मोहर

Written by
  • 2 आठवडे ago

मोहर

( 1940 च्या आसपास चा काळ ) सकाळची वेळ गार वारा सुटला होता.  सर्व शरणपूर गाव झोपेच्या कुशीतून जाग होत होतं. पाखरं किलबिलाट करून अरुण देवाचं स्वागत करत होते. गाई -म्हशी, वासरं रानावर जाण्यासाठी सज्ज होत होते.घराघरातून चुलीवर भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा खरपूस वास दरवळत होता. शांत आणि मनमोहक वातावरण होत. गावातल्या अश्याच एका मोडकळीला आलेल्या वाड्यात शिव आपल्या आई -वडील आणि 7 भावंडांसोबत राहत होता. पूर्वी या वाड्यात वैभव होतं, लक्ष्मी पाणी भरत होती, पण मागील काही पिढयांपासून वाड्याला आणि वाड्याच्या वैभवाला उतरती कळा लागली होती. जेमतेम शेती उरली होती आणि त्यातूनच कसबस घर चालत होतं. शिव जेमतेम 20-22 वर्षांचा आणि घरातला थोरला मुलगा होता.

शिवचे बाबा – शिव आज जाऊन रान वाढलंय शेतात, ते काढून टाक आणि जमीन मोकळी कराय घे. पाऊस सुरु होण्या अगुदर जमीन मोकळी करून घेतलेली बरी.

शिव – बरं हाय बा, आज कराय घेतो काम हाती.

शिवची आई – लेकरा भाकरी खाऊन जा म्हंजी तुला बि काम कराय ताकूद येल.

शिव – व्हय माय.

शिव न्याहारी करून शेतावर जातो. शेतावर पोहचल्यावर संपूर्ण शेतावर नजर मारत कामाची आणि कामासाठी लागणाऱ्या वेळेची आखणी करत होता. हा विचार करतच तो शेतातल्या विहिरीजवळ जाऊन विहिरीतून पाणी काढतो आणि पाणी पितो, पाणी तोंडावर मारून तरतरीत होतो.  शेतात वाढलेलं गवत काढताना बराच वेळ होतो.  घामाघूम झालेला शिव काम करत असताना त्याची लहान बहीण दुपारचं जेवण घेऊन येते.

बहीण – भाऊ अरे ये भाऊ भाकर आणली बघ खाऊन घे.  ( मोठ्याने आवाज देत शेतात येते. )

शिव – व्हय खातू नंतर, तू ठेऊन जाय.

शिवची बहीण भाकरीची दुरडी विहिरीजवळच्या झाडाजवळ ठेऊन निघून जाते. दुपार ओसरताना पूर्ण शेतातलं गवत काढून होतं आणि तो जेवायला बसतो.  जेवत असताना आज जमीन जमेल तेवढी मोकळी करायची हा विचार करत होता.
जेवण करून शिव जमीन खणायला सुरुवात करतो. खोदताना तो कधी विहिरीजवळ आला आणि विहिरीजवळ खोदु लागला ते कळलंच नाही.  लक्षात आल्यावर शिव दुसरीकडे काम करायला जाणार तोच त्याच्या मनात विचार आला की विहिरीजवळ खोदून इथे पण जमीन व्यवस्थित करून घेऊ.  विहिरीजवळ खोदत असताना संध्याकाळी कधी झाली ते त्याला कळलंच नाही. अश्यातच खोदताना टगगगगगगगग असा आवाज झाला आणि संध्याकाळी गडद रात्र जाणवू लागली. ढग गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. शिव दचकला आणि विचार करू लागला अजून पाऊस सुरु व्हयला अवकाश असताना ढग गडगडाट करतायत आणि विजा चमकतायत..?  त्याने आवाज आला होता तिथे हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली.  माती जसं जसं बाजूला करत होता तसं तसं गडगडाट वाढत होता आणि ही गोष्ट शीवच्या लक्षात आली. माती बाजूला झाल्यावर त्याखाली त्याला एक लोखंडी पेटी दिसली. त्याने त्याला स्पर्श करून माती बाजूला करू लागला तसं त्याच्या हाताला झटका बसावा असं काहीसं झालं.  शिव धीट होता त्यामुळे पुन्हा त्याने त्या पेटीला स्पर्श केला यावेळी मात्र असं झालं नाही.  त्याने ती पेटी स्वच्छ केली आणि घरी नेऊ लागला.  शेतातून बाहेर पाय ठेवताच सर्व सामान्य झालं, जणू वारा, गडगडाट, विजा चमकणे असं काही झालंच नव्हतं.
शिव आनंदच घरी परत येतो. त्याला कुठे तरी असं वाटत होतं की यात नक्कीच खजाना असणार. कोणालाही काहीही न सांगता तो ती पेटी वाड्यात वर अडगळीच्या खोलीत ठेवतो. मध्यरात्री तो सर्व झोपल्यावर वर अडगळीच्या खोलीत येतो आणि ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच प्रयत्नानंतर ती पेटी उघडते. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यात खजाना असायला हवा होता, पण त्यात एक लाल रंगाचं कापड होतं तेही गंड्या- दोऱ्यानी बांधलेलं.
शिवाने ते कापड उघडतो त्यात त्याला एक मोहर दिसते. एवढ्या मोठ्या पेटी मध्ये एकच मोहर पाहून त्याचा हिरमोड होतो. मोहर हातात घेताच तिथे मोगऱ्याचा सुगंध पसरतो आणि वातावरण धुंद होतं. मोहर जुनी असली तरी सोन्या चांदीची नसून तांब्याची होती. त्यामुळे ती तिथेच ठेऊन तो खाली येऊन झोपतो.
येणारी सकाळ त्याच्यासाठी नवीन संकटं घेऊन येणार आहेत  याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती.

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत