावर म्हणले की तिला त्यांनी विकत घेतलं होतं. तिच्याच दारूच्या आहारी गेलेल्या नवऱ्याने फक्त १ तांब्याच्या मोहरमध्ये तिला विकलं होतं. तिच्या डोळ्यांमध्ये वेदना स्पष्ट दिसत होत्या. कदाचित तुझ्या भावांनी वाटेत तिच्यासोबत बळजबरी केली होती आणि ती ऐकत नसल्यामुळे हाणमार ही केली होती. तिच्या रक्त वाहणाऱ्या ताज्या जखमांवरून ते कळत होतं. ती मला पाहून माझ्या पायांवर येऊन पडली आणि मला जाऊ द्या म्हणून याचना करू लागली. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला जुमानलं नाही. तिला वर अडगळीच्या खोलीत डांबून ठेवलं. जेव्हा मनात येईल तेव्हा ते त्या खोलीत जायचे आणि त्यानंतर तिथून फक्त रडण्याचे, किंचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज यायचे. आवाजावरूनच तिला काय त्रास होतं असेल याची जाणीव होत होती. हा प्रकार बरेच दिवस चालला. एकदा तुझा मोठा भाऊ तिच्या खोलीत गेल्यावर जोरजोरात भांडण्याचा आवाज येऊ लागला. सोसून झिजली होती ती खूप त्रास होत होता तिला. तो तिच्यावर हात टाकणार तोच तिने विरोध केला. बाहेरूनच येताना राग घेऊन आला होता तो. तिच्या नाही बोलण्यामुळे अजूनच चिढला आणि चाबकाने तिला मारू लागला. तिला फरपटू लागला, तिचं डोकं भिंतीवर आपटू लागला. आवाज नेहमीपेक्षा जास्त वाढल्यावर मी वर गेलो आणि त्याला बाजूला केलं. तो रागात ४ शिव्या देऊन “मी परत येईन तेव्हा तुझा नकार ऐकणार नाही” असं म्हणून खाली गेला. ती माझ्याकडे आशेने पाहू लागली आणि मला यातून बाहेर काढा म्हणून याचना करू लागली. मी माझ्या वयामुळे आणि कारभार मुलांकडे सोपवल्यामुळे एकप्रकारे अधू झालो होतो. तिची याचना चालूच होती कि तुझे दोन्ही भाऊ आले, आणि तिला असं सोडवण्यासाठी याचना करताना पाहून खूपच संतापले. तिला त्या बिचाऱ्या १५-१६ वर्षाच्या मुलीला गुरासारखं मारत होते. ते पाहून मी मध्ये पडलो तर मला बाजूला ढकलून दिलं त्यांनी. आणि मारताना तिला बोलू लागले, ” तूला फुकट नाही आणलं. १ मोहर मोजली आहे तूझ्या नवऱ्याला. ” त्यावर ती म्हणाली, ” माझ्या आयुष्याची किंमत फक्त १ तांब्याची मोहर आहे ? ” माधवराव-” हो, मग तू कुठली राजकन्या आहेस? तुझी किंमत यापेक्षा जास्त असायला?” आधीच नवऱ्याने केलेला विश्वासघात, त्यात दिवसंदिवस वाढणारा अत्याचार आणि त्याही पेक्षा १ तांब्याच्या मोहर मध्ये तिचा झालेला व्यवहार. या सगळ्यांचा राग, संताप आणि असह्यपणाही तिच्या डोळ्यांमध्ये आता स्पष्ट दिसत होता. सतत होणाऱ्या जाचाला कंटाळी होती ती, आणि आता या सगळ्यातून सुटकाही होणार नाही हे सुद्धा कळून चुकलं होतं. स्वतःच्या असह्यपणा वर तिला अजूनच राग येत होता. तिने फार मोठा निर्णय घेतला आणि दोघांना ढकलून तिने फळांच्या तबकाला सुरा उचलून स्वतःच्या पोटात खुपसून घेतला. आणि मारताना बोलून गेली, ” माझी किंमत १ मोहर लावलीत ना तुम्ही? आणि हीच माझी किंमत म्हणालात ना ? आता मी सांगेन माझी किंमत काय आहे ते ? आणि ती किंमत तुम्हाला परवडणारी नसेल. तरीही मी सर्व वसूल करणारच. ” एवढं बोलून तिने जीव सोडला. तुझ्या भावांनी हे गंभीरपणे घेतलं नाही. आणि तिला रात्री जंगलात नेऊन जाळून टाकलं, ना कोणते संस्कार, ना कोणते दिवस आणि पिंडदान. मोठी ओळख असल्यामुळे प्रकरण दाबलं. सर्व सामान्य वाटत होतं. तरी माझ्या मनात भीती होती, ती जे मारताना बोलली होती त्यामुळे.

साधारण ३ महिन्यांनी, एक दिवस अचानक तिचा नवरा घरी आला आणि त्याच्या हातात १ तांब्याची मोहर होती. त्याला पाहून तो कधीही मरेल हे स्पष्ट कळत होतं. पूर्ण शरीर खंगल होतं. माधवलाच्या हातावर त्याने ती मोहर ठेवली आणि त्याच्या समोरच धाडकन खाली पडला. त्याचा जीव गेला होता. तुझ्या भावांनी त्याची पण विल्हेवाट लावली आणि जसं काही झालंच नाही असे वागू लागले. माझ्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली, ” ही तीच तर मोहर नाही ना ? ” दुसर्यांदिवशी माधवला खूप अशक्तपणा जाणवू लागला. पण साधारण असेल म्हणून सोडलं त्याने. त्यादिवसापासून रोज त्यांच शरीर खचत होते. बाहेरही पडणं मुश्किल झालं होतं त्याचं. सर्व वैद्य, हकीम इतकंच कशाला डॉक्टर ही झाले. उतार मात्र पडत नव्हता.”

तुझा दुसरा भाऊ कामासाठी बाहेर एकटा जाऊ लागला. एकदा ४ दिवसांनी तो परत आला. आणि माधवाकडे घाईत माधवच्या खोलीकडे जाऊ लागला. मला शंका आली म्हणून मी त्याच्या मागे गेलो. तो माधवला सांगत होता, ” दादा बहुतेक तुझ्या आजारच कारण ती मोहरचं आहे.” हे ऐकून बाहेर माझ्या आणि आत माधवच्या काळजाचं पाणी झालं. तो पुढे सांगू लागला, ” मी बाजारात काही खरेदी -विक्री साठी किंमती काढत फिरत होतो तेवढा कळलं की त्या भागात या ३ महिन्यात जवळजवळ ४ -५ जण मेले. अगदी तू खंगत आहेस तसेच खंगून मेले. नंतर कळलं की १ तांब्याची मोहर आहे, ती मोहर ज्याच्याकडे जाईल त्याचा जीव जात होता. त्यानंतर मरणाऱ्याच्या घरच्या लोकांनी मिळून त्या मोहरीच्या मालकाला शोधून काढलं आणि ती मोहर त्याला परत केली. तो एक दारुडा होतो असं चौकशीतून कळलं मला नंतर. बरं ही मोहर फेकू ही शकत नाही कारण जे शेवटचा त्याचा मालक असेल, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास होतोच, त्यात जर फेकल्यावर ती सापडली नाही तर पूर्ण घर उध्वस्त. एकाने हा प्रयन्त केला होता घरच्या मागच्या रानात फेकली होती. त्यानंतर त्याच्या पूर्ण घराला त्रास होऊ लागला. त्याने ती शोधून आणली परत आणि मूळ मालक शोधाची माहीम हाती घेतली. पण मूळ मालक मिळे पर्यंत २ जण गेले त्याच्या घरातले.” हे ऐकून माधवची पाचावर धारण बसली. ती तिची किंमत सांगत होती. आणि खरंच ती तुझ्या भावांना परवडणारी नव्हती. आणि तरीही ती मात्र पुरेपूर वसूल करत होती.

त्यानंतर तुझ्या दुसऱ्या भावालाही त्रास होऊ लागला. तो ही खंगू लागला. जीव वाचवण्याचा दोघेही प्रयत्न करू लागले. कोण काय सांगेल ते करू लागले पण मात्रा लागू पडत नव्हती. माधवला भेटायला आलेल्या त्याच्या एका मित्राने त्याला पैलकर वैद्यांबद्दल सांगितलं. माधवने त्यांना रात्री पत्र लिहिलं आणि सकाळी पाठवणार होता. पण त्याने सकाळ पाहिलीच नाही. हे सर्व झाल्यावर दुःखात ते पत्र पाठ्वण्याबद्दल सुचलंही नाही. ८ दिवसांनी तू दुसऱ्या भावाचा त्रास वाढल्यावर मी माधवच्या मित्राकडून पत्ता घेऊन पैलकर वैद्यांना पत्र पाठवून बोलावून घेतलं. आणि २ दिवसांनी तूला पत्र पाठवलं.

इकडे पैलकर वैद्य येण्याच्या एक दिवस आधीच तुझ्या भावाने प्राण सोडले. वैद्य घरी आले त्यांना आधीच काहीतरी जाणवलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. जे हा खेळ थांबवेल अशी ग्वाही देतं होतं. त्यांना मी सर्व सविस्तर सांगितलं. त्यांनी तूला बोलवायला सांगितलं. तू त्या दोघांनंतर मोठा म्हणून. तूला मी आधीच पत्र पाठवलं असं सांगितलं. मग त्यांनी ती मोहर एका लाल कापडात बांधून काही मंत्रांनी त्या मोहरच्या शक्तीला बांधून ठेवलं. आणि आजूबाजूच्या गावात जाऊन इतर लोकांचे उपचार करतायत. उद्या किंवा परवा येतील ते.

सोमनाथ : माझ्यासाठी ते २ दिवस खूप मोठे होते. माझ्या भावांनी एका मुलीसोबत जे केलं होतं त्याचा राग येतं होता. तर इतर लोकांची काय चूक ? त्यांना का शिक्षा ? असं वाटत होतं. २ दिवसांनी पैलकर वैद्य आले. खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचं अध्यात्मिक तेज पाहून मन आपोआप शांत झालं. त्यांनी मला सांगितलं की एक छोटी पूजा करावी लागेल. आणि ती पूजा घरात न करता शेतात करणार असं ठरलं. सकाळी सूर्य उगवण्यासोबत आमची पूजा सुरु झाली. मोहर विहिरीच्या ताज्या पाण्याने धुतली. आणि पैलकर वैद्यांनी जवळजवळ ३ तास मंत्र उचारानं करून त्या मोहरची शक्ती त्या मोहरपुरती बांधून ठेवली. लाल रंगाचे कापड आणि धाग्यांनी बांधलेली ती मोहर एका पेटीत ठेवली. आणि म्हणले , ” सोमनाथ, ही मोहर अर्थात त्या मुलीचा आत्मा खूप ताकातवर आहे. पण तिला झुरुनझुरुन मारलं किंवा मरायला भाग पडलं म्हणून ती तसंच सर्वाना मारतेय. म्हणूनच तिला आपण बांधू शकलो. तिला मी संपवू शकत नाही, म्हणून बांधून ठेवलेय. आता ही पेटी अश्या ठिकाणी ठेव की कधीच कोणी उघडता कामा नये किंवा कोणाच्या हाती लागू नये. कारण ती पुन्हा बाहेर आली तर मृत्यूचा हा खेळ पुन्हा सुरु होईल. ती संपली नाहीये फक्त बांधली गेली आहे. ”

त्यानंतर मी विहिरीजवळच ती पेटी पुरली. कारण घरात ती कधी ना कधी कोणाच्या तरी हाती लागलीच असती. आता नाही तर पुढल्या पिढीच्या, ज्यांना कदाचित हे सर्व माहित नसेल. आणि हे पुढील पिढीला सांगावं असं नाहीये. म्हणून सोयीचं म्हणून मी ती पेटी विहिरीच्या बाजूला पुरली. कारण शेत विहिरीपर्यंत नाहीये. त्यामुळे इथे खोदण्याचा प्रश्नच नाही. म्हणून मी ती पेटी तिथेच पुरली.

मृत्यूचा खेळ थांबला पण घराला, घराच्या वैभवाला उतरती कळा लागली. माझा व्यापार सुरतेत होता तिथं माझ्या अनुपस्थितीत दरोडा पडला. कमावलं सर्व गेलं. पुन्हा जाऊन उपयोग नव्हता. शेतीत लक्ष घातलं तर दर २ वर्षांनी दुष्काळ पडू लागला. या घटनेनंतर जवळपास ५- ६ वर्षांनी एकदा पैलकर वैद्य अचानक घरी आले. आम्हाला सर्वाना खूप आश्चर्य वाटलं त्यांच्या अचानक येण्याचं. आम्हाला असं विचारात पडलेलं पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली., ” मला माहित आहे तुम्हाला मला असं अचानक आलेलं पाहून नवल वाटलं असेल पण मी इथून गेल्यानंतर मला खात्री नव्हती की पेटी नेहमी बंद राहील याची. कारण कधी ना कधी कोणाच्यातरी हाती लागेलच ना ? म्हणून मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगवेगळ्या विद्वानांना भेटलो आणि त्या मोहरबद्दल काही करता येईल का ते पाहत होतो. कारण साधारणतः एखाद्या वस्तूत आत्मा वास करत असेल तर ती वस्तू जाळून टाकली तर आत्मा मुक्त होतो , पण ही मोहर तांब्याची असल्यामुळे आगीत टाकल्यावर तिचा आकार बदलेले पण ती नष्ट होणार नाही. त्यामुळे यावर उपाय शोधणं गरजेचं होतं. ३ -४ महिन्यांपूर्वी सातपुडा पर्वताकडे काही रुग्णांना पाहायला गेलो होतो. तेव्हा तिथे मला एक तपस्वी भेटले. का कोण जाणे पण मला असं वाटलं कि यांच्याकडे मला उपाय नक्की मिळेल. मी त्यांना सर्व सांगितलं आणि मदत करा म्हणून विनंती केली. त्यांनी मला उपाय सांगितला की, ती मोहर पूर्ण वितळून त्याला महादेवाच्या पिंडीचा आकार द्या. आणि देव्हाऱ्यात ठेवून पूजा करा. कारण सर्व भूत, अघोरी, चांडाळ इ. सर्व महादेवाच्या अधीन असतात. असं केल्यामुळे आत्मा मुक्त होईल. आणि कधीच कोणाला त्रास होणार नाही. ”

मी पैलकर वैद्यांचे आभार मानले की त्यांनी आमचा एवढा विचार केला आणि एवढे वर्ष उपाय शोधत राहिले. त्यावर ते म्हणाले की ती जर परत मुक्त झाली आणि मृत्यूच्या साखळीच सत्य कोणाला माहित नसेल तर हे चक्र बंदच होणार नाही म्हणून मी अनेक जीवांचा विचार करून हा उपाय शोधलाय.

आम्ही ती मोहर काढायला विहिरीजवळ गेलो जिथे ती पुरली होती तिथे खोदलं पण मोहर मिळाली नाही. मग विहिरीच्या बाजूचा बराच भाग खोदून झालं पण मोहर मिळालीच नाही. कोणीतरी तिला बाहेर काढलं तर नाही ना ? अशी शंका आली पण आसपास त्याप्रकारे कोणाचा मृत्यू एवढ्या वर्षात झाल्याचं ऐकलं नव्हतं. कदाचित तिची सूडभावना अजून पेटलेली होती म्हणून ती नाहीच भेटली.

ती मोहर मिळाली नाही म्हणून हे सर्व लिहून ठेवावं लागत आहे. कधी त्रास झाला त्या मोहरचा आणि ही वही हाती लागली तर हा उपाय करा.

सोमनाथ मोहिते

आता रघुनाथ आणि पैलकर वैद्य यांना उपाय सापडला होता. इथे मात्र सूर्य पश्चिमेला कवेत घेत होता. उगवणारी रात्र अमावशेची होती. त्यांनी ती मोहर घेऊन लोहारचं घर गाठलं. लोहाराने संध्याकाळ झाल्यानंतर काम बंद केलं होतं आणि आता तर रात्रीची सुरुवातही झाली होती. रधुनाथने विनंती आणि गळ घालून आताच त्याच महादेवाची पिंड करून म्हणून सांगितलं. लोहाराने काम सुरु केलं आणि शिवाचा जीव वरखाली होऊ लागला होता. रघुनाथ आणि वैद्य देवाकडे प्रार्थना करत होते. एक क्षण शिवाला वाटलं आपला जीव गेला आणि तो पर्यंत लोहाराने भट्टीतून महादेवाची पिंड बाहेर काढली. शिवाचा जीव वाचला. त्यानंतर त्या महादेवाच्या पिंडीची पूजा घरात होऊ लागली आणि लक्ष्मी पुन्हा आपल्या आगमनाची लक्षणे दाखवू लागली.

समाप्त……………………………………………….

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा