मोह

Written by

#मोह

हेलो ही समोर दिसतेय नं केस सोडलेली,गोऱ्या पान चेहऱ्याची,चेहऱ्यावर खट्याळ भाव,मादक डोळे,लाघवी हसू..अहं मुळीच फशी पडू नका तुम्ही.

मी ,मी असाच एक हिच्या सौंदर्यावर भाळलेला सामान्य माणूस.चांगला संसार होता हो माझा.पत्नीचा वाढदिवस होता.साहेब खडूस.आपल्यासारख्या सामान्य माणसाला साहेब खडूसच मिळतात ओ.त्याला लाख विनवलं लवकर सोड पण कामाचा ओव्हरलोड होता म्हणून शिंच्याने साडे बारापर्यंत बसवून ठेवलन.

लोकल पकडली सीएसटीला.गार वारं अंगाला झोंबलं.डुलकी लागली.गाडीत छक्का आला .नेहमीचाच सोबती.बरा होता तसा.लोकं यांना का घाबरतात देव जाणे.हाडामासाची माणसंच ती.मी मात्र त्याच्याशी गप्पा मारायचो.करीरोड स्टेशन जवळ येताच त्याने उठवलं,”दादा चल उठ नहीं तो कारशेड जायेगा.आज लेट हुआ रे तेरेको.काम ज्यादा था लगता है.थक गया बेचारा.” मी नुसताच हसलो.म्हंटलं त्याला ,” बीवीका हेपी बर्थडे है आज.” बोलला,”मेरी तरफसेभी विश करना उसको.”.

स्टेशन येताच उतरलो.एक वाजत आला होता.मी दुपारीच ऑफीसच्या खाली बसणाऱ्या फुलवालीकडून बायकोसाठी दोन फुट लांब जुईचा गजरा व निशिगंधाची जुडी घेऊन बेगेत घालून ठेवली होती.तसंच तिच्या आवडीची बालुशाही घेतली होती.सगळं कोणाला न दाखवता बेगेत ठेवलं होतं.नाहीतर उगा फोडणी पडली असती खिशाला.आधीच कडकी चालू होती.ती तर नेहमीचीच.

पण बायको माझी राबराब राबायची ओ माझ्यासाठी.माझ्या दोन गोंडस पोरांना सांभाळायची.शिवाय घरातलं आवरुन शिवणकाम करायची.माझ्या संसाराच्या फाटक्या वस्त्राला ठिगळं लावायची.दिसायला फारसी सुंदर नव्हती.चारचौघींसारखीच.नाकीडोळी नीटस.काळसावळी.पण सुखी होती संसारात.कधीच त्रास दिला नाही.मला हे हवं ते हवं अशी किटकिट कधीच केली नाही.एकंदरीत बरं चाललेलं आमचं.

ब्रीजवरून मी खाली उतरलो.लालबागच्या रस्त्याने चालू लागलो.श्रीकृष्ण दुग्धालयाच्या चौकाजवळ रस्ता क्रॉस केला व पुढचा चढ चढू लागलो.मिंट कॉलनीत घर होतं आमचं .आमचं म्हणजे माझे वडील होते मिंट कॉलनीत.त्यांना मिळालेलं.अर्ध्या वाटेवर आलो असेन मला जोराची तहान लागली.बाटलीत पाहीलं.एक थेंबही नव्हता पाण्याचा.स्वत:लाच आधी भरून घ्यायला काय झालेलं म्हणून शिवी हासडली.

बाजूला मिल होती ती पाडली होती.तिथेच काही कामगारांच्या वसाहती होत्या.त्या पाडून टॉवर उभारत होते.बांधकाम चालू होतं.वॉचमन झोपला होता.आत कुणीतरी असेल तर पाणी मागावं म्हणून पुढे गेलो तर ही चित्रात दिसतेय ती सुंदरी दारात उभी होती.मी पाणी मागितलं तिच्याकडं.
ती म्हणाली,” या नं आत.”
मी आत गेलो.ती पडकी बांधकामाची खोली एखाद्या सुंदर दालनासारखी वाटत होती.खोलीत एक धुंद सुगंध येत होता.तिने मला बेडवर बसण्यास सांगितलं.त्या बेडला चारीबाजूंनी मोगऱ्याचे गजरे लावले होते.बाजुला एक जुन्या जमान्यातलं कोरीव काम केलेलं गोल स्टूल होतं.त्यावर लाल गुलाबांनी गच्च अशी फुलदाणी ठेवली होती.तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे
एवढ्यातच त्या कुशीवर तू
असा वळलास का रे
आरती अंकलीकर टिकेकरच्या आवाजातली आर्तता मनाला स्पर्शून जात होती.

तिने ग्लासभर केशर घातलेलं दूध आणलं.माझ्याजवळ येऊन बसली व माझ्या ओठांना तो दुधाचा ग्लास लावला.मी ना करुच शकलो नाही.पुरता भ्रमित झालो होतो.क्षणभरात तो दुधाचा ग्लास रिता झाला.

तिने मला हलकेच त्या मऊशार पलंगावर निजवलं.माझी बेग,माझी बायको,मुलं मला काही काही आठवत नव्हतं.मी जणू स्वर्गातच होतो.खाटीवर राती निजणारा मी प्रथमच अशा मऊशार पलंगावर निजलो होतो.मोगऱ्याची नशा चढत होती.त्यात ते केशरी दूध आणि बाजूला ती मंतरलेली स्वर्गीय मेनका.

तिने तिचे लालचुटूक ओठ माझ्या ओठांवर टेकवले व प्रणयास आरंभ केला.हळूहळू सारी वस्त्रे काढून ठेवली.माझे बुट काढले.माझी घामेजली वस्त्र दूर केली व तिची मलायम बोटं माझ्या अंगांगावर फिरु लागली.मी पुरता बेधुंद झालो होतो.माझ्या सर्वांगाला तिने तिच्या नाजूक ओठांनी चेतवलं व माझ्यात एकरुप झाली.तीन वाजेपर्यंत मी त्या प्रीतीच्या राशीत लोळत होतो.

घड्याळात तीनचा टोला झाला आणि..आणि मला कोणीतरी माझा घसा करकचून दाबतंय असं जाणवलं.डोळे उघडले तर सर्वांगाला घाम सुटला.त्या मेनकेच्या जागी एक पांढरी साडी नेसलेली पांढऱ्या केसांची हडळ होती.माझ्यावर वाकलेली.पिवळे दात विचकून माझ्यावर हसत होती.मघाच्या सुंदर दालनाऐवजी अधुऱ्या बांधकामाची ती एक खोली होती व मी जमिनीवर होतो.मोगऱ्याचं,सुगंधाचं नामोनिशाण नव्हतं.वातावरणात एक गिळगिळीतपणा जाणवत होता.

तिने तिच्या बोटांनी माझा घसा आवळला.मी पुरता घुसमटत होतो.माझ्या कंठातून शब्द फुटत नव्हते.तिची ती लाकडासारखी बोटं माझ्या घशाभोवती रुतली. आरती अंकलीकरच्या सुरेल प्रेमगीताच्या जागी तिचं भयाण हसू ऐकू येत होतं.हळूहळू माझा श्वास थांबला.मी अनंतात विलिन झालो.

सकाळी वॉचमनला माझं प्रेत दिसलं.माझ्या गळ्यातल्या आयकार्डवरुन त्याने घरच्यांना कळवलं.काका,मामा येऊन माझं कलेवर घेऊन गेले.

माझा आत्मा अवतीभवतीच घोटाळत होता.माझी पत्नी जिचा वाढदिवस होता, तिचं सौभाग्य हिरावलं होतं.ती धाय मोकलून रडत होती.माझी दोन्ही कच्चीबच्ची दिनवाण्या डोळ्यांनी आईकडे पहात होती.माझे आईवडील ..पुत्रशोकाने विव्हल झाले होते.मी सगळ्यांचं सांत्वन करु पहात होतो.पण मी कुणाला दिसत नव्हतो.माझ्या बछडीच्या गालावरून हात फिरवला.तिला काहीसं परिचितसं जाणवलं खरं.

एका पाण्याच्या घोटासाठी,एका क्षणिक मोहापायी माझ्या आयुष्याची राखरांगोळी झाली.आताशा मी रात्रीचा त्याच रस्त्यावर फिरतो बरं का.कोणाला पाणी हवं असलं तर देतो पण त्या पडक्या बांधकामाकडे फिरकू देत नाही.

तुम्हीही जाऊ नका हं कधी.आयुष्य खूप सुंदर आहे.एकदाच मिळतं.जपा ते.आपल्या मुलाबाळांना पत्नीला,मायबापाला जपा.
(ईराच्या चित्रावरुन कथा लिहा स्पर्धेसाठी प्रथमच भयकथा लिहिली आहे.)

——गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा