यशोधरा

Written by
  • 2 महिने ago

यशोधरा

( सदर कथेतील प्रसंग काल्पनिक असून यात स्त्री मनाचे दर्शन, यातना, विचार आणि अपेक्षा व्यक्त करण्याचा प्रयन्त केला आहे. )

महालाच्या फुलझाडांनी गच्च भरलेल्या गच्चीतून सूर्याला कवेत घेणारी आणि सुवर्ण, केशरी, हळद पिवळा रंगानी नटलेली पश्चिम दिशा न्याहाळण्यात मग्न यशोधरेला माता गौतमीने ( महाप्रजापती गौतमी ) आवाज दिला, ” धरा, संध्या झाली तरी तुम्ही अजून भोजन करायला आला नाहीत ? ” मातोश्रींच्या आवाजाने भानावर आलेल्या यशोधरेने त्यांच्याकडे पाहत हळूच उत्तर दिले, ” मातोश्री, दुपारी राहुल बाळाने फार हट्ट केला म्हणून आम्ही दुपारीच त्यांच्यासोबत भोजन केलं. आणि तुम्हाला तर माहित आहेच आम्ही केवळ एकच वेळ भोजन ग्रहण करतो . ”

यावर मातोश्री म्हणाल्या, ” धरा, बास गं किती यातना करून घेणार आहेस स्वतःला? आम्ही तूम्हाला असं पाहून झुरतो. तूम्ही आमच्या सूनबाई तर आहातच पण आमच्या सख्या भावाची लेक ही आहात. सिद्धार्थ आपल्याला रात्रीच्या अंधारात सोडून शांती आणि ज्ञानाच्या शोधात गेले खरे पण त्यांच्यामागे आपली , आमची आणि महाराजांची ही काय अवस्था झाली ते आपण जाणताच. त्यात तूम्ही राजमहालात राहूनही एका वैराग्याचे जीवन जगता. युवराज्ञी आहात आपण आणि जमिनीवर झोपता, साधं जेवण ते ही एकच वेळ जेवता, रेशमी वस्त्र आणि अलंकार यांचा तर तूम्ही कधीच त्याग केलात. तूम्हाला असं पाहून काय वाटत असेल हो आम्हाला आणि महाराजांना?
“तूम्हाला आमच्यामुळे खरंच फार त्रास होतो पण आम्ही तरी काय करावे? यात जीव रमत नाही हो आमचा. युवराजही हे असंच जीवन व्यतीत करत आहेत, तर मी तेच जीवन स्वीकारणार ना? ” – यशोधरा.
( यशोधराच्या या उत्तराने माता गौतमी ना पुढे काही बोलून त्यांच्या जखमांवरच्या खपल्या काढायच्या नव्हत्या. म्हणून त्या यशोधरेला निरोप देऊन निघाल्या.धरा मात्र संध्या नंतर उगवणार्या रात्रींकडे एकटक पाहत होत्या. कारण अश्याच एका रात्री आपल्या पतीने आपला त्याग केला होता. त्या गडद होणाऱ्या रात्रीसोबत यशोधरेचे विचारही गडद होतं होते. )

काही दिवसांनी…………….

माधुरी धरेच्या सेवेत ठेवलेली दासी आपल्या दोन अडीच वर्षाला मुलाला घेऊन आली होती. ते बाळ दालनात रांगत होतं आणि माधुरी आपल्या कामात व्यस्त होती. दालनात प्रवेश करताना यशोधराने पहिले की दालनात येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे बाळाची छाया जमिनीवर पडतेय आणि ते बाळ कधी ती छाया पडकू पाहतंय तर कधी त्या छायेपासून लांब जाण्याचा प्रयन्त करून त्यापासून आपली सुटका करू पाहतोय. पण दोन्ही त्याला जमेना. यशोधरा त्या गोंडस बाळाची लीला डोळेभरून पाहत होत्या. माधुरीचे लक्ष यशोधरेकडे गेले आणि त्यानंतर आपल्या बाळाकडे. माधुरी पटकन जाऊन बाळाला उचलणार तोच यशोधरेने तिला हातानेच थांब्यास खुणावले. माधुरी यशोधरेची क्षमा मागू लागली त्यावर यशोधरा म्हणाल्या, ” क्षमा का मागतेयस माधुरी? गं लहान आणि निरागस बाळ आहे ते. त्याला लहान मोठं, गरीब- श्रीमंत, असं काही कळत नसतं. या वयात मनुष्य सर्वांत जास्त सुखी असतो. आणि बघ ना आताच्या या प्रसंगातूनच किती काही जीवनाबद्दल ज्ञान मिळालं.”
माधुरी : ” ज्ञान? कोणतं?
यशोधरा :” हे बाळ जसं आपलीच छाया धरण्याचा प्रयन्त करत होतं पण हाती काहीच येतं नव्हतं तसंच आपण ही जीवनात खूप काही धरून ठेवल्याचा प्रयन्त करतो, पण ते हाती येतंच नाही, आणि जसं आपण त्यापासून लांब जाऊ लागतो तसं ते आपल्याला सोडत नाही.”
बोलता बोलता यशोधरा मध्ये थांबल्या आणि काही विचार करत असल्यासारखं वाटल्या म्हणून माधुरीने विचारले, ” काय झाले युवराज्ञी? असं अचानक का बोलता बोलता थांबलात? ”
माधुरीच्या बोलण्याने भानावर आल्यावर यशोधरा बोलू लागल्या, ” माधुरी अगं मी लहान असताना ना आम्हाला सांभाळायला एक दाई होती. आमच्या मातोश्री आम्ही लहान असतानाच गेल्या. दाई आम्हांला फार जीव लावी. जेवण भरवी, गोष्ट सांगे, मायेची उब येई. आम्ही 8-9 वर्षांच्या होतो तेव्हा रामायणातील राम वनवासाला निघतानाच प्रसंग आम्ही कोणाकडून तरी ऐकला आणि येऊन दाई ला विचारून हैराण केलं की सीता रामासोबत गेल्या तर मग उर्मिला का नाही? दाईने मला जवळ बसवलं आणि सांगू लागल्या, ” यशोधरा, स्त्रीला नेहमी स्वतः आधी इतरांचा विचार करावा लागतो. सीता गेल्या नंतर मागे थोरली म्हणून उर्मिलाचं ना गं. सुख कोणाला नको असते गं? स्वतःच्या सुखापेक्षा घर आणि घरातील माणसं, जबाबदारी आणि कर्तव्य यांचा विचार केला तिने. तरीही लोक ती राजविलास भोगतेय असंच म्हणतं. एकदा महालात मोठी पूजा होती. आणि अर्थात आता घरात थोरली म्हणून सर्व तिचं पाहत होती. तिला असं पाहून पूजेला येणाऱ्या बायका कुजबुजू लागल्या. ” हीच पती वनवासी आणि ही राजविलासी. ” उर्मिलाने ते ऐकले आणि स्वतःच्या दालनात जाऊन दरवाजा बंद केला. आणि रडरड रडली. थोड्यावेळाने रेशमी वस्त्र आणि अलंकार चढवून ती पूजेत हजार झाली. हे सर्व उर्मिलाच्या लहान बहिणेने पाहिलं होतं. पूजा संपल्यावर तिच्या छोट्या बहिणेने अर्थात भरतच्या पत्नीने उर्मिला ला त्यामागचं कारण विचारलं त्यावर उर्मिलाने उत्तर दिलं, ” कोणाबद्दल तक्रार कशी करू मी? जिथे माझ्याच पतीने वनवासाला जाण्याचा निर्णय घेण्याआधी मला विचारणं किंवा आधी सांगणं गरजेचं समजल नाही. अर्धांगिनी असतो ना आपण आपला अर्धा हक्क असतो ना? मग का नाही विचारलं? निर्णय घेऊन मोकळे झाले आणि निघूनही गेले. खरंच एक पत्नी पतीच्या 14 वर्षाच्या विरहामध्ये सुखी असेल का? जानकी ताई सोबत राम आहेत.त्यामुळे ती कुठेही असली तरी तिच्यासाठी ती जागाच राजमहाल होईल. पण माझं काय एवढ्या मोठ्या राजप्रासादामध्ये ही मला प्रतिक्षणाला अनंत काटे बोचतात.पण मी ना रडू शकत, ना तक्रार करू शकत आणि ना कोणाला दोष देऊ शकत. मघाशी रडली ती एक पत्नी होती. आणि त्यानंतर पूजेत येणारी या घराण्याची सून. ती सून जिला कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत आणि त्या पूर्ण ही करायच्याच आहेत.” तिचा त्याग कोणाला कळलाच नाही.

आमच्या बाबतीत ही फार काही वेगळे नाही. पण इथे हे सर्व आम्ही स्वतःच निवडलं. युवराज्यांच्या जन्मावेळी केलीली भविष्यवाणी ठाऊक होती आम्हांला पण देवव्रत समोर एका पक्षासाठी एखाद्या ढालीप्रमाणे युवराजचं उभे राहणं भावलं होतं आम्हाला. प्रेमात पडले युवराज्यांच्या.प्रेम असो किंवा युद्ध संघर्ष असतोच गं माधुरी. नववधू बनून या कपिलवस्तू मध्ये आले आणि या कपिलवस्तूची झाले. युवराजांचा जीव मात्र गुदमरायचा इथे. याची जाणीव होती मला. एकदा रात्री त्यांनी त्यांची उच्ची वस्त्रे उतरवली आणि झोपलेल्या राहुल बाळाकडे आणि माझ्याकडे एकवार पाहत ते राजप्रासादाच्या बाहेर पडले. मी त्यावेळी जागीच होते गं माधुरी. त्यांची बेचैनी वाढल्यापासून मला दिवसा चैन नसे आणि रात्री झोप. ते बाहेर पडल्यावर मी उठून झरोख्यातून त्यांना पाहत कितीतरी वेळ उभी होते, अगदी ते दृष्टीआड होईपर्यंत. हे कधीतरी होणार ठाऊक होतं पण लक्ष्मणाला जसं उर्मिलेला सांगणं गरजेचं वाटलं नाही तसंच युवराजांनाही वाटू नये? आम्ही त्यांना अडवू असं का वाटावं युवराजांना? विवाहापूर्वी मला सर्व कल्पना असताना. त्यांनी आम्ही त्यांची अर्धांगिनी असून आम्हांला सांगितलं नाही या गोष्टीची खंत आम्हाला कायम राहिली. त्यावेळी उर्मिलेला काय वाटलं असेल याची कल्पना मात्र नक्कीच आली आम्हाला. युवराजांनी ज्ञान प्राप्त केलं तसं मी ही एक गोष्ट प्राप्त केली आहे ती म्हणजे “संयम.” आजवर याच संयमाच्या बळावर आम्ही दग धरून उभ्या आहोत.

उर्मिलेला ठाऊक होतं तिचा वनवास 14 वर्षांनी संपणार आहे परंतु आम्हाला नाही ठाऊक की आमच्या बाबतीत पुढे काय होणार. तरीही सर्व जबाबदारी, कर्तव्य सांभाळत ही मनाने पाषाण झालेली अहिल्या आपल्या रामाची प्रतीक्षा करेल………..

असं म्हणून यशोधरा पुन्हा फुलांनी गच्च गच्ची मधून सूर्याला कवेत घेणारी आणि सुवर्ण, केशरी, हळद पिवळा रंगानी नटलेली पश्चिम दिशा न्याहाळण्यात मग्न झाल्या.

शांती आणि ज्ञान मिळवण्यासाठी युवराजांनी राजवैभवाचा त्याग केला तो मोहापासून दूर राहून वैराग साध्य करण्यासाठी आणि त्याचं मोहाच्या महासागरात राहून यशोधराने अनोखं वैराग्य प्राप्त केलं होतं.माधुरीने यशोधरेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हात जोडले.

समाप्त…………….

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.